गुन्हे विषयक
दिड लाखांची सोनसाखळी लंपास,कोपरगावात चोऱ्यांचा उपद्रव सुरु !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर आणि तालुक्यात चोरट्यांच्या चोऱ्यांचा आलेख आणि धाडस वाढले असून त्यांनी नुकताच निवारा परिसरात रहिवासी व पोहेगावात आपली वैद्यकीय सेवा देत असलेले डॉ.जगदीश झंवर यांची गळ्यातील सोन्याची पूर्ण साखळी नुकतीच रात्री आठ वाजेच्या सुमारास ओरबाडून नेण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे.तरी त्यांनी अर्धी दीड लाखांची सोन साखळी लंपास केली असल्याने कोपरगाव शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

“आपल्या मारुती एर्टीगासह शहरातून एकारात्री तीन चार चाकी गाड्या दि.२२ फेब्रुवारी २०२३ रोजी मध्यरात्री घरासमोरून चोरी गेल्या असताना त्या नंतर सहा महिन्याचा कालावधी उलटूनही व त्या बाबत चलचित्रण उपलब्ध असताना शहर पोलिसांना अद्याप चोरटे अद्याप मिळून आलेले नाही; त्यामुळे आपण हा गुन्हा दाखल केला नाही”-डॉ.जगदीश झंवर,कोपरगाव.
कोपरगाव शहर आणि तालुक्यात चोरट्यांचा उपद्रव अद्याप कमी होण्याचे नाव घेताना दिसत नसून काही दिवसापूर्वी
वडांगळे वस्ती येथील चोरीचा गुन्हा दाखल झाल्याची शाई वाळते न वाळते तोच कोपरगाव येथील साखरे स्टील यांची ५० हजारांची चोरी झाली असून त्याच रस्त्यालगत योगीराज फर्निचर,संस्कृती साडी डेपो आदिसंह सात दुकाने फोडली असल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती.
याधीही ‘पूनम’ चित्रपट गृहासमोर व व्यापारी धर्मशाळेसमोर तीन दुकाने फुटली असून गत महिन्यात तीन दुचाकी चोरीस गेल्या असताना आज भर दुपारी दिडच्या सुमारास अजिंक्य लक्ष्मण कदम यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील तीन तोळे दागिने १५-२० हजारांची रोकड असा सुमारे ०२ लाखांची चोरी झाली होती.त्या आधी शहरातील वकील अड्.मनोज कडू,डॉक्टर झंवर यांची मारुती एर्टीगा तर लेखा परीक्षक दत्ता खेमनर यांची स्विफ्ट डिझायर आदी तीन गाड्या एका रात्रीत चोरट्यांनीं लंपास केल्या होत्या.त्यांचा अद्याप तपास लागलेला नाही.अशातच परवा रात्री ०८.५८ वाजेच्या सुमारास डॉ.जगदीश झंवर हे आपल्या कामावरून परत आले व जेवण करून शतपावलीसाठी घराबाहेर आले असता दोन तरुण आपल्या होंडा दुचाकीवरून पूर्वेकडून पश्चिमेच्या दिशेने जात असतांना थांबून त्यांनी प्रा.रमेश… कोठे राहतात ? असा पत्ता विचारण्याचा बहाणा केला व तेवढ्यात त्यांनी डॉ.झंवर यांच्या गळ्यातील सुमारे १.५० लाख रुपये किंमतीची तीन तोळ्याची सोन्याची साखळी ओरबाडून पोबारा करताना डॉ.झंवर हे सावध झाल्याने चोरट्यांच्या हाती केवळ दिड तोळ्याची साखळी आली असून त्यांनी आरडाओरडा केला असता काही नागरिकांनी तेथील माजी नगरसेवक जनार्दन कदम यांना दूरध्वनी केला होता.त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांना याची खबर दिली असता पोलीस निरीक्षक ठोंबरे हे अवघ्या पाच मिनिटात घटनास्थळी पोहचले होते.मात्र तो पर्यंत चोरट्यांनी पोबारा केला होता.
या घटनेसंबंधी पोलीस अधिकाऱ्यांनी नजीच्या भावसार इलेक्ट्रॉनिक येथील चलचित्रण तपासले असता त्या ठिकाणाहून चोरटे बरोबर रात्री ८.५५ मिनिटांनी जाताना दिसत आहे.त्यात त्यांचे चेहरे स्पष्ट असल्याचे प्रत्यक्ष दर्शींचे म्हणणे आहे.
सदर ठिकाणी डॉ.झंवर यांना कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासंबंधी विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.त्याबाबत त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हटले आहे की,”आपल्या मारुती एर्टीगासह शहरातून एकारात्री तीन चार चाकी गाड्या दि.२२ फेब्रुवारी २०२३ रोजी मध्यरात्री घरासमोरून चोरी गेल्या असताना त्या नंतर सहा महिन्याचा कालावधी उलटूनही व त्या बाबत चलचित्रण उपलब्ध असताना शहर पोलिसांना अद्याप चोरटे अद्याप मिळून आलेले नाही; त्यामुळे आपण कोणत्या आधारे गुन्हा दाखल करायचा व त्याचा तपास लागण्याची सुतराम शक्यता नसल्याने आपण हा गुन्हा दखल केला नसल्याचे म्हटले आहे.