कोपरगाव तालुका
पूरपाण्यातून सर्व साठवण तलाव भरून घ्या-आवाहन

न्यूजसेवा
कोपरगांव -(प्रतिनिधी)
गोदावरी कालव्यांना पूरपाणी सोडण्यात आले आहे.या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून कोपरगाव मतदार संघातील सर्व पाझर तलाव,गाव तळे,बंधारे आणि ओढे पूर्ण क्षमतेने भरून घ्यावेत असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

“गोदावरी उजव्या व डाव्या कालव्याला सोडण्यात आलेल्या पूर पाण्यातून मतदार संघातील सर्व पाझर तलाव,गाव तळे,बंधारे आणि ओढे पूर्ण क्षमतेने भरून घ्यावेत.पूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे खालावलेली भूजलपातळी भरून निघण्यास काही प्रमाणात का होईना मदत होणार आहे”- आ.आशुतोष काळे,कोपरगाव मतदार संघ.
राज्यात पावसाचा जोर वाढला असून, हवामान विभागाने नुसार अनेक जिल्ह्यांत रेड व ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.लोणावळ्यात २३ जुलैपर्यंत ३,०६७ मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली तर नाशिक जिल्ह्यातही पावसाने कहर केला आहे,परिणामी गोदावरी नदीला मोठापूर आला आहे.या शिवाय नद्या,नाले आणि ओढ्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.त्यामुळे गोदावरी दोन्ही कालव्यांना पूर पाणी सोडले आहे.धरणक्षेत्रात दमदार हजेरी लावल्यामुळे नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीला ओव्हर फ्लोचे पाणी सोडण्यात आले होते.त्यावेळी पूर पाणी गोदावरी कालव्यांना सोडण्यात यावे अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पा.यांच्याकडे केली होती.त्या मागणीनुसार गोदावरी उजव्या व डाव्या कालव्याला पुराचे पाणी सोडण्यात आले असल्याचा दावा केला आहे.

सध्या जरी संततधार पाऊस सुरू असला तरी हवामान खात्याने यंदा पाऊस कमी पडण्याचा दिलेला अंदाज आणि अल निनोचा धोका लक्षात घेऊन पुढील पाणी टंचाईच्या नियोजनासाठी आत्ताच खबरदारी घेणे आवश्यक आहे.कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर सोयाबीन,बाजरी,मका,कापूस आणि भुईमूग यांसारख्या विविध खरीप पिकांची पेरणी केली आहे.जर आगामी काळात खरीप पिकांसाठी आवश्यक पर्जन्यमान झाले नाही तर खरीप हंगाम धोक्यात येवून अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढू शकतात.मागील चार दिवसांपासून राज्याच्या विविध भागांसह धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरु आहे.त्यामुळे गोदावरी उजव्या व डाव्या कालव्याला सुरु असलेल्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून कोपरगाव मतदार संघातील सर्व पाझर तलाव,गाव तळे,बंधारे आणि ओढे पूर्ण क्षमतेने भरून देण्याच्या सूचना आ.काळे यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत.
गोदावरी उजव्या व डाव्या कालव्याला सोडण्यात आलेल्या पूर पाण्यातून मतदार संघातील सर्व पाझर तलाव,गाव तळे,बंधारे आणि ओढे पूर्ण क्षमतेने भरून घ्यावेत.पूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे खालावलेली भूजलपातळी भरून निघण्यास काही प्रमाणात का होईना मदत होणार असल्याचे आ.काळे यांनी शेवटी म्हटले आहे.


