कोपरगाव तालुका
…नेत्यांची संवेदनशीलता संपली,अधिकाऱ्यांची तीच स्थिती !

न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील काकडी (शिर्डी) विमानतळाला लागून दक्षिण बाजूस असलेल्या भोसले वस्तीवर ५ एप्रिल २०२५ रोजी पहाटे झालेल्या हल्ल्यात साहेबराव पोपट भोसले व त्यांचा मुलगा कृष्णा साहेबराव भोसले हे ठार तर त्यांची पत्नी साखरबाई भोसले या गंभीर जखमी झाल्या या घटनेला जवळपास आठवडा उलटला असताना नगर जिल्ह्यातील पालकमंत्र्यांसह आमदार,खासदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना अद्याप ही घटनास्थळी भेट देण्यास आणि सांत्वन करण्यास वेळ मिळाला नसल्याचे दिसून येत असल्याने काकडी येथील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

“वर्तमानात पुढाऱ्यांची संवेदनशीलता कमी झाली असल्याचे दिसून येत असून ती केवळ निवडणुकीपुरती उरली आहे.काकडी ग्रामस्थांनी मात्र ती जागेवर असल्याचे दाखवून दिले आहे.नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया हे कोपरगाव तालुक्यात भेट देतात पण त्यांना दरोडा पडलेल्या भोसले यांच्या वस्तीवर भेट देण्यास वेळ मिळाला नाही की सहानुभूतीने दोन शब्द व्यक्त करण्याचे सुचले नाही हे मोठे दुर्दैव आहे”-बाळासाहेब दहे,ज्येष्ठ कार्यकर्ते व मयत साहेबराव भोसले यांचे भाचे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील काकडी विमानतळाच्या दक्षिण बाजूस असलेल्या भोसले वस्तीवर दिनांक ०५ एप्रिल २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास काही चोरट्यांनी पाळत ठेऊन मयत साहेबराव पोपट भोसले यांच्या वस्तीवर सशस्त्र हल्ला चढवला होता.त्यात ते स्वतः सह त्यांचा मुलगा कृष्णा साहेबराव भोसले (वय ३२) हे जागीच ठार झाले असल्याचे दिसून आले आहे.तर त्यांची पत्नी साखरबाई भोसले या गंभीर जखमी झाल्या होत्या त्यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत.तर त्यांची वृद्ध,अंध आई आश्चर्यकारक बचावल्या होत्या.या घटनेने नगरसह राज्यात सर्वत्र खळबळ उडाली होती.ही बाब दूध घालण्यास वेळेवर येणारे भोसले कुटुंब आज का आले नाही याचा शोध घेतल्यावर दूध संस्थाचालक यांचेकडून उघड झाली होती.त्यामुळे नगर पोलिसांचे चांगलेच धाबे दणाणले होते.त्यामुळे घटनास्थळी पोलिस अधीक्षक राकेश ओला,श्रीरामपूर येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्मे,शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने,राहाता पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण आदींनी घटनास्थळी तातडीने हालचाल केली होती व आरोपींचा शोध सुरू केला होता.त्यावेळी सिन्नर तालुक्यातील पळसे येथील टोल नाक्याजवळ घटनास्थळावरून बजाज प्लॅटिना या चोरून नेलेल्या दुचाकीने फरार होत असताना त्यांना बारा तासांच्या आत अटक केली होती.

“काकडी येथील दरोड्याच्या घटनेतील मयत साहेबराव भोसले आणि यांचे पुत्र कृष्णा भोसले या दोन जणांच्या मृत्यू व जखमी महिला साखरबाई भसोले यांच्या दवाखान्याची जबाबदारी सरकारने स्वीकारून आरोपिंना कठोर शासन करावे व मयताच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्यावी”- बाळासाहेब दहे,ज्येष्ठ कार्यकर्ते,संवत्सर.

दरम्यान आरोपींना मागील रविवारी त्यांना न्या.स्मिता बनसोड यांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.ती काल ११ एप्रिल संपली होती.त्यानंतर त्यांना शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांनी कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पंडित यांचे समोर हजर केले होते.त्यावेळी गंभीर गुन्ह्यातील दोन्ही आरोपी अटक केले असून त्यांनी गुन्ह्यात वापरलेले हत्यार हस्तगत केले असल्याने आरोपींना न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी आरोपींचे मोखाडा येथील वकील श्री शिंदे यांनी केली होती.सरकारी अभियोक्ता प्रदीप रणधीर यांनी आपला जोरदार युक्तिवाद केल्यानंतर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी भगवान पंडित यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपींना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असल्याची घटना ताजी आहे.
दरम्यान या घटनेला जवळपास आठवड्याचा कालावधी उलटला आहे.मात्र अद्याप पालकमंत्री राधाकृष्ण विखे,आ.आशुतोष काळे,माजी आ.स्नेहलता कोल्हे,माजी आ.अशोक काळे,माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे,माजी खा.सुजय विखे आदी मातब्बर नेते मंडळी असताना एकही नेत्यांस घटनास्थळी भेट देण्यास वेळ भेटला असल्याचे दिसत नाही.हीच स्थिती विधानसभा,लोकसभा,नगरपरिषद,जिल्हा परिषद,पंचायत समिती आदी निवडणुका असत्या तर या पुढारी मंडळींनी घटनास्थळी असलेल्या घराच्या उंबऱ्याला माती कमी केली असती.वर्तमानात पुढाऱ्यांची संवेदनशीलता कमी झाली असल्याचे दिसून येत असेल तरी काकडी ग्रामस्थांनी मात्र ती जागेवर असल्याचे दाखवून दिले आहे.नेत्यांची संवेदनशीलता केवळ निवडणुकीपुर्ती उरली असल्याचे दिसत आहे.नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया हे कोपरगाव तालुक्यात भेट देतात पण त्यांना दरोडा पडलेल्या भोसले यांच्या वस्तीवर भेट देण्यास वेळ मिळाला नाही की सहानुभूतीने दोन शब्द व्यक्त करण्याचे सुचले नाही हे मोठे दुर्दैव असल्याचे सांगून याबाबत मयताचे भाचे व संवत्सर येथील ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब दहे यांनी नेत्यांच्या आणि वरिष्ठ आधिकऱ्यांच्या या असंवेदनशीलतेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.या दरोड्याच्या घटनेतील मयत साहेबराव भोसले आणि यांचे पुत्र कृष्णा भोसले या दोन जणांच्या मृत्यूची जबाबदारी सरकारने जबाबदारी स्वीकारून आरोपिंना कठोर शासन करावे व मयताच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.