जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

साई संस्थानच्या प्रसादालयात गोंधळ,सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


   शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या सशुल्क प्रसादालयात कर्मचाऱ्यांशी अरेरावी,शिवीगाळ,कामकाजात अडथळा निर्माण करणे,साईभक्तांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणे तसेच सोशल मीडियावर संस्थानची बदनामी केल्याच्या आरोपावरून कोपरगाव येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे तालुका प्रमुख भरत मोरे यांच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे शिर्डीत मोठी खळबळ उडाली असून संस्थान परिसरातील शिस्त व सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दाही ऐरणीवर आला असल्याचे मानले जात आहे.

श्री साईबाबा संस्थान प्रसादालय,शिर्डी.

दरम्यान या साई संस्थान प्रसादालयातील घटनेनंतर भारत मोरे या इसमाने या संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम व फेसबुक खात्यांवर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप संस्थान प्रशासनाने केला आहे.या व्हिडिओमध्ये प्रसादालयातील भोजनाच्या दर्जाबाबत चुकीची माहिती देण्यात आली असून,”प्रसादालयातील चपाती आणि पापड खाण्यास अयोग्य आहेत” असे सांगून संस्थानची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

   साई संस्थान कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले,मारहाण आणि गैरवर्तन ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.शिर्डीतील श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट,शिर्डी मध्ये घडलेल्या काही गंभीर घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.काही दिवसापूर्वी लुटीच्या उद्देशाने झालेल्या हल्ल्यात साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची निर्घृण हत्या झाली होती.सुरक्षारक्षकांना भाविकांकडून किंवा इतरांकडून मारहाण,शिवीगाळ व धक्काबुक्कीला सामोरे जावे लागल्याच्या तक्रारी आहेत.सुरक्षेच्या कारणास्तव व कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल करून संस्थांनने कामाच्या वेळा बदलाव्या लागल्या असल्याची घटना फार जुनी नाही अशातच शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या प्रसादालयातील एक गंभीर घटना उघडकीस आली असून यात शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार,श्री साईबाबा संस्थानच्या प्रसादालय विभागात पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेले जगन्नाथ सिताराम मुंढे (वय-५५) यांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

  त्याबाबत मुंढे यांनी आपले फिर्यादीत म्हटले आहे की,” आपण साईबाबा संस्थानच्या सशुल्क भोजन हॉल क्रमांक-१ येथे पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहे.त्या ठिकाणी साईभक्तांना भोजन वाढणे,भोजन व्यवस्थेवर देखरेख ठेवणे,मान्यवरांची भोजन व्यवस्था सांभाळणे तसेच कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणे ही त्यांची जबाबदारी आहे.मात्र मंगळवार दि.२३ जून रोजी दुपारी सुमारे २.४० वाजण्याच्या सुमारास सशुल्क भोजन हॉलमध्ये नेहमीप्रमाणे साईभक्तांना भोजन देण्याचे काम सुरू होते.त्यावेळी प्रसादालयातील अनेक कर्मचारी आपल्या कर्तव्यावर कार्यरत होते.त्याचवेळी भोजनासाठी आलेले कोपरगाव येथील भरत मोरे यांनी अचानक मोठमोठ्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली.त्यांना चपाती उशिरा मिळाल्याच्या कारणावरून त्यांनी आक्षेप घेत कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.यावेळी त्यांनी आपल्या सोबत असलेल्या व्यक्तीस मोबाईलवर संपूर्ण घटनेचे चित्रीकरण करण्यास सांगितल्याचा आरोपही करण्यात आला आहे.कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत आपल्या कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा आरोप केला आहे.भरत मोरे यांनी प्रसादालयातील कर्मचाऱ्यांविषयी अपमानास्पद व आक्षेपार्ह भाषा वापरत शिवीगाळ केली आहे.तसेच काही कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांचे ओळखपत्र हाताने ओढून तपासल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  दरम्यान त्याच वेळी एका कर्मचाऱ्याला त्याच्या भाषिक ओळखीवरूनही लक्ष्य करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले असल्याचा दावा केला आहे.या संपूर्ण प्रकारामुळे प्रसादालयातील कर्मचाऱ्यांच्या नियमित कामकाजात अडथळा निर्माण झाला होता.तसेच भोजनासाठी आलेल्या साईभक्तांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.त्यावेळी मोरे हे “मी तुम्हाला येथे कोणालाही काम करू देणार नाही,” अशा स्वरूपाच्या धमक्या देत संबंधितांनी प्रसाद वाटपाचे काम थांबविण्याचा प्रयत्न केला आहे.

  दरम्यान मोरे यांनी सोशल मीडियावर सदरचा व्हिडिओ टाकल्याने हे प्रकरण अधिक चिघळले असल्याची माहिती हाती आली आहे.घटनेनंतर संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम व फेसबुक खात्यांवर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप संस्थान प्रशासनाने केला आहे.या व्हिडिओमध्ये प्रसादालयातील भोजनाच्या दर्जाबाबत चुकीची माहिती देण्यात आली असून,”प्रसादालयातील चपाती आणि पापड खाण्यास अयोग्य आहेत” असे सांगून संस्थानची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.विशेष म्हणजे,शिर्डीत दररोज हजारो साईभक्त प्रसादालयात भोजन घेत असतात.अशा परिस्थितीत सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओमुळे साईभक्तांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

   दरम्यान याबाबत शिर्डी पोलिस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा क्रमांक ०५५२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १३२,२२१,३५१(२),३५२,३५६(२), २९२,२९६ व २२४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉन्स्टेबल करत आहेत.दरम्यान या इसमावर कोपरगाव पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close