अपघात
दोन तरुणांचा शेततळ्यात बुडून मृत्यू!

न्यूजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील बहादराबाद ग्रामपंचायत हद्दीत गावाच्या आग्नेय बाजूस दिड कि.मी.अंतरावर असलेल्या दत्तवाडी येथील पाचोरे वस्तीवर शेतात असल्या खरीप पिकांवर फवारणी करत असलेले दोन तरुण दिपक रामचंद्र पाचोरे (वय -३३) व प्रशांत गीताराम पाचोरे (वय-३४) यांचा आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.ही घटना प्रशांत पाचोरे याच्या पत्नीचे लक्षात आली तो पर्यंत खूप उशीर झाला होता.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

“शेतकऱ्यांनी आपल्या शेती सिंचनासाठी केलेली शेततळी पाण्याचा साठा जपत असली,तरी योग्य सुरक्षा उपायांच्या अभावामुळे ती जीवघेणी ठरत आहेत.पाय घसरणे,पाणी घेण्याचा प्रयत्नात तलावाकाठी जाणे,पोहण्याचा मोह किंवा अपघातामुळे होणारे हे मृत्यू रोखण्यासाठी तातडीने कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे.त्याचा वर्तमानात अभाव असल्याने अपघात वाढत चालले आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील बहादराबाद येथे घडून प्रशांत पाचोरे आणि दिपक पाचोरे दोन तरुणांचा बळी गेला आहे.

शेततळ्यात किंवा पाण्याच्या स्रोतात बुडून तरुण आणि तरुण अथवा बालकांचे मृत्यू होणे ही वर्तमानात अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक बाब बनली आहे.सिंचनासाठी केलेली शेततळी पाण्याचा साठा जपत असली,तरी योग्य सुरक्षा उपायांच्या अभावामुळे ती जीवघेणी ठरत आहेत.पाय घसरणे,पाणी घेण्याचा प्रयत्नात तलावाकाठी जाणे,पोहण्याचा मोह किंवा अपघातामुळे होणारे हे मृत्यू रोखण्यासाठी तातडीने कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

शेततळ्यांभोवती संरक्षक जाळी किंवा कुंपण नसणे.ल्युसिट किंवा प्लास्टिक अस्तरीकरणामुळे तळ्याच्या काठावर पाय घसरणे.पोहण्याचा अंदाज न आल्याने किंवा पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात जाणे.सुरक्षेच्या सूचना किंवा इशाऱ्याचे फलक लावले गेलेले नसणे आदी कारणाने हे मृत्यू चिंताजनक ठरत आहे.अशीच घटना आज शिर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत व कोपरगाव तालुक्यातील बहादराबाद शिवारात आज सकाळी ११.३० वाजता घडली आहे.वर्तमानात पाऊस थांबला असल्याने आपल्या गट क्रमांक १०४ मधील खरीप पिकांवर रोगराई वाढल्याने पाठीवर पंप घेऊन फवारणी करण्याचे काम करत होते.मयत दोन्ही तरुण हे पंपातील पाणी संपल्याने तळ्यावर पाणी घेण्यासाठी गेले असता त्यांचा पाय घसरून तोल जाऊन ते पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.यातील प्रशांत पाचोरे याचे पाठीवर फवारणी करण्याचा पंप असल्याची माहिती हाती आली आहे.तो पाण्यात पडल्याने त्याला वाचवण्याचे प्रयत्नात दिपक पाचोरे गेला असावा.मात्र त्यात दोघांना हकनाक जीव गमवावा लागला आहे.

दरम्यान या दुर्दैवी घटनेबद्दल शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे,कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ.आशुतोष काळे,विधानपरिषदेचे आ.विवेक कोल्हे,गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ॲड.अजित काळे,गोदावरी खोरे वाढीव पाणी संघर्ष समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे, कालवा कृती समितीचे अध्यक्ष रूपेंद्र काले आदींनी दुःख व्यक्त केले आहे.आदींनी दुःख व्यक्त केले आहे.
दरम्यान आपला पती प्रशांत पाचोरे हे का येईना म्हणून पत्नी धनश्री पाचोरे ही शेतात त्यांना पाहण्यास गेली शेतात दिसेना त्यामुळे तिने तलावाच्या दिशेने धाव घेतली असता ही दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.यातील दिपक पाचोरे या पाण्यात आढळून आल्याने त्याला ताबडतोब काढून उपचारार्थ शिर्डी येथील साई संस्थानच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.तर दिपक पाचोरे हा तलावात सापडत नसल्याने अखेर उत्खनकाच्या (जे.सी.बी.)च्या सहाय्याने शेततळे फोडून दिले असता त्यात तो मृत तरुण आढळून आला आहे.त्यासाठी एन.डी.आर.एफ.च्या पथकाची मदत घेण्यात आली असल्याची माहिती बहादराबादचे माजी सरपंच विक्रम पाचोरे यांनी दिली आहे.घटनास्थळी कामगार तलाठी किशोर गटकळ यांनी धाव घेतली आहे.या घटनेने बहादराबाद,जवळके,वेस सोयगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान ही घटना घडल्यावर शिर्डी येथील साईबाबा संस्थान,राहाता येथील नगरपरिषद,कोपरगाव येथील नगरपरिषदेच्या अग्निशामक बंब आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन मदतकार्य केले असल्याची माहिती हाती आली आहे.त्याबाबत ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले आहे.



