महसूल विभाग
…या ठिकाणी शिवपाणंद शेतरस्ते जनजागृती होणार !

न्यूजसेवा
कोपरगांव -(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेत रस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका शेतरस्ता कृती समितीच्या वतीने रविवार दि.२६ जुलै रोजी जनजागृती अभियानाचा शुभारंभ कोपरगाव तहसील कार्यालय येथून करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

“कोपरगाव तालुक्यात शेतरस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून फौजदारी स्वरूपाच्या घटना वाढत चालल्या आहेत.न्यायालयात देखील मोठ्या प्रमाणावर खटले प्रलंबित आहेत.शेतरस्त्यांच्या कारणामुळे आपापसात मोठे वाद निर्माण होऊन अनेकांचे डोके फुटत आहे.भविष्यात निर्माण होणारा अनर्थ टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन अंमलबजावणी करणे गरजेचे आहे म्हणून या जागृती अभियानास सुरुवात करत आहे”- शेतपानंद रस्ते कृती समिती,कोपरगाव तालुका.
शेतकऱ्यांना आपल्या शेतातील कृषी उत्पादने आणि यंत्रे सहज नेता यावीत यासाठी महाराष्ट्र शासनाने “मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना” सुरू केली आहे.या योजनेंतर्गत यंत्रसामग्रीच्या साहाय्याने जलद गतीने पक्के बारमाही रस्ते बांधले जातात.शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी बारमाही रस्ते उपलब्ध करून देणे,जेणेकरून शेतीमालाची वाहतूक सुलभ होईल.या योजनेची अंमलबजावणी महसूल विभाग आणि ग्रामपंचायतीमार्फत केली जाते.यात प्रामुख्याने मुरूम किंवा खडीकरण करून रस्ते तयार केले जातात.मात्र याबाबत अद्याप शेतकऱ्यांत जागृती असल्याचे दिसून येत नाही.त्यामुळे याबाबत जनजागृतीसाठी शरद पावले यांनी शेतकऱ्यांत जागृती सुरु केली आहे.ते रविवार दिनांक 26 जुलै रोजी कोपरगाव येथे येत आहे.
याबाबत आयोजकांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,”कोपरगाव तालुक्यात शेतरस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून फौजदारी स्वरूपाच्या घटना वाढत चालल्या आहेत.न्यायालयात देखील मोठ्या प्रमाणावर खटले प्रलंबित आहेत.शेतरस्त्यांच्या कारणामुळे आपापसात मोठे वाद निर्माण होऊन अनेकांचे डोके फुटत आहे.भविष्यात निर्माण होणारा अनर्थ टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी.सर्व गावांसाठी ग्रामस्तरिय शेतरस्ता समित्यांची स्थापना करणे.तालुक्यातील सर्व वहिवाटीच्या रस्त्यांच्या सर्वेक्षण करून त्यांच्या नोंदी गाव नकाशावर घेणे.शिवपाणंद रस्त्यांच्या हद्द निश्चित करणे आदी विषयांवर या अभियानात चर्चा होणार आहे.
याबाबत कृती समितीच्या वतीने परिपत्रक जारी करण्यात आले असून त्यावर व्यंकटराव धटपाटील,चांगदेव जुंधारे,बाळासाहेब पाचोरे,दौलत गोर्डे,शालीग्राम जावळे,अंबादास सोनवणे, कृष्णा घायतडकर,नारायण आभाळे,उमेश माकुणे,विठ्ठल होन आदी उपस्थित राहणार आहेत.या अभियानास शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कोपरगाव तालुका कृती समितीच्या वतीने शेवटी करण्यात आले आहे.



