गुन्हे विषयक
…’त्या’ दरोड्यातील आणखी दोन जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

न्युजसेवा
कोपरगाव- (नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव ग्रामपंचायत हद्दीत व्यापारी संकुलात असलेल्या ज्ञानेश्वर माधवराव माळवे यांच्या सुवर्णकाराच्या दुकानावर तीन दिवसापूर्वी २१ जानेवारी रोजी चार दरोडेखोरांनी हातात नंग्या तलवारी घेऊन दुकान लुटण्याचा प्रयत्न नागरिकांच्या सजगतेने हाणून पाडला होता त्यावेळी ग्रामस्थांनी दोन जणांना रंगेहाथ पकडुन दिले होते.त्यातील जखमी दरोडेखोर वगळता आज जैदखान अमजदखान पठाण रा.संजयनगर व नितेश फकिरा भालेराव रा.सुभाषनगर या दोघां जणांना शिर्डी पोलिसांनी आज कोपरगाव येथील वरिष्ठ स्तर न्या.भगवान पंडित यांचे समोर हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची २७ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दरम्यान काही दिवसापूर्वी पोहेगाव ते देर्डे-कोऱ्हाळे रत्यावर खडकीनजिक असलेल्या समृध्दी महामार्गाच्या पुलाच्या खाली दुपारी १२ वाजेच्या सुमारास येवला येथील प्लास्टिक च्या व्यापाऱ्याची गावठी कट्टा दाखवून १२-१५ हजारांची लूट झाली होती ती या टोळीने केली असल्याचा कयास व्यक्त होत आहे.याबाबत शिर्डी पोलीस काय तपास करणार याकडे या भागातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
यातील सविस्तर वृत असे की,यातील जखमी सुवर्णकार ज्ञानेश्वर माळवे यांची सुवर्ण पेढी पोहेगाव ग्रामपंचायत हद्दीतील व्यापारी संकुलात सुरू आहे.दरम्यान तेथील वाढता व्यवसाय पाहून चोरट्यांनी त्यांचेवर वक्रदृष्टी झाली होती.त्यांनी त्यांचेवर पाळत ठेवून दि .२१ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास हातात नंग्या तलवारी, कत्ती,एअर गण घेऊन दोन दरोडेखोरांनी त्यांच्या दुकानात प्रवेश केला होता व दुकानदार ज्ञानेश्वर माळवे व त्यांचा मुलगा यांना धमकावले होते.तेथील महिला ग्राहकांना गप्प बसणाची धमकी दिली होती.दरम्यान त्यांनी दुकानातील सर्व दागिने आपल्या पिशवीत गोळा करून पोबारा करण्याच्या तयारीत असताना त्यांनी बाहेर मोठी गर्दी पाहून स्वतःच्या बचावार्थ त्यांनी सुवर्णकार माळवे यांना समोर करून त्यांची ढाल बनवून पळण्याचा प्रयत्न केला मात्र दुकानदाराचा मुलगा संकेत माळवे याने जोराचा प्रतिकार केला शिवाय समोर उपस्थित ग्रामस्थांच्या ही गंभीर बाब लक्षात आल्याने त्यांनीही दगडांचा मारा करून त्यांना जेरीस आणल्याने त्यांचा बेत पूर्णपणे फसला होता.परिणामी आदित्य नवनाथ बागुल व दुसरा फराज एजाज सय्यद आदीं दोन जण रंगेहाथ पकडले होते.नागरिकांनी त्यांची दिगंबर अवस्थेत येथेच्छ धुलाई केल्याने त्यांना चांगलीच दुखापत झाली होती.या घटनेनंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले होते व दोन आरोपी आदित्य बागुल व दुसरा फराज सय्यद यांना दिगंबर अवस्थेत ताब्यात घेतले होते.तर घटनास्थळावरून जैदखान अमजदखान पठाण (हा दरोड्यात सहभागी होता) व नितेश फकिरा भालेराव (तर हा रस्त्यावर उभा राहून टेहळणी करत होता)हे दोघे घटनास्थळावरून जनतेचा रौद्र अवतार पाहून फरार झाले होते.पोलीस या दोघांच्या पाळतीवर होते.पोलिसांनी उपचार सुरू असलेल्या दोघांना आपला खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी या दोघांची नावे पोपटासारखी सांगितली आहे.
दरम्यान शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने रात्री त्यांच्या निवासस्थानी धाडी टाकल्या असता हे दोघे काल रात्री पोलिसांना मिळून आले आहे.
तर अन्य दोघांवर अद्याप शिर्डी येथे साईबाबा सुपर हॉस्पिटल येथे उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान आज चौकशी अधिकारी भारत बलैय्या यांनी त्यांना कोपरगाव येथील कोपरगाव वरिष्ठ स्तर प्रथम वर्ग न्या.भगवान पंडित यांचे समोर हजर केले असता सरकारी अभियोक्ता प्रदीप रणधीर यांनी जोरदार युक्तिवाद करत सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती.तर त्यांचे खंडन करत आरोपींच्या वतीने ऍड.नितीन गंगावणे यांनी त्यांच्या बचावाचा युक्तिवाद केला होता.अखेर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.शिर्डी पोलिसांनी अन्य दोन आरोपींना शोधून काढल्याबद्दल पोहेगाव आणि परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.