अपघात
ट्रक दुचाकीचा अपघात,एक ठार,एक जखमी!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारातून जाणाऱ्या नगर-मनमाड महामार्गावर आज दुपारी सुमारे १ ते २ वाजण्याच्या एक दुचाकी आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात नितेश राठोड या तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.हा अपघात रस्त्याच्या कडेला असलेल्या काटेरी झुडपामुळे झाला असून मागून आलेल्या ट्रकला पुढील दुचाकीचा अंदाज न आल्याने झाला असल्याचे बोलले जात आहे.राष्ट्रीय महामार्गावरील ही अनास्था आता आणखी किती जणाचा बळी घेणार आहे असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.

उत्तर भारताला दक्षिण भारताला जोडण्यात अहम भूमिका निभावणाऱ्या नगर मनमाड या राष्ट्रीय महामार्गाच्या लगत काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली असून ती रस्त्यावर आली आहे त्यामुळे वाहनांना पुढील वाहनांचा अंदाज येत नाही परिणामी अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.त्यामुळे दुचाकीच्या बाजूच्या पट्ट्यातील ही काटेरी झाडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कधी हटवणार असा सवाल निर्माण झाला आहे.याकडे कोपरगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी लक्ष देणार आहे का असा सवाल निर्माण झाला आहे.
भारतात रस्ते अपघातांचे प्रमाण अत्यंत चिंताजनक असून,पी.आय.बी.च्या आकडेवारीनुसार दरवर्षी सुमारे दीड लाख लोकांचा मृत्यू होतो आणि ४.५ लाख लोक जखमी होतात.महाराष्ट्रात अवघ्या काही महिन्यांत हजारो अपघात घडत असून एका दैनिकाच्या वृत्तानुसार यात चार हजारांपेक्षा जास्त प्रवाशांना प्राण गमवावे लागतात.ही अत्यंत गंभीर बाब आहे.त्यात राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.कोपरगाव तालुक्यातून नगर-मनमाड हा नव्याने रूपांतरित झालेला राष्ट्रीय महामार्ग असून यावर अपघात कमी होण्याची नाव घेत नाही.या मार्गाचे आता चौपदरीकरण करण्याचे सरकारने जाहीर केले आहे.मात्र अद्याप काम सुरू झालेले नाही.कोपरगाव ते येवला या मार्गावर दक्षिण भारताकडे जाणारी आणि उत्तरेला जाणारी मोठ्या संख्येने अवजड वाहतूक सुरू असते.त्या कामाला मुहूर्त कधी लाभणार अशी विचारणा नागरिक आणि प्रवाशी करत आहेत.अशातच आज दुपारी 01 बाजेच्या सुमारास दुचाकी आणि ट्रक यांच्यात एक अपघात होऊन त्यात एक तरुण हकनाक बळी गेला आहे.

दरम्यान यातील प्राथमिक माहितीनुसार चाळीसगाव तालुक्यातील विसापूर येथील तरुण नितेश रामलाल राठोड (वय-२१) व त्याच तालुक्यातील कृष्णपुरी येथील विद्यार्थी हेमंत दयाराम राठोड (वय-२०) हे दोघे आपल्या ताब्यातील (एम.एच.19 डी. वाय.3673) या दुचाकीवरून येवल्याच्या दिशेने प्रवास करत होते.त्याच दिशेने त्यांच्या मागून एक ट्रक येत होता.येसगाव ग्रामपंचायत शिवारातील महामार्गावर रस्त्याच्या कडेला बेसुमार वाढलेल्या काटेरी झाडामुळे दुचाकीस्वारांचा अंदाज चुकल्याची आणि अपघात झाला असल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शनी दिली आहे.त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली असल्याची माहिती आहे.

दरम्यान आज कोपरगाव शहर हद्दीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर असलेल्या एका कानडे फूट वेअर या दुकानवर एक झाड कोसळून झालेल्या अपघातात एका दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.कोपरगाव नगरपरिषदेचे या ठिकाणी तातडीने धाव घेऊन ते झाड तातडीने क्रेनच्या सहाय्यानं हटवले आहे.यात जीवित हानी झाली असल्याची सुदैवाने कोणतीही खबर नाही.
या भीषण अपघातात नितेश रामलाल राठोड यांनी हेल्मेट परिधान केलेले असूनही त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याच्या घटना उघडीस आली आहे.तर हेमंत दयाराम राठोड हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान या अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेद्वारे तातडीने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नितेश राठोड यांना तपासणीअंती मृत घोषित केले असल्याची माहिती हाती आली आहे.जखमी हेमंत राठोड यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.अपघाताची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण तसेच संबंधित ट्रक व चालकाबाबत पुढील तपास सुरू आहे.दरम्यान यातील एक तरुण फार्मसीचा तर एक कृषी या शाखेचा विद्यार्थी हा शाखेचा विद्यार्थी असल्याची माहिती हाती आली आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान या घटनेमुळे नगर-मनमाड महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.ती पोलिसांनी मोठ्या माहितीने पुन्हा सुरळीत केली आहे.



