पर्यटन व तीर्थक्षेत्र
…या तीर्थक्षेत्रासाठी देणार पाच कोटी निधी-सभापती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पुणतांबा या पौराणिक महत्त्व असलेल्या तीर्थक्षेत्राचा “ब” दर्जा मिळून देणार असून अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या होळकर घाटाचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी ग्रामविकासच्या माध्यमातून पाच कोटी रुपये पर्यंत निधीही उपलब्ध करून देण्यास स्वतः प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याच्या विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी नुकतेच केले आहे.

“राजा यज्ञसेनची नगरी म्हणून कथेनुसार पुणतांबा ओळखले जाते.ब्रिटीश गॅझेट १८८७ मधील नोंदी नुसार अहिल्यादेवी होळकर यांनी इ.स.१७६५ ते १७९५ दरम्यान पुणतांबा येथे घाट बांधला.दक्षिणकाशी म्हणून ओळख असलेल्या या परिसरात बारा ज्योतिर्लिंग आहे” -सुशांत घोडके,गोदातीर परिसर इतिहास संशोधन मंडळ.
श्री क्षेत्र पुणतांबा हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठावर वसलेले एक अतिशय प्रसिद्ध आणि प्राचीन धार्मिक स्थळ आहे.या गावात महान योगी संत चांगदेव महाराजांची संजीवन समाधी आणि त्यांचे भव्य मंदिर यामुळे ओळखले जाते.येथे सुमारे चारशेहून अधिक वर्षांपूर्वींची अनेक पुरातन मंदिरे आहेत.गोदावरी नदीकाठचा भव्य व सुंदर घाट हे या गावाची मुख्य ओळख आहे.या गावाला ऐतिहासिक तटबंदी असून गोदावरीच्या तीरावर अनेक ऋषींनी तपश्चर्या केली असल्याचे मानले जाते.याच ठिकाणी संत संत चांगदेव समाधीत असताना संत मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वरादी भावंडांनी येथील मृत व्यक्तींना जिवंत केल्याची नोंद इतिहासात आहे.या ठिकाणी अहिल्यादेवी यांनी गोदावरी नदीकाठी सुंदर घाट बांधला आहे.मात्र तो अलीकडील काळात जीर्ण झाला असून त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले असल्याचे मानले जात आहे.याकडे माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे.व त्या ठिकाणी विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांना भेट देण्यासाठी नुकतेच आणले होते.त्यांनी सदर ठिकाणी भेट दिली असताना ही घोषणा केली आहे.
श्री क्षेत्र पुणतांबा या तीर्थक्षेत्र असलेल्या या गावाला राजा यज्ञसेनची नगरी म्हणून ओळखले जाते. कार्तिक स्वामी,बारा ज्योतिर्लिंग तसेच याज्ञसेनी देवी, मुदगलेश्वर, विठ्ठल मंदिर,शैव पंथीय समाधी,चांगदेव महाराज मंदिर परिसर तसेच या गावातील वेशी आणि इतरही जवळपास १७१ मंदिरांचे जतन आणि संवर्धनासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
माजी आ.कोल्हे यांनी यावेळी पुणतांबा तीर्थक्षेत्राचे महत्व विषद करून मंदिरे आणि पुरातन वास्तू यांचा जीर्णोध्दार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीच्या केलेल्या विकासाच्या धर्तीवर व्हावा यासाठी मागणी केली.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार व कार्य हे नव्या पिढीला आदर्शवत ठेवा म्हणून जपण्यासाठी पुणतांबा तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सभापती प्रा.राम शिंदे यांनी केलेल्या मागणीकडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे.
यावेळी मंदिर दुरुस्ती सेवा समिति,बजरंगदल पुणतांबाचे सर्व स्वयंसेवक,गंगाधर चौधरी,मधुकर सातव,सुभाष वहाडणे,भारत वहाडणे,सुधाकर जाधव,चंद्रकांत वाटेकर,सुशांत घोडके,अनिल नळे,संभाजी गमे,अशोक पवार,पत्रकार माधव ओझा,शिरीष कुलकर्णी तसेच पदाधिकारी,नागरिक उपस्थित होते.


