आंदोलन
पंतप्रधान,संघचालकांवर टीका,सत्तेच्या लाभार्थ्यांचे तोंड बंद-वहाडणेंची टीका

न्यूजसेवा
कोपरगांव -(प्रतिनिधी)
नीट पेपरफुटीनंतर विद्यार्थी आणि तरुणांमधील अनेक वर्षांचा संताप उफाळून आला.याविरोधात कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर मंतर येथे आंदोलन सुरू झाले होते.आंदोलनानंतर,मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नुकताच राजीनामा दिला आहे.या दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसंघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांच्यावर सामाजिक माध्यमांवर टीकेचा भडिमार झाला मात्र गेल्या बारा वर्षात भाजपमध्ये येऊन पदाचे गुलाबजामुन खाणाऱ्यांनी याबाबत ‘च’कार शब्द काढला नाही की सोशल मिडिया सेलने आपले मौन सोडले नाही.याबाबत भाजप या कार्यकर्त्यांना सक्रिय का करू शकला नाही ? असा कडवा सवाल कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते विजय वहाडणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विचारला आहे.

राज्यात जनसंघ आणि भाजपला उभे करण्यात माजी खा तथा प्रदेशाध्यक्ष स्व.सूर्यभान पाटील वहाडणे त्यांचे कुटुंब त्यांचे सहकारी यांचे मोठे योगदान राहिले आहे.हे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी,मंत्री पंकजा मुंडे,विधानसभेचे माजी सभापती व राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे यांच्यासह राज्यातील अनेक ज्येष्ठांना माहिती आहे.तरीही आधुनिक भाजपात आलेल्या आगंतुकाणी मात्र या कुटुंबाची उपेक्षा के ली आहे. व ज्यांना आयुष्यभर विरोध केला त्यांना पक्षाने पावन करून घेतल्याने हा संताप बाहेर पडला असल्याचे मानले जात आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”देशातील पेपरफुटी आता एका परीक्षेपुरती किंवा राज्यापुरती मर्यादित राहिलेली नाही.हे संपूर्ण देशभरात पसरलेले एक मोठे,संघटित जाळे बनले असल्याचे मानले जात आहे.प्रसारमाध्यमांचे अहवाल आणि सरकारी कारवाईनुसार,2014 जुलै 2026 पर्यंत किमान 116 पेपरफुटीची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.या प्रकरणांमुळे अंदाजे 7.5 कोटी उमेदवार प्रभावित झाले आणि हे पेपर माफियांचे जाळे 19 राज्यांमध्ये पसरलं असल्याचे मानले जात आहे.सन -2014 ते 2024 दरम्यान 89 प्रकरणे नोंदवली गेली.या प्रकरणांमध्ये 21 केंद्रीय संस्था आणि 68 राज्यस्तरीय परीक्षांचा समावेश असल्याचे मानले जात आहे.या विरुद्ध देशातील तरुणाईचा कधीं नव्हे एवढा राग उफाळून आला होता.त्यांनी दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर मंतर येथे 36 दिवस आंदोलन सुरू करून त्याचा समारोप मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नुकताच राजीनामा देऊन झाला आहे.

दरम्यानच्या काळात अनेक झुंडीनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,भाजप,हिंदुत्ववादी संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांचं विरुद्ध गरळ ओकली आहे.निष्कलंक-निःस्वार्थ नरेंद्र मोदी व मोहन भागवत यांच्यावर टिका होत असतांनाही आपण मूग गिळून बसणे योग्य नव्हते”असे आपल्याला वाटत असल्याचा दावा करून त्यांनी भाजपचा म्हणजेच आपला सोशल मीडिया विभाग लाखो कार्यकर्त्यांना का सक्रिय करू शकला नाही ? असा कडवा सवाल विचारला आहे.सन -2014 च्या लोकसभा निवडणुकीत सोशल मिडीयाचा खुबीने वापर केल्याने त्यांना देशभर विजय मिळाला होता.त्यानंतर भाजपने या सामाजिक संकेतस्थळाला अनन्यसाधारण महत्व दिले होते.सोशल मिडिया सेलची स्थापना करून राज्यभर आपले विचार पोहचवण्यासाठी त्यांची मदत घेतली होती.त्यासाठी लाखो पदाधिकारी आणि कार्यकर्ते नियुक्त केले होते.मात्र दिल्लीत सी.जे.पी.चे आंदोलन सुरू झाल्यानंतर ही मंडळी कोठे गायब झाली हे काही कळू शकले नाही.मात्र भाजपने निष्ठावानाना टाळून काँग्रेससह विविध पक्षातून आयात केलेल्या अनेकाना पक्षात घेऊन पावन करून घेतले.निष्ठावंतांना डावलून आपल्या भाकरी भाजलेल्या त्या लाभार्थ्यांनी तरी या विखार वादळाला थोपवण्याची आवश्यकता होती.मात्र ही लाभार्थी मंडळी कोणत्या बिळात जाऊन लपली हे समजायला मार्ग नाही” अशी टीका केली आहे.
दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटले आहे की,”सोशल मीडियाचा वापर करुन आंदोलन उभे राहिले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व हिंदुत्ववादाचा आणि भाजपाचा द्वेष करणारे सारे असंतुष्ट गोळा झाले.देशातील विरोधी पक्षांनी किळसवाणे राजकारण केले.देशद्रोही प्रवृत्तीनी काही विदेशी फंडावर सर्वत्र अराजक निर्माण केले.या शिवाय मुस्लिम तर जणू भाजपा संपविण्यासाठी तुटूनच पडले होते.या सर्वांनी सोशल मीडियावर जणू रानच पेटविले होते.भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष असा गाजावाजा केला गेला.निष्ठावंतांना मात्र यात कोठेही स्थान असल्याचे गेली बारा वर्षात जाणवले नाही.ते आम्ही आणि आमच्या सारखे सहनही करतील पण पक्षावर जेव्हा कठीण प्रसंग येतो त्यावेळी तरी या लाभार्थ्यांनी पुढे येऊन या टीकेचा सामना करण्याची किमान अपेक्षा होती.मात्र ती कोठेही आढळून आली नाही हे विशेष ! बाहेरून आलेल्याना फक्त पदे हवी आहेत.पण पक्षासाठी वाईटपणा ते घेऊच शकत नाही असा दावा त्यांनी केला आहे.(तुरळक ठिकाणी याला अपवाद होता.काही निषेधाच्या बातम्या होत्या मात्र त्या अपवादात्मक होत्या) याबाबत आम्ही नक्कीच कमी पडलो यात शंकाच नाही”असा दावा करून.” सर्वसामान्य निष्ठावान कार्यकर्त्यांना महत्व दिले नाही तर असेच होणार “असा दावा माजी नगराध्यक्ष व भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते विजय वहाडणे यांनी शेवटी केला आहे.याबाबत अहिल्या नगर आणि राज्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.



