न्यायिक वृत्त
…या उपसरपंच निवडीलाउच्च न्यायालयाची स्थगिती !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील वडगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच अरुणा गोपीनाथ केदार यांना पदावरून हटविण्यासाठी सदस्यांनी केलेल्या ठरावाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन न्या.एस.जी.चपळगावकर यांनी येत्या ८ जुलै २०२६ रोजी पुढील सुनावणी घेण्याचा तसेच उपसरपंचपदाची निवडणूक पुढील सुनावणीपर्यंत स्थगित ठेवण्याचा आदेश दिला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्तींनी या सुनावणीबाबत काही मुद्दे उपस्थित केले असून त्यात अविश्वास आणणाऱ्या सदस्यांनी उपसरपंचावर अविश्वास दाखल करण्याच्या बैठकीसाठी उपसरपंच केदार यांना सहभागी होण्याची संधी दिली नाही.बैठकीची माहिती जाणीवपूर्वक गोंधळात टाकणारी होती तसेच कायदेशीर तरतुदींचे पालन न करता अविश्वास ठराव प्रक्रिया राबविण्यात आली आदी मुद्द्यांचा समावेश आहे.या निकालाबाबत कोपरगाव तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
या प्रकरणाची माहिती अशी की,”वडगांव ग्रामपंचायतीच्या तत्कालीन उपसरपंच
अरुणा गोपीनाथ केदार यांच्या पदाला आव्हान देत ग्रामपंचायतीमधील काही सदस्यांनी त्यांच्या विरोधात दिनांक २३ मार्च २०२६ रोजी अविश्वास ठराव मंजूर केला होता.त्यानंतर ग्रामपंचायतीने जा.क्र.०९ / २०२६, दि.२१ जून २०२६ नुसार उपसरपंचपदाची निवडणूक घेण्याचे जाहीर केले होते.या निर्णयास आव्हान देत केदार यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.त्यावर नुकतीच दि.२४ जून रोजी सुनावणी होऊन न्या. चपळगावकर यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ जुलै २०२६ रोजी करण्याचे आदेश देऊन तोपर्यंत वडगांव ग्रामपंचायतीने उपसरपंचपदाची निवडणूक स्थगित ठेवावी असा आदेश दिला आहे.हा आदेश देताना न्यायमूर्तींनी काही मुद्दे उपस्थित केले असून त्यात अविश्वास आणणाऱ्या सदस्यांनी उपसरपंचावर अविश्वास दाखल करण्याच्या बैठकीसाठी उपसरपंच केदार यांना सहभागी होण्याची संधी दिली नाही.बैठकीची माहिती जाणीवपूर्वक गोंधळात टाकणारी होती तसेच कायदेशीर तरतुदींचे पालन न करता अविश्वास ठराव प्रक्रिया राबविण्यात आली आदी मुद्द्यांचा समावेश आहे.

या प्रकरणाच्या सुनावणीत याचिकाकर्त्या अरुणा केदार यांच्यावतीने ॲड. गणेश गाढे, ॲड.पार्थ शिंदे यांनी बाजू मांडली तर राज्य शासनाच्यावतीने ॲड.सांगळे यांनी काम पाहिले आहे.याचिकेची सुनावणी आता ८ जुलै २०२६ रोजी होणार असून या सुनावणीकडे कोपरगाव तालुक्यातील ग्रामस्थांसह राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.उपसरपंच अरुणा केदार या कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गोपीनाथ केदार यांच्या धर्मपत्नी आहेत.



