कृषी विभाग
सत्ता असूनही कर्जाबाबत जाब विचारण्याचा निर्णय ?
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात शिवसेना सहित महाआघाडीचे सरकार असताना व या सरकार सह या लोकसभा मतदारसंघाचे खा,सदाशिव लोखंडे यांनीही वारंवार बँकांना आदेश दिले असताना व शेतकऱ्यांचा खरीप हंगाम संपला असतानाही बँका अद्याप शेतकऱ्यांना आपल्या दारीही थांबून देत नसताना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांना जेरबंद करण्याचा आश्चर्यकारक इशारा दिला आहे.त्याबद्दल उलटसुलट चर्चला उधाण आले आहे.
दरम्यान राज्यात ज्या सरकारची सत्ता असते त्यांचा शब्द बँकांसाठी अंतिम मानला जातो.मात्र शिवसेना या पूर्वी भाजप सोबत मांडवली करूनही व आता स्वतंत्र सत्तेत येऊनही काही उपयोग होताना दिसत नाही.सत्ता नसताना हि मंडळी आमच्या हाती सत्ता द्या आम्ही अमुक अमुक मंजूर करू तमुक-तमुक योजना देऊ अशा घोषणांचा सुकाळ जनतेने खूप ऐकला आहे.आज सत्तेत असतानाही शेतकऱ्यांना न्याय मिळणार नसेल तर अशा वांजोट्या सत्तेचा काहीही उपयोग नाही अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांत उमटत आहे.दुधाला भाव भेटत नाही,नाशिकच्या विभागीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी निळवंडेसाठी ११०० कोटी रुपयांची घोषणा करूनही आठ महिने उलटले तरी अद्याप एक दमडीची तरतूद झाली नाही-रुपेंद्र काले, अध्यक्ष निळवंडे कालवा कृती समिती
महाराष्ट्र शासनाने महात्मा जोतीराव फुले कर्ज माफीच्या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना आधार देऊन कर्जमाफी करतांनाच पुढील पिकांसाठी बँकांनी तातडीने कर्ज द्यावे असा शासन आदेश काढला मात्र अजूनही राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नसून शेतकऱ्यांना मानसिक त्रास देण्याचे काम सुरु आहे अशा बँकांनी शेतकऱ्यांना तातडीने कर्ज द्यावे अन्यथा सोमवार दि.३१ ऑगष्ट पासून या अधिकाऱ्यांना घेरावा घालून जाब विचारून कार्यलयामध्येच जेरबंद करण्याचा आश्चर्य कारक इशारा उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी दिला आहे.
त्यांनी प्रसिद्धीपत्रकामध्ये पुढे म्हटले आहे की,राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय घेतले एक आदर्श कर्जमाफीची योजना घेऊन शेतकऱ्यांना आधार दिला मात्र कोपरगाव तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्र,बँक ऑफ इंडिया,युनियन बँक,अशा विविध बँका शेतकऱ्यांना थातुरमातुर उत्तरे देऊन त्यानां वाटाण्याच्या अक्षता दाखवत आहे.कर्जमाफीत बसलेल्या शेतकऱ्यांना तसेच नवीन कर्ज मागणाऱ्या शेतकऱ्यांना उडवा-उडवीची उत्तरे देऊन अरेरावीची भाषा वापरून शेतकऱ्यांच्या अस्मितेशी बँक मॅनेजर खेळत आहेत.यावर्षी नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे अतिपावसाने पिकांची मोठी नुकसान झाली आहे.कधी पाऊस नाही तर कधी अतिपाऊस शेतकऱ्यांना सर्व बाजूंनी अडचणी असून कर्जमाफी मिळूनही शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे.खरिपाची व रब्बीला दरवर्षी वेळेवर शेतकऱ्यांना कर्ज मिळावे याकरिता खा.सदाशिव लोखंडे यांनी सर्व बँक व्यवस्थापक,लीड बँकेचे अधिकारी यांचे समवेत कोपरगाव येथे बैठकही घेतली होती मात्र सबंधित बँकेचे मॅनेजर शेतकऱ्यांना त्रास देत असून नाबार्डच्या धोरणांनाही बँका केराची टोपली दाखवत आहेत.याबाबत संबंधित अधिकाऱ्यांच्या तक्रारी लीड बँकेचे मॅनेजर, जिल्हाधिकारी,खा.सदाशिव लोखंडे,कृषिमंत्री दादाजी भुसे,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही केलेले असून शेतकऱ्यांना तातडीने कर्ज न मिळाल्यास ३१ ऑगस्ट पासून प्रत्येक शाखेत जाऊन शिवसेना-युवासेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक तसेच शेतकरी सेनेचे सर्व पदाधिकारी संबंधित बँक व्यवस्थापकास जाब विचारून त्याला जेरबंद करण्याचा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लबडे यांनी शेवटी दिला आहे.