जलसंपदा विभाग
निळवंडेच्या लाभक्षेत्रात तलाव भरून द्या-कालवा कृती समितीची मागणी

न्यूजसेवा
कोपरगांव -(प्रतिनिधी)
निळवंडे आणि भंडारदऱ्याच्या पाणलोटात क्षेत्रात पावसाचे जोरदार प्रपात सुरू असून उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणातून पाणी सोडल्यानंतर आता निळवंडे धरणही काल भरून वाहते झाले आहे.भंडारदरा धरणातून आवक पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत असल्याने निळवंडे धरणातून प्रवरा नदीत पाणी सोडण्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.त्यामुळे आता निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील दुष्काळी गावातील पाझर तलाव भरून द्यावे अशी महत्वपूर्ण मागणी निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रूपेंद्र काले यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.त्याचे शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.

निळवंडे कालवा कृती समितीने उच्च व सर्वोच्च न्यायालयात आणि प्रस्थापितांविरोधात आंदोलनासह संघर्ष करून कालवे निर्माण करण्यास जलसंपदा विभागाला भाग पाडले आहे.त्यामुळे दि.३१ मे २०२३ रोजी निळवंडे कालव्यांना पाणी सोडावे लागले होते.कालवा कृती समितीने आता गोदावरी वाढीव पाणी संघर्ष समितीची स्थापना करून आता उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील ११५ टी.एम.सी.पाणी पुर्वेस वळविण्याचा चंग बांधला असून त्यासाठी उच्च न्यायालयात दि.०५ जानेवारी २०२४ रोजी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांचे विधी सहकार्याने जनहित याचिका (क्र.०५/२०२४) दाखल केली आहे.त्याबाबत उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,”निळवंडे कालवा कृती समितीने उच्च व सर्वोच्च न्यायालयात आणि प्रस्थापितांविरोधात आंदोलनासह संघर्ष करून कालवे निर्माण करण्यास जलसंपदा विभागाला भाग पाडले आहे.त्यामुळे दि.३१ मे २०२३ रोजी निळवंडे कालव्यांना पाणी सोडावे लागले होते.वर्तमानात निळवंडे आणि भंडारदरा धरणाचे पाणलोटात गत आठवडाभरापासून पावसाचे जोरदार तांडव सुरू आहे.त्यामुळे या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हिरवा=दर पाण्याची आवक सुरू आहे.परिणामी ११ हजार ०३९ दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात जोरदार पाण्याची आवक सुरू असल्याने पाणीसाठा स्थिर ठेऊन येणारे पाणी प्रवरा नदीत सोडण्यात येत आहे.काल सायंकाळी धरणातील पाणीसाठा १० हजार ०३७ दलघफू (९०.९२ टक्के) कायम ठेवून ११ हजार ९२२ क्युसेक तसेच वाकीचा ओव्हरफ्लो ०१ हजार ५७३ क्युसेक असा एकूण १३ हजार ४९५ क्युसेकने निळवंडे धरणात आवक होत आहे.परिणामी निळवंडे धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.परिणामी ०७ हजार १९७ द.ल.घ.फू. (८६.३६ टक्के) पाणीसाठा कायम ठेवून ७०० क्युसेकने धरणातून प्रवरा नदीत पाणी सोडण्यात येत आहे.पाण्याची आवक अद्याप कायम असल्याने विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

“अहिल्यानगर तसेच नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री घाटमाथ्यावर जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने जायकवाडीकडे आजपर्यंत २७ टि.एम..सी.पाणी प्रवाहीत झाले आहे.गोदावरी नदीतुन २६ टि.एम.सी.तसेच प्रवरा नदीतुन १ टि.एम.सी.पाणी जायकवाडी धरणाकडे गेले आहे.घाटमाथ्यावर पावसाचा जोर अजुनही कायम असुन गोदावरी वरील नांदुर मधमेश्वर बंधाऱ्यावरुन ४६ हजार २२७ क्युसेक्स पाणी चालु असुन प्रवरा नदीवरील ओझर बंधाऱ्यावरुन १३ हजर क्युसेक्स पाणी जायकवाडीकडे जात आहे.जायकवाडीचा उपयुक्त पाणी साठा ४३ टिएमसी झाला असुन तो ७६.६७ टि.एम.सी.या एकुण उपयुक्त पाणी साठ्याच्या ५६ टक्के आहे.जायकवाडी मध्ये पाण्याची सध्या जोरदार आवक होत आहे”-उत्तमराव निर्मळ,माजी कार्यकारी अभियंता,जलसंपदा विभाग,नाशिक.
दरम्यान,काल सकाळी संपलेल्या गत चोवीस तासांत भंडारदरा धरणात ०१हजार २२७ दलघफू पाणी नव्याने दाखल झाले असल्याची माहिती हाती आली आहे.यासह ०१ हजार ८६९ दलघफू पाणी निळवंडेत जमा झाले आहे.पाणलोटात अजूनही अधूनमधून पाऊस कोसळत असल्याने धरणात आवक वाढली आहे.मात्र निळवंडेच्या लाभक्षेत्रात मात्र अद्याप पुरेसा पाऊस नाही.त्यामुळे अद्याप पाझरतलाव आणि ओढे नाले कोरडे ठाक आहे.भुसार पिकांना पुरेसा पाऊस झालेला नाही.त्यामुळे ही पिके धोक्यात आहेत.ही भुसार पिके वाचवायची असतील तर निळवंडे कालवे वाहते करणे गरजेचे आहे.त्यासाठी निळवंडे उजवा आणि डाव्या कालव्यातून पुरपाणी सोडणे गरजेचे आहे.जलसंपदा विभागाचे संगमनेर,घुलेवाडी येथील कार्यकारी अभियंता यांनी तातडीने पाणी सोडणे गरजेचे आहे.त्यामुळे दुष्काळी भागातील भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे.
दरम्यान या प्रसिद्धी पत्रकावर निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,कार्याध्यक्ष मच्छिंद्र दिघे,गंगाधर रहाणे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,सोन्याबापू उऱ्हे सर,सचिव कैलास गव्हाणे,संघटक नानासाहेब गाढवे,सहसंघटक उत्तमराव जोंधळे,बाबासाहेब गव्हाणे,विलास गुळवे,भाऊसाहेब गव्हाणे,रंगनाथ गव्हाणे,बाळासाहेब रहाणे,तानाजी शिंदे,भाऊसाहेब शिंदे,रामनाथ ढमाले,बाळासाहेब सोनवणे,भाऊसाहेब सोनवणे,कौसर सय्यद,सचिन मोमले,वाल्मीक नेहे,सोमनाथ दरंदले,सौरभ शेळके,विठ्ठलराव देशमुख,संदेश देशमुख,बाळासाहेब कडलग,राजेंद्र निर्मळ,अर्जुन गुंजाळ आदींची नावे आणि सह्या आहेत.



