जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

बनावट खोका शॉपच्या प्रलोभनाला बळी पडू नका-..या पालिका नेत्याचे आवाहन

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

आपण कोपरगाव शहरातील सर्वपक्षीय प्रतिनिधींना सोबत घेऊन शहरातील अनेक ठिकाणी खोका शॉप-गाळे उभारण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून शासनाकडे अनेकवेळा प्रयत्न केले आहे मात्र दुर्दैवाने त्याला अद्याप यश आले नाही.तरीही कुणी जागा मिळवून देण्यासाठी सामाजिक संकेतस्थळावर संदेश पाठवून विस्थापितांची दिशाभूल करत असेल तर ती आगामी निवडणुकीसाठी खेळलेली राजकीय चाल असून त्याला विस्थापितांनी बळी पडून आपली फसवणूक करून घेऊ नये असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये नुकतेच केले आहे.

“आपण सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन प्रयत्न केले तरी खोका शॉपसाठी परवानगी मिळाली नाही.केवळ बाजारतळ या ठिकाणी काही खोका शॉप व काँग्रेस कमिटीजवळ खोका शॉप किंवा गाळे यासाठी परवानगी मिळण्याची शक्यता आहे,तसे प्रयत्न-तशी प्रक्रियाही सुरू आहे.विस्थापितांना खुश करण्यासाठी आपण खोटे आश्वासन देणार नाही.हि वस्तुस्थिती आहे”-विजय वाहाडणे,अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव नगरपरिषदेने आयुक्त व जिल्हाधिकारी यांचे आदेशाने मार्च २०१० मध्ये शहरातील सुमारे २ हजाराहून अधिक अवैध व्यावसायिकांची अतिक्रमणे हटवली होती.त्यानंतर गत दहा वर्षाहून अधिक काळ या प्रश्नावर विविध पक्षांचे शहरातील मतपेटीचे राजकारण सुरु आहे.ते अद्याप संपण्याची चिन्हे नाही.वर्तमानात अशाच घटना घडत असून अधिकाऱ्यांनी पोलीस बल घेऊन अतिक्रमण काढल्याचा राग मनात धरून अतिक्रमण काढणाऱ्या अधिकाऱ्यांनाच लक्ष केले आहे.ही घटना दि.२२ जुलै २०२१ रोजी घडली असून कोपरगाव नगरपरिषदेने पूनम चित्रपट गृहासमोरील अतिक्रमण काढलेले असताना त्याच ठिकाणी वरील काही आरोपीनी पुन्हा त्याच ठिकाणी आपले दुकान मांडण्याचा प्रयत्न केला असता.त्याला नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हरकत घेतली व त्या विरोधात कारवाई करून ते अतिक्रमण रात्रीच्या सुमारास मुख्याधिकारी डोईफोडे यांच्या आदेशाने काढून टाकले होते.त्याचा राग मनात धरून शिवनेनेच्या नगरसेवक व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी त्यांना बेकायदा जमाव करून नगरपरिषदेत सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जाऊन तेथील उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे व शहर बांधकाम अभियंता दिगंबर वाघ यांच्या दालनात जाऊन शिवीगाळ तर काहींना मारहाण केली तर तेथील किंमती साहित्याची मोठ्या प्रमाणावर मोडतोड केली होती.त्यावरून आगामी तीन महिन्यावर येऊन ठेपलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अकाली शिमगा नक्कीच रंग भरणार हे उघड होत आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी हे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”कोपरगाव शहरातील विस्थापितांना न्याय मिळावा यासाठी आपण येवला रोड,एस.जी.विद्यालय पश्चिमेकडील भिंती लगत,धारणगाव रोड,चर्च जवळ,बाजारतळ,काँग्रेस समिती जवळ अशा अनेक जागांवर खोका शॉप-गाळे उभारण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून शासनाकडे अनेकदा प्रयत्न केले.पण शासन रस्त्यालगत परवानगीच द्यायला तयार नाही.म्हणून आपण सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळही घेऊन अहमदनगर येथील वरीष्ठ अधिकाऱ्यांना भेटलो.शहरातील अनेकजण माझ्यासोबत होते.आपण आपल्या कुवतीनुसार सर्वांना सोबत घेऊन करत असलेले प्रयत्न माहित असूनही पत्रकबाजी करणाऱ्यांना आपण जाहीरपणे विचारतो की,”माझ्यावर टिका करा.पण हिंमत असेल तर माजी आमदारांना विचारून बघा कि,राज्यात व देशात तुमच्याच पक्षाची सत्ता असतांना विस्थापितांना न्याय का मिळवून दिला नाही? संगमनेर,सिन्नर येथील बस स्थानकाजवळ अनेक गाळे बांधण्यात आले,तसे कोपरगाव बसस्थानकाजवळ का बांधले नाहीत? घाईघाईने श्रेय मिळविण्यासाठी भूमिपूजन का उरकले ? आपण तीन वेळा शहर विकासाचे प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले,त्यावेळी का अडथळे आणले?अकरा वर्षांपूर्वी अतिक्रमण हटविले जात असतांना व्यावसायिकांच्या बाजूने तुम्ही कुणीही का उभे राहिले नाही ?

विस्थापितांच्या जागा दुसऱ्यांनी बळकाविल्या,परस्पर भाड्याने दिल्या,हे आता पत्रकबाजी करणाऱ्यांना दिसत नाही का? सामाजिक संकेतस्थळावर आपल्या विरुद्ध लिहून नेत्यांची शाबासकी एकवेळ मिळेल,पण येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कुणीही विस्थापितांच्या भावनांशी खेळत असेल तर त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही.शासन जर परवानगीच देत नाही,तरीही आपण खोका शॉप उभे केले तर शासन पुन्हा अतिक्रमणे काढून टाकील हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.तरीही काहींनी आपल्या मतपेट्या भरण्यासाठी या माकडचेष्टा सुरु केल्या आहेत.या मर्कटलीलातून गरीब व्यावसायिकांचे फक्त आर्थिक वाटोळे होईल हे उघड आहे. ज्यावेळी भाजपाचे सरकार व भाजपाच्याच आमदार होत्या त्यावेळीच शासनाकडून परवानगी का मिळविली नाही? तसे केले नाही.नगराध्यक्ष वहाडणे यांच्या काळात खोका शॉप झाले तर श्रेयही वहाडणे यांनाच मिळेल याच कारणाने विस्थापितांकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.हे सर्वांना ज्ञात आहे.पालिका निवडणूक जवळ येईल तसतसे हे माकडचाळे वाढणार आहे.विस्थापितांच्या जागा हडपून अतिक्रमणे करणारे,हातगाड्या,फेरीवाले टपरीवाल्यांकडून हप्ते घेणारे कोण कोण आहेत ? त्यांच्या विरुद्ध बोलतांना हि प्रस्थापित मंडळी आपले शेपूट गुंडाळून का घेतात ? फक्त निवडणूक पार पडेपर्यंत विस्थापितांना नादी लावणारे कोण ? हे स्पष्टपणे वस्तुस्थिती सांगणारे व मनापासून प्रयत्न करणारे कोण आहेत ? हे जनतेला माहित आहे.बालाजी गोर्डे यांचे वडिलही आपले मित्र असल्याचा दावा करून.त्यांनी दुकान विकत घेतले व त्याचवेळी अतिक्रमणे हटाव मोहीम होऊन त्यांचे आर्थिक नुकसान झाले हे खरे आहे.त्यांचेकडून पैसे उकळणारे दिवंगत नगरपरिषद कर्मचारी कोणाच्या बैठकीतील साथीदार होते हे आपण सांगायची गरज नाही.जागा मिळावी ही त्यांची अपेक्षा रास्त ठरवून त्यांच्यासह इतर विस्थापितांना अधिकृतपणे जागा द्यायला शासनाची परवानगी मिळालेली नाही.

दरम्यान शहरवासीयांना रस्त्याने व्यवस्थित येजा करता यावी,रहदारीला अडथळे येऊ नयेत याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे.हातगाड्या,पथाऱ्या,शेड याबाबत तक्रारी येत असल्याने,नगरपरिषदेला कारवाई करावी लागते,त्यातूनच संघर्ष वाढतो.म्हणून कुणीही रस्त्याला-रहदारीला अडथळे येणार नाहीत याची दक्षता घ्यावी.निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कुणीही चुकीच्या प्रवृत्तीचे समर्थन करू नये.अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याने कर्मचाऱ्यांत प्रचंड नाराजी आहे,अनेकजण रजेवर जाण्याच्या मनस्थितीत आहेत.हे शहर विकासाला घातक असल्याचेही अध्यक्ष वहाडणे यांनी शेवटी सांगितले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close