आरोग्य
कोपरगावात रक्तदान आवाहनाला मिळाला प्रतिसाद
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असा प्रचार आणि प्रसार होत असला तरी मुळात रक्तदात्याची संख्या ही खूप कमी आहे. भारतात केवळ ०.६ टक्के रक्तदान केले जाते. यामुळे देशात रक्ताची कमतरता खूप भासते.ती दूर करण्यासाठी तरुणांनी पुढे येणे गरजेचे आहे.-आ. काळे
कोरोना विषाणूने बाधित रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे.त्याच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी देशात एकवीस दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे जीवनाश्यक वस्तूंची देवाण घेवाण वगळता सर्व काही ठप्प आहे.लॉकडाऊन असल्यामुळे नागरिकांना बाहेर पडता येत नाही. वर्षभर अनेक सामाजिक संस्था,ट्रस्ट रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असतात व अनेक शासकीय रुग्णालय व रक्तपेढीमध्ये नियमित रक्तदान करता येत असल्यामुळे तातडीच्या रुग्णांना आवश्यक तो रक्तपुरवठा करूनही रक्तपेढीमध्ये रक्तसाठा शिल्लक राहत असे.मात्र रक्तदान शिबिर होत नसल्यामुळे व कोरोना बाधित अंत्यवस्थ रुग्णांना रक्ताची गरज पडत असल्यामुळे रक्त टंचाई निर्माण झालेली आहे.
त्या पार्श्वभूमीवर अशा आपत्कालीन परिस्थितीत कोपरगाव विधानसभा मतदार संघातून रक्तदात्यांच्या रक्तदानातून राज्यात निर्माण झालेला रक्ततुटवडा भरून निघण्यास मदत व्हावी या उद्देशातून आ.आशुतोष काळे यांनी संजीवनी रक्तपेढी कोपरगाव यांच्या सहकार्याने लॉकडाऊन संदर्भातील प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सामाजिक अंतर ठेवून रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते.लॉकडाऊनचे सर्व नियम पाळले जावे यासाठी रक्तदात्यांना सम्पर्क कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचे फोन नंबर फेवून रक्तदान करण्यासाठी संपर्क करण्यास सांगितले होते.त्यानुसार अनेक रक्तदात्यांनी देशावर आलेले महासंकट दूर करण्यासाठी आपले रक्त देऊन देशाप्रती असलेले आपले कर्तव्य बजावण्यासाठी आ. काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क करून मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी करून संजीवनी रक्तपेढी कोपरगाव येथे रक्तदाते रक्तदान करीत असल्याची माहिती संजीवनी रक्तपेढीच्या संचालिका डॉ.नीता पाटील यांनी दिली आहे.