सण-उत्सव
…या शहरात दहीहंडी उत्साहात संपन्न!

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज दहीहंडी यंदा साध्या स्वरूपात साजरी करण्यात आली उत्सवावरील अनावश्यक खर्च टाळत बक्षिसाची रक्कम आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदर कार्यक्रमादरम्यान इस्कॉनच्या भजनी मंडळाने भक्तिमय भजनांचे सादरीकरण केले.परमपूज्य रमेशगिरीजी महाराज यांनीही भजन सादर केल्याने कार्यक्रमस्थळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसून आले आहे.
दहीहंडी हा हिंदू सण गोकुळाष्टमीच्या (श्रीकृष्ण जन्म) दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा एक अत्यंत उत्साही आणि लोकप्रिय सांस्कृतिक उत्सव आहे.महाराष्ट्रात,विशेषतः महानगरे आणि ग्रामीण भागात हा सण मोठ्या प्रमाणावर आणि प्रचंड उत्साहाने साजरा केला जातो.भगवान श्रीकृष्ण लहानपणी आपल्या सवंगड्यांसोबत शेजाऱ्यांच्या घरातील उंचावर टांगलेले दही,दूध आणि लोणी चोरून खात असत.या बाललीलेची आठवण म्हणून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो.श्रीकृष्ण आपल्या मित्रांच्या पाठीवर चढून उंचावरील गाडगे (हंडी) फोडायचे.हाच प्रकार आज मानवी मनोऱ्यांच्या स्वरूपात पाहायला मिळतो,जो सांघिक भावना आणि एकतेचा संदेश देतो.कोपरगाव शहर त्याला अपवाद नाही.अलीकडील काळात संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि आ.विवेक कोल्हे यात हिरीरीने सहभाग नोंदवत असल्याचे दिसून येत आहे.या प्रतिष्ठानच्या वतीने यंदाही दहीहंडीची परंपरा कायम ठेवण्यात आली; मात्र देशातील विविध भागातील नैसर्गिक आपत्तीजन्य परिस्थितीची जाणीव ठेवून भव्य आयोजनावरील खर्च टाळून तो मदतकार्यासाठी वळविण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यामुळे परंपरेला छेद न देता उत्सवातून माणुसकीचा संदेश देण्यात आला आहे.

यावेळी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांच्यासह युवासेवक,प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गोपाळकाल्याच्या पावन पर्वानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मानाच्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दहीहंडी फोडण्यात आली.यावेळी उत्सवातील बक्षिसाची रक्कम देशातील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे चेकद्वारे सुपूर्द करण्यात आली आहे.संकटाच्या काळात उत्सवाचा आनंद कायम ठेवत गरजूंच्या मदतीसाठी हात पुढे करण्याचा हा उपक्रम सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श ठरला.



