आरोग्य
…या हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी अत्याधुनिक उपकरण देणगी

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान संचलित श्री साईबाबा हॉस्पिटल न्यूरोसर्जरी विभागासाठी सुमारे ४९ लाख रुपये किमतीचे ‘हाय स्पीड ड्रिल सिस्टीम फॉर न्यूरोसर्जरी’ हे अत्याधुनिक वैद्यकीय उपकरण देणगीस्वरूपात प्राप्त झाले आहे.प्रिझ्मा ग्लोबल लिमिटेडच्या वतीने कंपनीचे संस्थापक अध्यक्ष श्रीराम अय्यर यांनी ही महत्त्वपूर्ण देणगी संस्थानला प्रदान केली असल्याची माहिती संस्थानचे वतीने देण्यात आली आहे.

दरम्यान न्यूरोसर्जरीतील मेंदू व मज्जासंस्थेशी संबंधित विविध गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी हे अत्याधुनिक उपकरण अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.या उपकरणामुळे शस्त्रक्रियांची अचूकता वाढण्यास, उपचार अधिक प्रभावी होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास यावेळी रुग्णालय प्रशासनाचे वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
आज या अत्याधुनिक उपकरणाचे श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते विधिवत पूजन करुन लोकार्पण करण्यात आले.
या प्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ.प्रीतम वडगावे,न्यूरोसर्जन डॉ.संतोष उनवणे,डॉ.विश्वनाथ कामतगी,बायोमेडिकल इंजिनिअर श्रद्धा कोते,प्रणाली कांबळे,कार्तिक पांगरकर, सहाय्यक अधीसेविका मंदा थोरात यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



