शैक्षणिक
जिल्हा परिषद शाळेने केला वर्धापन दिन साजरा

न्यूजसेवा
संवत्सर (प्रतिनिधी)
शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या जोरावर राज्यात अग्रक्रम मिळविणाऱ्या संवत्सर जिल्हा परिषद शाळेचा १५५ वा वर्धापन दिन आज अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला आहे.सन-१८७१ मध्ये २७ जुलै रोजी स्थापन झालेल्या या ऐतिहासिक शाळेने आज १५५ वर्षांचा प्रेरणादायी शैक्षणिक प्रवास पूर्ण करताना नव्या यशाचा आणखी एक टप्पा गाठला आहे.

“राज्यातील जिल्हा परिषद शाळा या उपेक्षांच्या धनी ठरल्या आहेत.पण कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील जिल्हा परिषद शाळा ही वेगळी ठरली असून त्यांनी राज्यात सगळीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून टाकला असल्याचे मानले जात आहे.त्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मोठे योगदान लाभले असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक फैय्याजखान पठाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
जिल्हा परिषद शाळांची सध्याची स्थिती आणि त्यांची होत असलेली उपेक्षा हा खरोखरच अत्यंत गंभीर आणि चिंतेचा विषय आहे.ग्रामीण भागातील सर्वसामान्य,गरीब आणि शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा मुख्य आधार या शाळा आहेत.अनेक शाळांमध्ये मोडकळीस आलेल्या इमारती,पिण्याच्या पाण्याची गैरसोय आणि स्वच्छतागृहांची दुरावस्था आहे.हजारो शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने एकाच शिक्षकाला अनेक वर्ग सांभाळावे लागतात.शिक्षकांवर जनगणनेपासून ते विविध शासकीय सर्वेक्षणांपर्यंतची अशैक्षणिक कामे सोपवली जातात,ज्यामुळे अध्यापनावर परिणाम होतो.डिजिटल क्लासरूम आणि संगणक लॅबसाठी आवश्यक असलेला निधी वेळेवर उपलब्ध होत नाही.त्यामुळे या शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.मात्र कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील जिल्हा परिषद शाळा याला अपवाद ठरली असून कौतुकाला पात्र ठरली असल्याचे मानले जात आहे.या शाळेचा वर्धापन दिन मोठे उत्साहात संपन्न झाला आहे.या वर्धापन दिनाचे औचित्य साधून यावर्षी इयत्ता पहिलीमध्ये सुजय सुनील भोसले या विद्यार्थ्याचा पन्नासावा प्रवेश करण्यात आला आहे.शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर पालकांनी दाखविलेला हा विश्वास उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करून साजरा केला आहे.

सदर कार्यक्रमात कोपरगाव येथील कलाशिक्षक श्री.अमृतकर यांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष चित्रकला कार्यशाळा आयोजित केली होती.चित्र रंगविण्याच्या विविध तंत्रांचे प्रात्यक्षिक, रंगसंगती,कल्पकता आणि सर्जनशील अभिव्यक्ती याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना अतिशय प्रभावी मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कल्पनाशक्तीला रंगांची सुंदर उधळण दिली.आज संवत्सर जिल्हा परिषद शाळा राज्यातील प्रथम क्रमांकाची शाळा म्हणून ओळख निर्माण करत आहे.गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच डिजिटल शिक्षण, कौशल्याधारित उपक्रम,संस्कारवर्ग,पर्यावरण संवर्धन,कला,क्रीडा आणि विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून शाळेने शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या यशामागे शाळेचे मार्गदर्शक राजेश परजणे,जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा शालिनीताई राधाकृष्ण विखे,तसेच ग्रामस्थ आणि पालक यांचे लाभलेले बहुमोल सहकार्य मोलाचे ठरले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठबळामुळे शाळेची प्रगती दिवसेंदिवस अधिक भक्कम होत असून शिक्षण क्षेत्रात ती प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साह, आनंद आणि अभिमानाच्या वातावरणात पार पडला आहे.शाळेचे मुख्याध्यापक फैय्याजखान पठाण यांनी यावेळी शाळेच्या प्रगतीचा आढावा सादर केला आहे.



