आंदोलन
…बंद कंपनी सूरु,महावितरण कंपनीला कोलदांडा,शेतकऱ्यांत संताप !

न्यूजसेवा
कोपरगाव (नानासाहेब जवरे)
नाशिक येथील महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने येवला आणि कोपरगाव तालुक्याच्या सीमारेषेवर असलेल्या नांदेसर येथील मे.कृष्णा एन्झायटेक प्रायव्हेट लिमिटेड हा भूजल दूषित करणारा प्रकल्प बंद करण्यासाठी महावितरण कंपनी,नांदेसर ग्रामपंचायत पदाधिकारी आणि प्रशासन आदींना सदर उद्योगाचा वीज पुरवठा पाणी पुरवठा व विद्युत जोडणी खंडित करण्याचे दिलेले आदेश दिले असताना काही महावितरण कंपनीचे काही कनिष्ठ अधिकारी वादग्रस्त कंपनीशी संगनमत करून सदर प्रकल्प अवेळी सुरू करून सदर कंपनीस मदत करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

“आमच्या इ.टी.पी.प्लॅन्ट देखभालीसाठी बंद असल्याची कबुली देऊन तो आम्ही आता दुरुस्त केला आहे व तो लवकरच सुरू होणार आहे.त्यासाठी प्रदूषण महामंडळाचे अधिकारी श्री.महाजन यांनी नुकतीच कंपनीस भेट दिली असून त्यास अहवाल वरिष्ठ कार्यालयाला दिला आहे.मात्र महावितरण कंपनीची विद्युत जोडणी काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून अद्याप सुरू असल्याच्या आरोपाचे मात्र त्यांनी खंडन केले आहे”- एक जबाबदार अधिकारी,मे.कृष्णा एन्झायटेक प्रायव्हेट लिमिटेड,नांदेसर,तालुका येवला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव आणि येवला तालुक्यातील सीमारेषेवर असलेल्या नांदेसरसह,नाटेगाव,बदापूर आदी सहा गावातील भूजल प्रदूषित करून कृषीक्षेत्र उध्वस्त करणाऱ्या मे.कृष्णा एन्झायटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या शेती क्षेत्रात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याचे अहवाल नुकतेच प्राप्त झाले होते.सदरचे पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित असल्याचे उघड झाल्याने या गावातील शेतकरी संघटनेने सदर कंपनी बंद करावी अशी मागणी केली होती.त्या मागणीला यश आले असून नाशिक येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्पादन उपक्रम तातडीने बंद करण्याचे निर्देश दिले होते.तसे न केल्यास,जल अधिनियम १९७४ आणि हवा अधिनियम १९८१ च्या तरतुदींनुसार तुमच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याशिवाय मंडळाकडे कोणताही पर्याय राहणार नाही अशी सक्त ताकीद प्रदूषण महामंडळाचे अधिकारी विद्यासागर किल्लेदार यांनी दिली असताना आता नवीन मामला समोर आला आहे.त्यात महावितरण कंपनीने सदर विद्युत जोडणी खंडित केली असल्याचा घटनेस स्थानिक शेतकऱ्यांनी दुजोरा दिला आहे.मात्र महावितरण कंपनीचे अधिकारी आणि संबंधित कंपनीच्या व्यवस्थापन समितीचा एक अधिकारी आणि एक कनिष्ठ दर्जाचा महावितरण कंपनीचा अधिकारी असे मिळून ते महावितरण कंपनीला मूर्खात काढण्याचे पातक करत असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यात जोडणी करून कंपनीचे युनिट सुरू करून आपल्या भाकरी भाजून घेत असल्याची माहिती हाती आली आहे.त्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुजोरा दिला आहे.

“स्थानिक शेतकरी आणि संबंधित ग्रामप्राधिकरणांची पूर्वलिखित परवानगी व संमती प्राप्त केल्यानंतरच कंपनीला पुन्हा सुरू करून कामकाज करण्याची परवानगी द्यावी.कंपनीच्या कामकाजामुळे प्रभावित झालेल्या स्थानिक शेतकऱ्यांची झालेली हानी,गैरसोय,नुकसान किंवा परिणाम याबाबत योग्य ती भरपाई परस्पर संमतीने किंवा सक्षम प्राधिकरणाने निश्चित केल्यानुसार देण्यात यावी.त्यानंतरच कंपनी सूरू करण्यास परवानगी द्यावी अन्यथा शेतकरी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील”- नानासाहेब मोरे,कार्यकर्ते शेतकरी संघटना,कोपरगाव तालुका.
दरम्यान याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ,नाशिकचे प्रादेशिक अधिकारी यांना एक पत्र पाठवून याकडे लक्ष वेधले आहे.त्यात त्यांनी म्हटले आहे की,” मे.कृष्णा एन्झायटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची विद्युत जोडणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड यांनी खंडित केली आहे.संबंधित कंपनीस लागू असलेल्या नियमांनुसार आणि सक्षम प्राधिकरणाने जारी केलेल्या निर्देशांनुसार,जवळील सहा गावांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्राधिकरणांकडून आवश्यक परवानगी किंवा संमती प्राप्त केल्याशिवाय कृष्णा एन्झायटेक प्रा.लि.कंपनी व तिचे कामकाज सुरू करण्याची परवानगी देऊ नये.स्थानिक शेतकरी आणि संबंधित ग्रामप्राधिकरणांची पूर्वलिखित परवानगी व संमती प्राप्त केल्यानंतरच कंपनीला पुन्हा सुरू करून कामकाज करण्याची परवानगी द्यावी.कंपनीच्या कामकाजामुळे प्रभावित झालेल्या स्थानिक शेतकऱ्यांना झालेली कोणतीही हानी,गैरसोय,नुकसान किंवा परिणाम याबाबत योग्य ती भरपाई परस्पर संमतीने किंवा सक्षम प्राधिकरणाने निश्चित केल्यानुसार देण्यात यावी.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणाची नोंद घेऊन कृष्णा एन्झायटेक प्रा.लि.पुन्हा सुरू करण्याबाबत तसेच त्यांचा वीजपुरवठा पुनर्स्थापित करण्याबाबत नांदेसर,नाटेगाव,बदापूर,पिंपळगाव जलाल,येसगाव,खिर्डी गणेश आदी सहा गावातील ग्रामपंचायतीकडून आवश्यक परवानग्या,स्थानिक शेतकऱ्यांची संमती असल्याशिवाय सुरू करून देऊ नये.अन्यथा शेतकरी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कंपनी आणि महावितरण कंपनीवर राहील असा इशारा त्यांनी शेवटी दिला आहे.
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कृष्णा एन्झायटेक प्रा.लि.कंपनीच्या एका जबाबदार अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी,”आमच्या इ.टी.पी.प्लॅन्ट देखभालीसाठी बंद असल्याची कबुली देऊन तो आम्ही आता दुरुस्त केला आहे व तो लवकरच सुरू होणार आहे.त्यासाठी प्रदूषण महामंडळाचे अधिकारी श्री.महाजन यांनी नुकतीच कंपनीस भेट दिली असून त्यास अहवाल वरिष्ठ कार्यालयाला दिला आहे.मात्र महावितरण कंपनीची विद्युत जोडणी काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून अद्याप सुरू असल्याच्या आरोपाचे मात्र त्यांनी खंडन केले आहे व लवकरच आमचा प्रकल्प सुरू होईल असा आशावाद व्यक्त केला आहे.त्यामुळे येवला आणि कोपरगाव तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.



