पुरस्कार,गौरव
कोपरगाव येथील दोन अभियंत्यांना पुरस्कार प्रदान !

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
पायाभूत सुविधांची निर्मिती करताना गुणवत्ता राखणे महत्त्वाचे असते.काम दर्जेदार झाले नाही तर लोकांचा रोष निर्माण होतो.त्यामुळे कामाचा दर्जा व गुणवत्ता राखण्यासाठी अभियंत्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत.डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपले काम अधिक प्रभावी होईल,यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी अहिल्यानगर जिल्हा परिषदेत एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

दरम्यान यावेळी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा कोपरगाव उपविभागाचे उपअभियंता अश्विन वाघ यांना,’ आदर्श अभियंता पुरस्कार’ तर जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग कोपरगाव येथील रवींद्र भाऊसाहेब घारे यांना,’आदर्श स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे.त्यावेळी अन्य 16 जणांना पुरस्कार मुख्यकार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचे हस्ते पुरस्कार देण्यात आला आहे.या पुरस्काराबद्दल या सर्व अभियंत्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या हे एक भारतातील कर्नाटक राज्यातील चिकबळ्ळापूर तालुक्यातील कोलार जिल्ह्यातील मुद्देनहळ्ळी या गावी जन्मलेले समर्थ अभियंते व नागरिक होते.सन-१९५५ मध्ये त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च सन्मान मिळाला होता.ब्रिटीशांनी त्यांना,त्यांनी केलेल्या जनहिताच्या चांगल्या कामामुळे ‘नाईट’ या पुरस्काराने सन्मानित केले होते.भारतात त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी १५ सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून पाळला जातो.त्या निमित्त आदर्श अभियंत्यांना चांगल्या कामासाठी प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार देण्यात येतो. सर विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर जिल्हा परिषदेत ‘अभियंता दिन’ जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ‘उत्कृष्ट अभियंता पुरस्कार’ वितरण कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते.त्यावेळी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा कोपरगाव उपविभागाचे प्रभारी उपअभियंता अश्विन वाघ व अभियंता सहाय्यक रवि घारे या दोघांना पुरस्कार देण्यात आला आहे.त्यांच्या या कार्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सदर प्रसंगी यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक,मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे,कार्यकारी अभियंता सिद्धार्थ वाहूळे,राज्याध्यक्ष सचिन चव्हाण,मुख्य सल्लागार सुहास धारासूरकर,संघटनेचे अध्यक्ष राजू दिघे,जिल्हा सचिव अभिमन्यू क्षीरसागर,राज्य उपाध्यक्ष मयूर मुनोत,गणेश सवाई,रवींद्र गिते,सचिन दिनकर,महेश पालवे,शैलेंद्र पांढरे,शिवाजी महांडुळे आदी उपस्थित होते.
दरम्यान यावेळी २०२३-२४,२०२४-२५ व २०२५-२६ या तीन वर्षांचे उत्कृष्ट अभियंता पुरस्कार वितरित करण्यात आले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.यात एकूण १८ अभियंत्यांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.
यावेळी मुळीक म्हणाले की,”अभियंता दिन संघटनेने उत्कृष्ट नियोजन करून चांगला कार्यक्रम घडवून आणला आहे.उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सन्मान झाल्याने पुरस्कारार्थीना आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा निश्चित मिळेल.जिल्हा परिषदेतील अभियंत्यांचे काम आव्हानात्मक नक्कीच आहे.
दरम्यान जिल्हा परिषदेत आयोजित अभियंता दिनानिमित्त उत्कृष्ट अभियंत्यांना सीईओंच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले असून शेवटी जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू दिघे यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.



