कोपरगाव तालुका
कोपरगावचे लोक करंटे,आ. कोल्हेची जीभ घसरली वकील संघात प्रचारा दरम्यानची घटना !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव शहरातील लोक करंटे असून आपल्याला निळवंडेचे पाणी आणण्यास मदत करीत नसल्याचा आरोप करत कोपरगावच्या आ. स्नेहलता कोल्हे यांची कोपरगाव शहरातील एका प्रचार कार्यक्रमादरम्यान जीभ घसरल्याची विश्वसनिय मात्र धक्कादायक माहिती हाती आल्याने कोपरगाव शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या बाबत आमच्या प्रतिनिधीने वकील संघाचे सदस्य व विधीज्ञ योगेश खालकर यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.व आपणच कोपरगावला बंद जलवाहिनीने पाणी दिल्यास गोदावरीचे उजवा व डावा हे दोन्ही कालवे कोरडे पडणार असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणल्यावर आ. स्नेहलता कोल्हे यांनी हे आकांडतांडव केले असल्याचे सांगितले आहे. यांच्या पूर्वसुरींनी यापूर्वी निळवंडेचे पाणी दुष्काळी शेतकऱ्यांना देतो म्हणून चाळीस वर्ष सत्ता उपभोगली आहे.आता त्यांच्या आगामी पिढ्या त्याच रस्त्याने जात असल्याने हि बाब अत्यंत निंदनीय असल्याचे सांगितले आहे.
राज्यातील विधानसभेची 288 जागांसाठी निवडणूक येत्या 21 ऑक्टोबर रोजी संपन्न होत आहे.नामनिर्देशन पत्र सात ऑक्टोबर रोजी माघार घेतल्यानंतर या निवडणुकीला रंग भरण्यास प्रारंभ झाला असून आता सर्वच पक्षांचा व त्यांच्या उमेदवारांचा प्रचार जोमाने सुरु आहे.त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा उठत असून त्यातून अनेक करमणुकी होत आहे,तर काहींच्या जीभा घसरत असल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहे. कोपरगाव विधानसभा निवडणूकही सध्या गाजत असून या निवडणुकीत प्रस्थापित भाजपच्या विद्यमान आ. स्नेहलता कोल्हे या युतीकडून तर राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे हे आघाडीकडून आपले नशीब आजमावत आहे.तर कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे व गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे हे अपक्ष निवडणूक रिंगणात असून वंचित आघाडीकडून अशोक गायकवाड हे हि आपले नशिबाला हाक देत आहे.गावोगाव कोपरगाव शहरात सभांना सध्या उत आला असून अनेक हौशे, नवशे, गवशे आपला घसा साफ करताना आढळत आहे.कोणी तर्कसंगत बोलतात तर कोणी तर्कविसंगत बोलताना आढळत आहे.त्यातून अनेक जमती- जमती घडत आहे.कोपरगावात वकील संघ म्हणजे प्रतिष्टीत व्यक्तींचा समूह व थापा न पचण्याची जागा.वास्तविक उच्च विद्या विभूषित व पदव्युत्तर व्यक्तींकडे आपले दिवे पाजळण्याची कोणालाही गरजही नाही तरी या पलीकडे जाऊन कोणी आपले विचार मांडण्यासाठी जात असतील तर त्यातून कोणाचे पोट दुखण्याचे कारणही नाही.त्यामुळेच वकिलाच्या दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत प्रचार करण्यास जाण्यास अनेकांना मोह आवरत नाही.कोपरगावच्या आ. स्नेहलता कोल्हे या काल दुपारी साडेचारच्या दरम्यान गेल्या आणि त्यांनी नको त्या विषयाला हात घातला. निळवंडेचे पाणी आणणे हि तशी 48 वर्षांपासूनची रंग बदलून दर निवडणुकीत आलटून -पालटून वापरण्याची थाप.आता त्याचे रूपांतरण शिर्डी,कोपरगावला बंद जलवाहिनीने पाणी देणार ! अशी चौथ्या पिढीत रूपांतरण झाले आहे.
कोपरगाव विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पुणतांबा येथे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुंनगुंटीवार यांनीही,”आपण निळवंडेच्या कालव्यांना बाराशे कोटींचा निधी मंजूर केल्याची “मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचीच” रि” ओढली असून संगमनेर दौऱ्यात त्यांनी निळवंडेसाठी बाराशे कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केल्याची थाप मारली होती.मात्र आमच्या प्रतिनिधीने ती या पूर्वीच उघड केल्याने स्थानिक सत्ताधारी तोंडघशी पडले होते.
बाटली तीच फक्त थाप नवी एव्हढेच त्याचे रूपांतरण.तरीही अनेकांना निळवंडेच्या पाण्याचे स्वप्न पडत आहे.अर्थात हे आजचे भाजप अर्थात कोल्हे गटाला.व ते केवळ आगामी कोपरगाव शहरातील मतांवर डोळा ठेऊन.हि थाप म्हणजे कोणत्याही परिणामांची तमा न बाळगता केवळ निवडणूका जिंकणे आपल्या कडच्या कालातीत राजकीय संस्कृतीतील बदमाशीचा हा एक भाग आहे.जनतेच्या अज्ञानपणा आणि भोळसरपणातून हा अन्याय. पैशाचा माज दाखवून अव्याहतपणे सुरु आहे.मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने आजच औरंगाबाद खंडपीठात,” निळवंडेच्या बंदिस्त जलवाहिणीचा निकाल असून तो आपल्याच बाजूने लागणार” असे जाहीर सांगणे हि बाब न्यायालयाला आपल्याच दावणीला बांधल्याची प्रकर्षाने जाणीव करून देणारी ठरली आहे. तर सत्तेच्या माजाचे अभद्र प्रदर्शन करणारी आहे.याची किंचितही जाणीव या नेत्यांना होऊ नये हि बाब लोकशाहीच्या नरडीला नख लावणारी आहे.हि जाणीव खरे तर मतदारांना होण्याची गरज आहे.कारण चुकीच्या मागण्या करायच्या व सत्तेच्या जोरावर 48 वर्ष दुष्काळी गावातील जनतेला फसवून झाल्यावर तेच लिंबू कोपरंगावसह शिर्डी व इतरांना द्यायचे हि बाब आता वकील संघचं नाही तर सामान्य माणूसही ओळखून आहे. त्यामुळे जनतेला हि बाब पुरेपूर पटल्याने व त्याची प्रचिती या थापेबाज नेत्यांना पदोपदी येत असल्याने आता सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकण्यास कारणीभूत झाली आहे.त्यातूनच जनतेला “करंटे” म्हणण्याचे धाडस होऊ शकते.यातून जनतेला जो संदेश जायचा तो गेला आहे.अवैध वाळू,रस्त्यांचा कागदावरच केलेल्या साडेतीनशे कोटींच्या कामांचा बोलबाला,प्रत्येक कामातील टक्केवारी,बस स्थानक,व साईबाबा कॉर्नर ते वैजापूर रस्त्याचे काम अचानक महिनाभर ठेकेदारांना का बंद करावी लागली होती याची उत्तरे जनतेला मिळाली आहे.व त्याची अनुभूती आता सत्ताधाऱ्यांना पदोपदी येत असल्याने ते आपल्याच नगरसेविका,नगरसेवक,पदाधिकारी,प्रमुख कार्यकर्ते यांचेवर का घसरत आहे ? याचीही उत्तरे सर्वांना मिळाली आहे.फक्त प्रतीक्षा 21 ऑक्टोबरची आहे इतकेच.