जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

अखेर ते आंदोलन सुरू,..या पदाधिकाऱ्याने भेट देऊनही मार्ग निघेना!

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)
 

  कोपरगाव शहरानजीक असलेल्या साईबाबा चौक परिसरात असलेली महार वतनाची ५०.३३ एकर जमीन परस्पर वाटून घेणाऱ्या आणि ०१ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून त्या जमिनीची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्यांच्या विरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागणीसाठी नगरपरिषद आणि महसूल विभागाला जाग आणण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी आज सकाळी 10 वाजता डॉ.आंबेडकर स्मारकासमोर बेमुदत उपोषण  सुरू केले असून आज नगराध्यक्ष पराग संधान व मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी आंदोलनकर्त्यांनी चर्चा करून पाहिली मात्र त्यावर मार्ग निघाला नसल्याची माहिती राजू कोपरे यांनी दिली आहे.

कोपरगाव शहरातील आमच्या वडिलोपार्जित महार वतनाच्या जमिनी आम्हाला परत द्या या प्रमुख मागण्यासाठी आज डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले तो क्षण.

“आज पहिल्या दिवशीच कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष पराग संधान यांनी सायंकाळी 05 वाजता आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलन कर्त्यांची भेट घेऊन ही आंदोलन संपविण्यासाठी चाचपणी केली असल्याचे मानले जात आहे.मात्र याबाबत पालिकेकडे सविस्तर कागदपत्रे नसल्याची माहिती हाती आली असून त्यांनी आंदोलनकर्त्यांना,”तुमच्याकडे काही माहिती असेल तर ती द्या,आम्ही यावर चर्चा घडवून मार्ग काढू”  असे आश्वासन दिले आहे”-बाळासाहेब (राजू)कोपरे,आंदोलनकर्ते,महार वतन जमिनी.

  याबाबत सविस्तर माहिती अशी की,” कोपरगाव ग्रामीण हद्दीत गट क्रमांक अनुक्रमे ५,६,७,८,९ हे पूर्वीचे ०५ गट क्रमांकाच्या महार वतनाच्या जमिनी आहेत.त्याच पुढे सिटी सर्व्हे होऊन त्याचा क्रमांक हा १९३५ झाला आहे.या ५०.३३ एकर क्षेत्राची आजची किंमत जवळपास ०१ हजार कोटी रुपयांच्या जवळपास आहे.हे आमचे वडिलोपार्जित महार वतनाचे क्षेत्र आहे हे तहसील कार्यालय,प्रांत कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालयात सिद्ध झाले आहेच पण सेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव यांनी केलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या याचिकेत हे सिद्ध झाले आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी महात्मा गांधी प्रदर्शन ट्रस्टची अवैध नोंद हटवली आहे.वर्तमानात आंदोलनकर्त्यांनी केलेल्या तक्रारीत केलेल्या पुराव्यात मंडलाधिकारी यांनीही ही जमीन महार वतनाची म्हणजेच आमच्या वाली वारसांची असल्याचा अहवाल दिला असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे.कोपरगाव शहरातील रहिवासी असलेले दुशिंग व कोपरे हे त्याचे कायदेशीर वारस आहे हे सप्रमाण सिद्ध झाले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

     मात्र १९२० ते १९३० च्या दरम्यान हे सर्व गट क्रमांक एकत्र करून त्याला सिटी सर्व्हे क्रमांक १९३५ हा दिला असून आमचा कायदेशीर हक्क डावलला गेला असल्याचा आरोप केला आहे.या जमिनीचे ०१ ते १७ प्लॉट पाडून ते इतर असंबंध नागरिकांना वाटून दिले आहेत.यातील काही जमीन जिल्हाधिकारी यांनी १६ जुलै १९५१ रोजी १००/१०० मीटर ही जागा महार बोर्डिंग साठी आरक्षित केली असल्याचे (आज त्या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय आहे) त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.ती तत्कालीन मंत्र्यांना हाताशी धरून बळकावली असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.तर १९७१ साली तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी अवैध आदेश देऊन ती जागा सि.टी.एस.क्रमांक २११३ देऊन हडप केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

    याबाबत आम्ही मागणी केल्यावर अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांनी दि.०६ सप्टेंबर २०२४ रोजी चौकशीचे आदेश दिले असल्याचे कळवले आहे.कोपरगाव मंडलाधिकारी यांनी दिनाक १७ ऑक्टोबर २०२४ च्या केलेल्या चौकशीत सदर बाब अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या संदर्भान्वये साबित झाला असल्याचा दावा केला आहे.पूर्वी १४ ऑक्टोबर २०१३ जिल्हाधिकारी यांनी केलेल्या चौकशीत ही बाब सिद्ध झाली असल्याचा दावा केला आहे.भूमी अभिलेख यांच्या चौकशीत ही बाब उघड झाली असल्याने आता ज्यांच्या ताब्यात ही जमीन आहे त्यांची मोठी पंचाईत होणार असल्याचे बोलले जात आहे.त्याजागी आता वर्तमानात गांधी प्रदर्शन सभामंडप,कार्यालय,अनेक साधू संतांचे पुतळे,अग्निशामक स्थानक,शाळा,व्यापारी संकुले असा बराच मोठा लवाजमा पालिकेने व संबंधितांनी उभा केला असल्याचा आरोप केला आहे.त्यातच या शेतकऱ्यांनी आता संघर्ष करण्याचा चंग बांधला असून आधीच जाहीर केल्याप्रमाणे आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.त्यात महिलांचा मोठा सहभाग असल्याचे दिसून आले आहे.

   दरम्यान आज पहिल्या दिवशीच कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष पराग संधान यांनी सायंकाळी 05 वाजता आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलन कर्त्यांची भेट घेऊन ही आंदोलन संपविण्यासाठी चाचपणी केली असल्याचे मानले जात आहे.मात्र याबाबत पालिकेकडे सविस्तर कागदपत्रे नसल्याची माहिती हाती आली असून त्यांनी आंदोलनकर्त्यांना,”तुमच्याकडे काही माहिती असेल तर आम्ही यावर चर्चा घडवून मार्ग काढू”  असे आश्वासन दिले असल्याची माहिती प्रकाश सुकदेव दुशिंग,बाबासाहेब भास्कर कोपरे,देविदास गायकवाड,संतोष कोपरे यांचेसह संबंधितांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close