पाणी पुरवठा योजना
पाणी योजना कधी पूर्ण होणार – यांचा सवाल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील ब्रिजलालनगर आणि मोहिनीराजनगर येथील पाण्याच्या टाकीची चाचणी घेण्यात आली त्याप्रमाणे कोपरगाव शहराच्या गोरोबानगर मधील पाण्याच्या टाकीची चाचणी लवकरात लवकर करून घ्यावी व शहराची पाणी योजना कधी पूर्ण होणार असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक वाल्मिक लहिरे यांनी कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाकडे केला आहे.

“कोपरगाव शहरातील नागरीकांना नियमितपणे पाणी मिळावे यासाठी आ.आशुतोष काळे यांनी ५ नंबर साठवण तलावाची निर्मिती करून ९५ किलोमीटरच्या वितरण व्यवस्थेचे व पाण्याच्या टाक्यांचे काम अंतिम टप्यात आले असून कोपरगाव शहरातील ब्रिजलालनगर आणि मोहिनीराजनगर येथील पाण्याच्या टाकीची चाचणी घेण्यात आली मात्र गोरोबानगर येयील पाण्याच्या टाकीचे काम कधी पूर्ण होणार” -वाल्मीक लहिरे,नगरसेवक,कोपरगाव नगरपरिषद.
कोपरगाव शहराची पाणी समस्या काही सुटण्याचे नाव घेत नाही.पाणी भरपूर असताना केवळ नियोजनाचा अभाव,सदोष वितरण व्यवस्था,24 तास,18 तास,12 तास,10 तास पाण्याच्या जोडण्या आणि पाणी चोरी ही मूळ कारणे असताना प्रस्थापित मंडळी ही मांडी सोडून मलम शेंडीला लावण्याचे काम मनोभावे करताना दिसत आहे.परिणामी प्रश्न जैसा थेच रहाताना दिसत आहे.त्यामुळे 42 कोटी,131 कोटी रुपयांची तरतूद करूनही सदरचा निधी पाण्यासारखा सत्ताधारी आणि प्रशासनाच्या खिशात गेला असल्याचे बोलले जात आहे.त्याबाबत वारंवार आरोप प्रत्यारोप झाल्याने अनेकांनी पाहिले आहे. काहींनी तर बँकेत जाऊन आपला वाटा घेतला असल्याचे फुटेज प्रसारित झाल्याचे दिसून आले होते.काही सत्ताधारी नगरसेवकांनी आपला मणी घेतल्याने त्यांना नेत्यांच्या कानपिचक्या खाव्या लागल्या होत्या या गोष्टी फार जुन्या नाहीत.आता पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर येणार अशी चिन्हे दिसू लागली आहे.याबाबत विरोधी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व नगरसेवक वाल्मीक लहिरे यांनी तसा आरोप एका प्रसिद्धी पत्रकान्वये केला आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की,”कोपरगाव शहरातील नागरीकांना नियमितपणे पाणी मिळावे यासाठी आ.आशुतोष काळे यांनी ५ नंबर साठवण तलावाची निर्मिती करून ९५ किलोमीटरच्या वितरण व्यवस्थेचे व पाण्याच्या टाक्यांचे काम अंतिम टप्यात आले असून कोपरगाव शहरातील ब्रिजलालनगर आणि मोहिनीराजनगर येथील पाण्याच्या टाकीची चाचणी घेण्यात आली असून या दोन्ही टाक्याच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.
त्याप्रमाणे गोरोबानगर मधील पाण्याच्या टाकीचे देखील काम पूर्ण झाले असून नागरीकांना नियमितपणे पाणी पुरवठा होण्यासाठी गोरोबानगर येथील पाण्याच्या टाकीची चाचणी घ्यावी.कोपरगाव शहराचा पुढील ५० वर्ष पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही हि दूरदृष्टी ठेवून आ.काळे यांनी कोपरगाव शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेवून नियोजन केलेले आहे.त्यामुळे लवकरात लवकर पाणी योजनेच्या वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण करून कोपरगावकरांना पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करावा अशी मागणी नगरसेवक वाल्मिक लहिरे यांनी शेवटी केली आहे.



