कोपरगाव शहर वृत्त
अतिक्रमण विषयावर मोठा घोटाळ्याचा संशय – आरोप !

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांचे आदेशाने कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या प्रसिद्ध नोटीसीनुसार ३१ ऑगस्ट रोजी यासंबंधीची अंतिम जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात येऊन 03 सप्टेंबरसह दोन दिवस सुमारे 150-200 अतिक्रमणे हटवली असताना यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा संशय गुरुद्वारारोडचे व्यापारी तेजकुमार राजपाल यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला आहे.त्यामुळे कोपरगाव शहर आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे.

“कोपरगाव नगरपरिषदेने,”अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा काही व्यापारी बांधवांनी माध्यमांसमोर उपस्थित केली असून अजूनही काही व्यापारी बांधव लवकरच या बाबत जाहीरपणे भाष्य करणार असल्याच्या बाबीस दुजोरा दिला आहे.दरम्यान याबाबत आपण अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करणार असून या बाबत सखोल चौकशीची मागणी करणार आहे”- सुनील गंगूले,माजी शहर प्रमुख,राष्ट्रवादी अजित पवार गट.
कोपरगाव शहरातील सार्वजनिक रस्ते आणि मोकळ्या जागांवरील अतिक्रमण हा नागरिकांसाठी अत्यंत चिंतेचा आणि डोकेदुखीचा विषय ठरला आहे.रस्त्यालगत असलेल्या अतिक्रमणामुळे शहरात वारंवार वाहतूक कोंडी होत होती.परिणामी मुख्य बाजारपेठ आणि सार्वजनिक रस्त्यांवर व्यापाऱ्यांनी व टपऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले असून, दैनंदिन वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे दिसून आले होते.परिणामी पादचाऱ्यांची गैरसोय होत होती.त्यातच मोकाट जनावरांमुळे मागील सप्ताहात दोन नागरिकांचे बळी गेले असल्याने हा विषय अधिक संवेदनशील बनला असल्याचे उघड झाले आहे.शहरातील फुटपाथ आणि रस्त्यांच्या कडेला झालेल्या अनधिकृत बांधकांमांमुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून मुख्य रस्त्यावरून चालावे लागते.सध्याच्या सणासुदीच्या काळात बाजारपेठेत गर्दी वाढत असल्याने या अतिक्रमणांमुळे नागरिक आणि वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता.अनेक नागरिकांचे आणि प्रवाशांचे हकनाक बळी जात होते.या गंभीर समस्येची दखल घेत कोपरगाव नगरपरिषदेने ३ सप्टेंबर २०२६ पासून शहरात दोन दिवसांची धडक अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली होती.सुरूवातील मुख्य रस्त्याला ही मोहीम राबवली गेली होती.कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सुमारे 140 कर्मचाऱ्यांचे दोन ग्रुप करण्यात आले होते.याशिवाय पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांचे 08 अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश होता.हि मोहिम समाज हितासाठी राबवली असल्याचा अनेकांचा मोठा समज होता.मात्र त्याला आज गुरुद्वारारोडचे व्यापारी तेजकुमार राजपाल यांनी एक पत्रकार परिषद घेऊन छेद दिला आहे.

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान यांचेशी संपर्क केला असता त्यांनी ,”अतिक्रमणधारकाना कोणालाही पाठीशी घालणार नाही व संरक्षण देणार नसल्याचे स्पष्टीकरण देऊन राजपाल यांनी ज्यां अरोरावर केला त्या अरोरा यांनाही पालिकेने कोणतीही बांधकाम परवानगी दिलेली नाही” आणि राजपाल यांचे म्हणण्यानुसारही काही होणार नाही.जे रीतसर असेल तेच होईल,असे सांगून आर्थिक गैरव्यवहाबाबत त्यांचेकडे काही पुरावा असेल त्यांनी जरूर माध्यमांना द्यावा असे आवाहन नगराध्यक्ष संधान यांनी शेवटी केले आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की,”आपल्याला आधी नोटिस देऊन काढण्याच्या दोन तारखा दिल्या होत्या.मात्र आपण नगरपरिषद आदेशबरहुकूम आपण आपला लोखंडी जिना काढून घेतला होता.आणि दोन्ही तारखाना पालिकेच्या कारवाईची प्रतिक्षा केली असताना आपल्याला पालिका पदाधिकारी आणि नगरपरिषद अधिकारी यांचा नेमका उलटा अनुभव आला आहे.त्यांनी या रोडचे अतिक्रमण काढले तर नाही पण ज्याने रस्त्याला अडचण होईल असे आपल्याच तळमजल्यात असलेल्या अरोरा नामक एका व्यापाऱ्याने उलट बांधकाम करून पालिकेला आव्हान दिल्याने यात काही तरी काळेबेरे झाले असल्याचा संशय व्यक्त केला आहे.याबाबत आपण कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान यांचेशी संपर्क साधला असता आपल्याला समाधान कारक उत्तर मिळाले नाही अशी नाराजी त्यांनी बोलून दाखवली आहे.त्यात त्यांनी नगराध्यक्ष पराग संधान यांनी तुमचे अतिक्रमण आहे त्यामुळे ते काढावे लागेल असे सांगताना दिसून येत आहे.व्यापारी राजपाल यांनी ते अतिक्रमण आहे असे सुनावतांच त्यांनी बचावाची भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे.व त्यानंतर सूर बदलून त्यांनी,”तुमचा जिना फळावाले यांचे अतिक्रमण काढल्यावर पुन्हा तुम्ही तो ठेवा असे म्हणताना दिसून येत आहे.त्यावेळी राजपाल यांनी यावेळी,”एका महीला अधिकाऱ्याने आपण समजावून सांगूनही आपले दुकानाचे समोर असलेल्या लोखंडी जिना काढून आपल्यावर अन्याय केला असल्याचा आरोप केला आहे.त्यासाठी त्यांनी नगराध्यक्ष पराग संधान यांची एक ध्वनीफित ऐकवली असून त्यात त्यांनी आक्षेप नोंदवला आहे व आपल्या अर्जाची चौकशी करून न्याय द्यावा” अशी मागणी केली आहे.त्यामुळे आगामी काळात कोपरगाव नगरपरिषद काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे आणि व्यापाऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान याबाबत राष्ट्रवादी आ.आशुतोष काळे गटाचे माजी शहर प्रमुख सुनील गंगूले यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढून कोपरगाव नगरपरिषदेने,”अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा काही व्यापारी बांधवांनी माध्यमांसमोर उपस्थित केली असून अजूनही काही व्यापारी बांधव लवकरच या बाबत जाहीरपणे भाष्य करणार असल्याच्या बाबीस दुजोरा दिला आहे.दरम्यान याबाबत आपण अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करणार असून या बाबत सखोल चौकशीची मागणी करणार असल्याचे जाहीर केले आहे.त्याची आगामी काळात या अतिक्रमण विषयावर मोठा अकाली शिमगा होणार असल्याचे बोलले जात आहे.



