कोपरगाव तालुका
…त्या गावातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील-आश्वासन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या अकरा गावांमध्ये विधानसभा निवडणुकीत जरी मताधिक्य कमी मिळाले असले तरी कोपरगाव तालुक्यातील इतर गावांप्रमाणे अकरा गावांना देखील निधी दिला आहे.केलेल्या विकास कामांतून हे मताधिक्य नक्की वाढणार आहे याचा मला विश्वास आहे. त्यामुळे यापुढील काळातही विकासकामांना निधी कमी पडू न देता अकरा गावातील विकासाचे प्रश्न सोडविणार असल्याचे प्रतिपादनआ.आशुतोष काळे यांनी चितळी येथे एका कार्यक्रमात दिले आहे.
“दरम्यान गोदावरी कालव्यांच्या लाभधारक शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी कालव्यांची वहन क्षमता वाढविणे गरजेचे होते.त्यासाठी माजी जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांच्याकडून गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी ३०० कोटी निधीस मंजुरी मिळविली असून दरवर्षी मिळणाऱ्या १०० कोटी निधीतून गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील चितळी येथे राहाता चितळी रोड ते प्रसाद साळवे घर रस्त्याच्या खडीकरण कामाचे भुमीपुजन आ.काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
सदर प्रसंगी गौतम बँकेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कोते,सोपान वाघ,सुरेश वाघ,दिपक वाघ,रेवणनाथ वाघ,मछिंद्र वाघ,दिलीप चौधरी,बाळासाहेब चौधरी,मछिंद्र चौधरी,शंकर चौधरी,बाबासाहेब वाघ,रुपेश गायकवाड,प्रसाद साळवे, राजेंद्र चौधरी,तोफीक कुरेशी,दिनेश जगताप,जळगावचे सरपंच शिवाजी साबदे,संपत वाघ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे हर्षराज शिंदे,रविंद्र चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”अकरा गावातील नागरिकांची रस्त्यांची मागणी होती त्या मागणीनुसार अनेक रस्त्यांसाठी निधी दिला आहे.सर्वच रस्त्यांचे प्रस्ताव शासन दरबारी सादर करून त्यांना निधी मंजूर झाला आहे.मात्र बहुतांश रस्त्यांच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे.काही कामांची स्थगिती उठली असली तरी सर्वच कामांची स्थगिती उठवावी यासाठी न्यायालयात गेलो असून न्यायालयाचा निकाल सकारात्मक येईल व रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान मागील वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान होवून देखील अकरा गावातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती.याकडे शासनाचे लक्ष वेधले आहे.त्याबाबत लवकरच निर्णय होईल व निकष निश्चित झाल्यानंतर निधी उपलबद्ध होवून नुकसान भरपाई मिळेल.एका गावात हवामान केंद्र असल्यामुळे त्या गावात पाऊस झाला नाही व शेजारच्या गावात अतिवृष्टी होवून नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही त्यामुळे प्रत्येक गावात हवामान केंद्र व्हावे अशी मागणी केली आहे. हवामान केंद्र संख्या वाढल्यास नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना भरपाई मिळेल असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला आहे.