संपादकीय
नुकसान मात्र गणेशाचेच…!

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
राहाता तालुक्याची कामधेनू समजल्या जाणाऱ्या गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीचा प्रचार काल सायंकाळी ०५ वाजता संपला आहे.आता उद्या सकाळपासून मतदानास सूरुवात होणार असून त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.या निवडणुकीत सत्ताधारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे गटा विरुद्ध भाजप (कोल्हे गट) व काँग्रेसचे नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात गट विरोधी ठाकले असून शेतकरी संघटनेने आपला स्वतंत्र पॅनल उभा केल्याने हि लढत आता तिरंगी होत आहे.या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप अशी (अभद्र) युती झाल्याने राज्यातील भाजप नेत्यांचे या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले असल्याच्या बातम्या आहेत.असो निवडणुकीनंतर काय ती कारवाई होईल अथवा भांडवलदारांना सर्वच पक्ष हे गुन्हे माफ करताना दिसत असतात.त्यामुळे तो मुद्दा इतका महत्वाचा महत्वाचा मानता येणार नाही.तरीही या निवडणुकीत सत्ताधारी विखे गट आपला करिश्मा दाखवणार का ? की,माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आ.स्नेहलता कोल्हे गट बाजी मारणार हे लवकरच समजणार असले तर अड्.अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली अशोक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी नंतर शेतकरी संघटना या दिग्गजांच्या निवडणुकीवर कोणता परिणाम करणार हे लक्षवेधी ठरणार आहे.
राहाता तालुक्याची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुक उद्या संपन्न होत असताना यात विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे पारडे कमजोर असून माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आ.कोल्हे यांचे पारडे जड वाटत आहे.मात्र आज होणारी कत्तल की रात यामध्ये कोण किती आर्थिक किंमत मोजणार यावर बरेच काही अवलंबून आहे ते काहीही असले तरी यात शेतकरी संघटनेने या मातबरांना शेतकऱ्यांच्या आणि सभासदांच्या दारात आणले व इच्छा नसताना त्यांचे दुःख ऐकायला भाग पाडले हेही नसे थोडके.
या निवडणुकीत एकमेकांच्या विरुद्ध तुफान आरोप प्रत्यारोप झाले आहे.यात कोणीही हयगय केली नाही.त्यामुळे सामान्य शेतकरी आणि सभासद हे चक्रावून गेले असले व त्यांची सारासार बुद्धी ठेवून ते कोणाला कल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान या निवडणुकीत एक गोष्ट सांगणे अपरिहार्य मानले पाहिजे.’काही वर्षा पूर्वी अ.नगर नजीक असलेल्या नगर-मनमाड रस्त्याच्या कडेला असलेल्या देहरे घाटातील गोष्ट आहे.दिवस उन्हाळ्याचे होते.ऊन मी म्हणत असताना दुपारच्या वेळी चार लांडग्यांची टोळी एक तुषार्त हरणाच्या मागे पाठलाग करताना दिसत होती.विशेष म्हणजे हि शिकार करताना यातील चारही लांडगे हे एकावेळी पाठलाग करत नव्हते तर एका झाडाच्या सावलीला अन्य लांडगे बसून त्यातील एक लांडगा त्या हरणाच्या मागे पळताना दिसत होते.तर ‘तो’ थकला की दुसरा त्याची जागा घेऊन व त्या ठिकाणी येऊन त्याच शिकारीचा पाठलाग करत होता.अशा क्रमाने बराच वेळ हा खेळ सुरु होता.बऱ्याच वेळाने सदर हरण थकले आणि लांडग्यांच्या कळपाने अखेर आपले लक्ष गाठले आणि त्या भक्षाचा एकदाचा फडशा पाडला.हि घटना एका पत्रकाराने आपल्या लेखणीत कैद करून ती एका वृत्तपत्रात प्रसिद्ध केली होती.
आज गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीकडे पाहिले तर आपल्याला काय दिसते.या कारखान्यास एक नेतृत्व विकसीत झाले नाही त्यामुळे आजूबाजूच्या सहकारी साखर कारखानदारांचे नेते ‘तो’ आपला बटीक बनविण्यासाठी धावाधाव धावताना दिसत आहे.त्यात एक नव्हे तर रणांगणात तीन सहकार नेते दिसत असले तरी प्रत्यक्षात एक (आ.आशुतोष काळे)आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून पाठीमागून मदत पुरवताना दिसत आहे.त्याला खा.सुजय विखे यांनी आपल्या वाकडीतील सांगता सभेत दुजोरा दिला आहे.यात बिचाऱ्या गणेश सहकारी साखर कारखान्याची अवस्था वरील बातमीतील हरणासारखी झाली आहे असो.आता प्रचाराची रणधुमाळी संपली आहे.आता काय पेरले ते अल्पावधीत तरारून येणार आहे.एक गोष्ट मात्र पक्की आहे की,”या कारखान्याच्या स्थापने पासून अद्याप हा कारखाना माजी खा.बाळासाहेब विखे,महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना घेता आलेला नाही हि खदखद खरे तर छत्रपती शिवाजी महाराज यांना जसा सिद्दी जोहरचा ‘जंजिऱ्या’ या जलदुर्गासारखी सारखी झाली आहे.सिद्दी जोहर असे पर्यंत शिवाजी महाराज यांना तो जिंकता आला नाही.पर्यायाने अखेर छत्रपती संभाजी महाराज यांना शेजारी थोड्या अंतरावर समुद्रात दुसरा किल्ला उभारावा लागला होता.म्हणजेच का सहकारी साखर कारखाना जो पर्यंत आहे तो पर्यंत विखे घराण्याची झोप उडालेली दिसणार आहे.कारण सत्तेचे वर्म या ठिकाणी दडले आहे.हा कारखाना जो पर्यंत त्यांच्या मतदारसंघात आहे.तो पर्यंत त्यांना यातून नवनेतृत्व निर्माण होण्याची साधार भीती वाटत आहे.मागे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी हा कारखाना चालविण्याचा कार करण्याचा प्रयत्न केला होता.तो डोळ्यातील कुसळासारखा या नेत्याच्या डोळ्यात सलत होता हे उदाहरण सांगणे पुरेसे होईल.जसे कोपरगाव तालुक्यातील गोदावरी दूध संघ हि माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांची भलभळती जखम होती.त्यातून सन-१९९७ साली संघर्ष होऊन त्यातून स्व.नामदेवराव परजणे हे नेतृत्व उदयाला आले होते.व त्यातून ते आजही कोल्हे घराण्याच्या डोक्यावरील भलभळती जखम बनून आहे.तोच कित्ता होऊ शकतो याची पूरेपूर जाण विखे यांना आहे.त्यामुळे त्यांना दोन पर्याय समोर राहतात.त्यात एक तर हा कारखाना आपल्या हाताने बंद करणे किंवा तो आपल्या ताब्यात घेऊन तो कायम अपंग बनवणे अथवा आपल्या ताब्यात ठेऊन राहुरी कारखान्यासारखा कर्जाच्या विळख्यात लोटणे.त्यामुळे पहिल्या टप्प्यात त्यांनी तो तत्कालीन अध्यक्ष अड्.नारायण कार्ले यांचेकडून दमदाटीने (कार्लेच्या म्हणण्यानुसार) घेतला आणि कर्जात डूबवला आहे.(अर्थात अड्.कार्लेवर एकतर्फी भरवसा कसा ठेवायचा हा प्रश्नच आहे.कारण हा काही एखादा अडाणी इसम नाही वकील आहे)खरे तर त्यांचा अंदाज सपशेल चुकला आहे.नव्हे ‘तो’ शेतकरी संघटनेने तो चूकवला आहे.कारण यात शेतकरी संघटना उतरेल याचा अंदाज महसूल मंत्री यांना दुरानव्ये नव्हता त्यामुळे ते गाफील राहिले होते.त्यामुळे सदर कारखाना आपण सहजपणे आपल्या खिशात घालू असे प्रथम दर्शनी त्यांना वाटले होते.कर्मवीर काळे सहकारी साखर कारखाना व संजीवनी कारखाना यांनी गत चार महिन्या पूर्वी असाच सभासदांना गाफील ठेऊन आपल्या खिशात घातला हि फार काही जुनी गोष्ट नाही.तोच कित्ता त्यांना गिरवायचा असल्याने व सहकारी नेते यांनी आपली स्वतःभोवतीची ‘लक्ष्मण रेखा’ गृहीत धरलेली आहे.किंवा तो त्यांचा अलिखित करार बनला आहे.’ज्याने त्याने आपले वतन सांभाळायचे व एकमेकांच्या प्रभाव क्षेत्रात शिरायचे नाही’ हाच तो त्यांचा अलिखित करार.मात्र या चित्रपटात एकदम शेतकरी संघटनेचा प्रवेश झाला आणि चित्र पार बदलून गेले.राहाता येथील एकनाथ मंगल कार्यालयात शेतकरी संघटनेने आपला इरादा जाहीर केला आणि त्यानंतर या नेत्यांची धावपळ उडाली तो पर्यंत त्यांनी सारे काही लिखित स्क्रिप्ट प्रमाणे होईल असा त्यांचा अंदाज सपशेल चुकला होता.जेंव्हा हे लक्षात आले तो पर्यंत उशीर झाला होता,मग महसूल मंत्री यांनी आपला पुढील पत्ता खेळला गेला गणेश कारखाना आता ताब्यात येत नाही हे ओळखून त्यात पाच वर्षाच्या ‘वाढीव कराराची खुंटी’ यात ठोकून दिली आहे.जरी सदर कारखाना ताब्यात आला नाही तरी सत्ताधारी वर्गास काहीही करता येणार नाही.केले तर न्यायिक लढ्यात काही वर्ष लोटून आपले ध्येय सहज साध्य होईल हा त्या मागील ‘गनिमी कावा’ आहे हे उघड आहे.
शेतकरी संघटनेने हा डाव ओळखून या वाढीव कराराच्या विरुद्ध प्रवेशद्वारात आंदोलन करेपर्यंत आघाडी ठेवली होती हे विशेष ! दरम्यान हा कावा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ओळखला असून आपल्या राहाता येथील भाषणात बोलून दाखवला आहे मात्र उपस्थित नेते आणि कार्यकर्ते,सभासद आदींना दिलासा देण्यासाठी,”सरकार आपले येणार आहे” (कर्नाटक मध्ये सरकार आल्याने)असे गाजर टांगून दिले आहे.त्यामुळे हि लढाई त्यांनी तूर्त तरी रेटली असली तरी निकालानंतर ती सोपी नक्कीच नाही उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यात त्यांचा खोडा घालून आगामी पाच वर्ष किंबहुना राज्यात वर्तमान काळात भाजप सरकार सत्तेत आहे.त्यामुळे हि निवडणूक झाली की,”आम्ही तुमचा बेत पाहायला रिकामे आहे” या शिवाय आगामी काळात भाजप सरकार आले तर त्यात वाढ होऊ शकते.त्यासाठी त्यांनी दोन्ही बापलेकांनी आगामी १९ जूनचा दुपारचा मुहूर्त काढला आहे.तो याच अर्थाने.
लोकसत्ताचे तत्कालीन संपादक विदर्भातील एक गोष्ट कायम सांगत,दोन भल्यामोठ्या रेड्यांच्या टकरीत दिवसभर लढाई होऊनही कोणी हरत नाही आणि जिंकतही नाही मात्र ज्याच्या जमिनीत हा राडा होतो त्याची मात्र वाट लागून जाते.गणेश सहकारी कारखान्याची लढाई हि अशी आहे यात अंतिमतः नुकसान सभासद आणि या परिसरातील ऊस उत्पादकांचे ठरलेले आहे.या बड्या धेंडांचे काहीही होणार नाही.चंद्राचा उदय कावळ्यांच्या उपयोगाचा नाही तशी या सभासदांची अवस्था.
या निवडणुकीत त्यांनी निळवंडे कालवा जलपूजनास निमंत्रण न दिल्याने नाराज असलेल्या शिर्डी लोकसभा मतदार संघातील खा.सदाशिव लोखंडे यांना विरोधी गोटात जाऊ नये यासाठी सावरून घेतले आहे.या निळवंडे वरून सत्ताधारी विखे आणि विरोधी आघाडीचे माजी महसूल मंत्री थोरात,कोल्हे या शिकारींनी यावर्षी लोकांना मूर्खात काढण्याची संधी सोडली नाही.सर्व काही निळवंडे कालवा कृत्ती समितीने शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांचे सहाय्याने कालवा कृती समितीचे पदाधिकारी नानासाहेब जवरे,विक्रांत रुपेंद्र काले आदींनी उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेने (क्रं.१३३/२०१६) गेली ५३ वर्ष उत्तर नगर जिल्ह्यातील प्रवरा आणि गोदावरी काठच्या प्रस्थापितांनी आपल्या राजकीय भवितव्यासाठी प्रलंबित ठेवलेले कालवे मार्गी लावले आहे.हे सूर्य प्रकाशा इतके स्वच्छ असताना त्यांनी आपले ढोल-ताशे वाजविण्याची एकही संधी सोडली नाही.विशेष म्हणजे दुष्काळी जनतेत अद्यापही कालवा कृती समितीकडे सर्व न्यायालयीन आदेश आणि लेखी पुरावे असताना या पाणी लुटीत सहभागी असलेल्या नेत्यांवर विश्वास असलेली खंडोजी खोपडे बऱ्यापैकी जिवंत आहे हे लक्षणीय मानले पाहिजे.या खोपडेंमुळे या राजकीय नेत्यांच्या पोळ्या गेली ५३ वर्ष बिनबोभाट भाजत आल्या आहेत.तरीही हे आपल्या स्वार्थासाठी या दुष्काळी जनतेचा बळी सहज द्यायला तयार होतात.त्यांच्या मागे तोतया समित्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या झुंडीच्या झुंडी स्वतःचा गुलाल उधळताना दिसत आहे.व त्यांचे कौतुक करणारे ‘या’ नेत्यांचे पगारी भाट या घटना कुठलाही लिखित पुरावा आणि त्याची शहानिशा न करता रंगवताना दिसत आहे.
आंधळ्याशी जण अवघे आंधळे,आपणाशी डोळे दृष्टी नाही॥ तुका म्हणे शुद्ध नाही आपण,तया त्रिभुवन अवघे खोटे ॥ अशी यांची अवस्था.
खरे तर याच लोकांमुळे हा प्रकल्प इतका उशिरा झाला असे म्हटलं तर वावगे ठरू नये.याबाबत डॉ.अशोक विखे यांनी अगदी स्पष्टपणे या निळवंडे कालव्यांतील शुक्राचार्य कोण आहे ? हे सांगितले होते.मागील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अगदी स्वच्छपणे आपल्या मुलाखतीत सांगितले होते.त्यावरून राज्यात कहर झाला होता.शिवाय सन-१९८४-८५ या वर्षी लोणीत झालेल्या पाणी परिषदेत माजी खा.स्व.बाळासाहेब विखे यांनी माजी आ.दत्ता देशमुख आणि माजी पाटबंधारे मंत्री बी.जे.खताळ आदींना स्पष्टपणे सांगीतले होते.”हा निळवंडे धरण प्रकल्प हा केवळ ‘स्टोअर टॅंक’ होईल” त्यावरून वादविवाद होऊन त्या व्यास पीठावरून हे दोन्ही नेते चालते झाले होते.त्या शिवाय अकोले,संगमनेर,राहाता,श्रीरामपूर आदी तालुक्यातील नेते हि या पाणी चोरीच्या षडयंत्रात सामील होते हे उघड झाले आहे.त्यासाठी कालवा समितीकडे त्यांनी आजतागायत पाणी चोरीचे पुरावे म्हणून कागदपत्र उपलब्ध केलेले आहे.यात आज मैदानात असलेले बहुतांशी सामील असल्याचे दिसून येईल.असो या निवडणुकीत शेतकरी संघटनेंने आपल्या आपली भूमिका निभावली असून यात कपाटात होणारीं निवडणूक या प्रस्थापित नेत्यांना लढायला लावून लोकशाही जिवंत ठेवण्याचे पवित्र काम केले आहे.त्यासाठी हि संघटना अभिनंदनास पात्र आहे.एरवी या नेत्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात नेहमी वेगळे राहत आले आहे हे सांगायचे वेगळे कारण नाही.तथापि या निवडणुकीत एक गोष्ट कोणाच्याही लक्षात आली नाही ती हि की,”या प्रस्थापितांनी कायम पक्षांतर करून ज्या पक्षात आपले विरोधक जास्त आहे.त्यात प्रवेश करून विरोधकांचे दात आणि नख्या काढून घेतल्या आहे.त्यामुळे आगामी काळात त्यांचा विरोधक सापडणे दुर्लभ होणार आहे.त्यामुळे यांची हुकूमशाही वाढण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.याकडे एक लक्ष टाकले तर कट्टर विरोधक साई बाबा संस्थांनचे माजी विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर,भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर,माजी उपाध्यक्ष नितीन कापसे,शिवाजी गोंदकर,सेनेचे कमलाकर कोते,त्या नंतर एके काळचे विरोधक अभय शेळके आदी मान्यवर मंडळी आता या नेत्यांच्या मांडीवर जाऊन बसली आहे.त्यामुळे राहाता मतदार संघात विरोधक शोधणे अवघड बनले आहे.त्यामुळे आगामी काळात यांच्या रस्त्यातील काटे बऱ्यापैकी भाजप आणि सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी भांडवल घेऊन दूर केले आहे.याची किंमत आगामी काळात विविध स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्था आणि सामान्य माणसाला मोजावी लागणार आहे हे विसरता येणार नाही.
सदर गणेश सहकारी कारखाना कोणाच्याही ताब्यात जावो पण त्याचा मृत्यू अटळ आहे हे सांगायला कोण ज्योतिषाची गरज नाही.हे समजायला अनेकांना जड जाईल पण हे वास्तव काही काळानंतर सर्वांना समजणार आहे.कारण या पूर्वी ‘गणेश पॅटर्न’ च्या नावाखाली आपल्या ताब्यात घेऊन तत्कालीन मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी येथील कामगारांना पस्तीस टक्के कमी पगार आणि ऊस उत्पादकांना कमी भाव घ्यायला लावून व उपपदार्थ आपल्या कारखान्यात स्वस्तात नेऊन आपले कोटकल्याण केले याला काही फार मोठा काळ लोटला नाही.तो कोणाच्याही ताब्यात जावो त्याची पुनरावृति होणार आहे.यात सभासदांनी फार मोठया अपेक्षा ठेवणे गैर आहे.तोच कित्ता महसूल मंत्री विखे यांनी गिरवला आहे.येथील कामगारांना वेळेवर पगार नाही सेवा निवृत्ती नंतर असलेली देणी देण्याचे नाव घेतले नाही.या कामगारांना थेट उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या आहेत.काहींना ‘आत्महत्या’ कराव्या लावल्या आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णया नंतर हि हि नेते मंडळी अधिकाऱ्यांना हाताशी धरून पुन्हा तोच पस्तीस टक्के कमी घेण्याचा कोल्हेचा आवडता खेळ खेळत आहे.संजीवनी तर वेगळे काय सुरु आहे.तेथील कामगारांना पाच ते सहा महिने पगार आपल्या पदरात पडत नाही.ऊस उत्पादकांना देयके मिळत नाही हे काही बदलाचे लक्षण नाही हे सभासदांनी समजून घेणे गरजेचे आहे.त्यासाठी शेतकरी संघटना उत्तम पर्याय असताना तो ते किती स्वीकारतील हा खरा प्रश्न आहे.मात्र एकदा विष आवडू लागले की माणसांना अमृत नकोसे होते याचा हा परिसर म्हणजे उत्तम उदाहरण आहे.गुलामी आवडू लागली की त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग बंद होतो.उत्तर नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्याला आपल्या कोशात बंद करून घेतले आहे.तुळशीच्या झाडाला लांबून देखील पाण्याचा शिंतोडा घालीत नाही पण द्राक्षाच्या बुडाला दररोज न चुकता दुध घालतो असा काहीसा हा प्रकार.त्यांना या जुलमाची जाणीव होत नाही तो पर्यंत या भागात क्रांती अशक्य आहे.बिचारा पोपट पायाचा चवडा मोकळा असतानाही मी बांधला गेलो आहे” अशा दृढ कल्पनेने नळीवरच बसून राहत नाही का ? अशी हि सभासदांची अवस्था.या वृत्तीत सभासद जो पर्यंत बदल करत नाही तो पर्यंत स्व.शरद जोशी,रघुनाथ दादा पाटील आणि प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळेंसारखे नेते आले काय गेले काय या गुलामांना त्याचे काहीही सोयरसुतक नाही हेच खरे.
लोकसत्ताचे तत्कालीन संपादक साठी विदर्भातील एक गोष्ट कायम सांगत,दोन भल्यामोठ्या रेड्यांच्या टकरीत दिवसभर लढाई होऊनही कोणी हरत नाही आणि जिंकतही नाही मात्र ज्याच्या जमिनीत हा राडा होतो त्याची मात्र वाट लागून जाते.गणेश सहकारी कारखान्याची लढाई हि अशी आहे यात अंतिमतः नुकसान सभासद आणि या परिसरातील ऊस उत्पादकांचे ठरलेले आहे.या बड्या धेंडांचे काहीही होणार नाही.चंद्राचा उदय कावळ्यांच्या उपयोगाचा नाही तशी या सभासदांची अवस्था.