शैक्षणिक
कविता ही आनंदी जीवन जगण्याचे सशक्त माध्यम-डॉ.उपाध्ये

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कविता ही आनंदी जीवन जगण्याचे सशक्त माध्यम असून कवितेद्वारे समाज-मनातील भाव-भावना तसेच कष्टकऱ्यांचा आवाज,सामाजिक जाणीवा आदींना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात असल्याचे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे वक्ते डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी नुकतेच कोपरगाव येथे बोलताना केले आहे.
“सुदृढ आणि निरोगी शरीरासाठी आपण योग्य आहाराबरोबरच विनोदी वागंङ्मय देखील वाचले पाहिजे.तसेच खळखळून हसले पाहिजे.हसण्याने हृदयाचा तसेच चेहऱ्यावरील स्नायूंचा व्यायाम होतो आणि मनावरील ताण कमी होतो.आजच्या जागतिकीकरणाच्या आणि धावपळीच्या युगात मनुष्य वाचन आणि हसणे विसरला आहे”-डॉ.विजयकुमार जोशी,कविवर्य.
पुणे येथील बहि:शाल शिक्षण मंडळ-सावित्रीबाई फुले विद्यापीठ व के.जे.सोमैया महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने दि. ९ व १० जानेवारी रोजी डॉ.बाबासाहेब जयकर व यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव हे होते.
सदर प्रसंगी डॉ.विजयकुमार जोशी,महाविद्यालयाचे प्रा.डॉ.जे.एस.मोरे व डॉ.एस.बी.दवंगे,डॉ.बापूसाहेब भोसले,डॉ.गणेश देशमुख आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”आपण स्वतः जे जीवन जगलो तेच माझ्या कवितेद्वारे शब्दबद्ध करीत गेलो.त्यामुळे माझ्या कवितेत वाचकांना दुःख, व्यथा व कष्टाचे प्रतिबिंब पडलेले अधिक जाणवते.माझी कविता मनोरंजन कमी आणि सर्वसामान्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न अधिक करते.
सदर प्रसंगी डॉ.उपाध्ये यांनी स्वतःच्या निवडक कवितांबरोबरच ग.दि.माडगूळकर,विंदा करंदीकर,मंगेश पाडगावकर,राष्ट्रसंत गाडगेबाबा,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याही कविता सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले आहे.तसेच सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात विद्यार्थ्यांनी विविध काव्यग्रंथ आणि प्रासंगिक साहित्य वाचत राहून वाचन संस्कृती टिकवली पाहिजे.त्यातून आपल्याला समृद्ध जीवन जगण्याचा मार्ग सापडेल असेही शेवटी सांगितले आहे.
यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेचे वक्ते डॉ.विजयकुमार जोशी ‘हसण्यासाठी टॅक्स नाही’ या विषयावर बोलताना म्हणाले की “सुदृढ आणि निरोगी शरीरासाठी आपण योग्य आहाराबरोबरच विनोदी वागंङ्मय देखील वाचले पाहिजे.तसेच खळखळून हसले पाहिजे.हसण्याने हृदयाचा तसेच चेहऱ्यावरील स्नायूंचा व्यायाम होतो आणि मनावरील ताण कमी होतो.आजच्या जागतिकीकरणाच्या आणि धावपळीच्या युगात मनुष्य वाचन आणि हसणे विसरला आहे.त्यामुळेच तो मानसिक ताणाचा बळी ठरला आहे.याप्रसंगी डॉ. जोशी यांनी अनेक हलकेफुलके किस्से आणि विनोद सांगून विद्यार्थ्यांना मनमुराद हसविले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिचय केंद्र कार्यवाह डॉ.जे.एस.मोरे यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत डॉ.एस.बी.दवंगे यांनी केले. व्याख्यानमालांचे सूत्रसंचालन केंद्राचे सदस्य डॉ.आर.ए.जाधव यांनी केले.व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी डॉ.एम.बी.खोसे,डॉ.एस.एल.अरगडे,प्रा.वर्षा आहेर,प्रा.श्रद्धा सिनगर,प्रा.घुगे,प्रा.खंडिझोड आदींनी विशेष परिश्रम घेतले आहे.