महसूल विभाग
…या तालुक्यातील शेत पाणंद रस्त्यांस प्रशासकीय मान्यता-आ.काळे

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेतून बारमाही,मजबूत रस्त्यांचे बांधकाम करून पेरणी,मशागत,कापणी आणि शेतमाल वाहतुकीस गती देण्यासाठी कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या अडचणी सोडविण्यासाठी निधी मिळावा यासाठी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव मतदार संघातील ७.५ कोटी निधीच्या शेत पाणंद रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

शेतीमध्ये आधुनिक यंत्रांचा वाढता वापर,काढणी-मळणी यंत्रांची उपलब्धता आणि पिकांची वेळेवर वाहतूक करण्यासाठी शेत आणि पाणंद रस्त्यांची गरज दिवसेंदिवस अत्यंत वेगाने वाढत आहे.दर्जेदार रस्त्यांमुळे वाहतूक खर्च आणि वेळ वाचतो.ज्यामुळे शेतीचा नफा वाढण्यास थेट मदत होते.ट्रॅक्टर,पेरणी यंत्रे आणि काढणी यंत्रांसारखी मोठी अवजारे थेट शेतात नेण्यासाठी पक्के रस्ते असणे अनिवार्य झाले आहे.भाजीपाला,फळे आणि ऊस यांसारखा नाशवंत शेतमाल खराब रस्त्यांमुळे वेळेत बाजारात किंवा कारखान्यापर्यंत पोहोचत नाही,ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होते.पावसाळ्यात किंवा पेरणीच्या काळात खते,बियाणे आणि औषधे वाहून नेण्यासाठी पाणंद रस्ते वर्षभर सुस्थितीत असणे आवश्यक आहे.शेतकऱ्यांची हीच गरज ओळखून महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत आहे.या योजनेच्या माध्यमातून शेतरस्त्यांवरील अतिक्रमण काढणे आणि रस्त्यांचे मजबुतीकरण जलद गतीने केले जात आहे.ग्रामीण भागातील नागरीकांना शेत,पाणंद रस्त्यांची वाढती गरज लक्षात घेवून व शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून महायुती शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेतून जास्तीत जास्त लोकवस्ती असलेल्या रस्त्यांच्या कामांना गती देण्यासाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळविता येईल यासाठी आ.काळे यांच्या पाठपुरावा सुरु होता.

दरम्यान त्या पाठपुराव्याला मिळालेल्या यशामुळे मतदार संघाच्या अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेत-पाणंद रस्त्यांच्या अडचणी कायमच्या दूर होणार आहेत.कोपरगाव तालुक्यातील जवळकेसह अनेक गावांनी शेत पाणंद रस्त्याची मागणी केली होती.त्यासाठी आ.काळे यांनी पाठपुरावा करून या रस्त्यासाठी 7.5 कोटींचा निधी मंजूर केला आहे.महायुती शासनाने कोपरगाव मतदार संघातील ७.५ कोटी निधीच्या शेत पाणंद रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल आ.काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहे.



