न्यायिक वृत्त
समृद्धी दरोडा प्रकरण,आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी !

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील समृद्धी महामार्गावर आयशर वाहन दुरुस्त करणाऱ्या मेकॅनिक व त्याच्या साथीदारांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करत 1.2 लाखांचा ऐवज लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला होता.या गुन्ह्यातील चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून,दोन जण पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात सफल झाले असून अटक आरोपींना पोलिसांनी काल कोपरगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री.साठे यांच्यासमोर हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

आरोपींकडून गुन्ह्यात चोरी केलेले दोन मोबाईल,२ हजार रुपये रोख आणि ८० हजार रुपये किमतीची हिरो प्लेंडर मोटारसायकल (एमएच-१७-डीपी-३२१३) असा एकूण १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ताब्यातील आरोपींना जप्त मुद्देमालासह कोपरगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.त्या चार आरोपींना काल कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंधिकारी श्री.साठे यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन त्यांना दिनांक 16 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,”मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग कधी अपघातांमुळे तर कधी लुटमारीमुळे चर्चेत राहतो.या महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा दावा करण्यात येत असला तरी 53 हजार कोटी रुपये खर्च करुन उभारलेल्या या महामार्गावरील प्रवासात प्रवासी असुरक्षितच असल्याचे नुकत्याच घडलेल्या दोन घटनांमुळे दिसून आल्याने प्रवासी सुरक्षिततेचा मुद्दा गंभीर झाला आहे.नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मलढोण आणि दुशिंगपूर शिवारात गुरुवारी मध्यरात्री दरोडेखोरांच्या टोळक्याने लुटमारीसाठी एक वेगळीच पध्दत वापरली.लूटमारी करणाऱ्यांनी धावत्या वाहनांच्या मार्गात खिळे आणि धारदार लोखंडी वस्तू टाकून वाहनांचे टायर पंक्चर करुन लुटमारीचा डाव साधळा.लाखो रुपयांची लुटालूट करण्यात आल्याचे उघड झाले आहे.दीड तासांहून अधिक काळ चाललेल्या या प्रकारात तीन वाहने लक्ष्य करण्यात आली.वावी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असताना कोपरगाव तालुक्यात कोकमठाण हद्दीत समृद्धीच्या पुलाखाली दबा धरून बसलेले दरोडेखोर सापडले आहे.तर दुसरी घटना भोंजडे हद्दीत पोल क्रमांक 508 जवळ उघडकीस आली असून या लागोपाठ दोन घटना उघडकीस आल्या आहेत.

दरम्यान दुसऱ्या घटनेत ८ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा एकच्या सुमारास फिर्यादी अभिषेक मच्छिंद्र गायकवाड (वय-२०,रा.पिंपळवाड रोड,साकुरी,ता.राहाता) हे समृद्धी महामार्गावरील पोल क्रमांक ५०८ येथे आयशर कंपनीच्या वाहनाची दुरुस्ती करत होते.त्यावेळी सहा अज्ञात व्यक्तींनी तेथे येऊन फिर्यादी व साक्षीदारांना चाकूचा धाक दाखवला होता.त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मोबाईल व रोख रक्कम जबरदस्तीने घेऊन आरोपी पसार झाले होते.याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या होत्या.पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी चार तपास पथके तयार केली होती.या पथकांनी घटनास्थळी पाहणी करत गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळविण्यासोबतच तांत्रिक विश्लेषण केले.तसेच समृद्धी महामार्गावरील तब्बल १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील फुटेजचे विश्लेषण करण्यात आले होते.चार दिवसांच्या सातत्यपूर्ण तपासानंतर ११ सप्टेंबर रोजी आरोपींबाबत पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी कोपरगाव ते शिर्डी मार्गावरील समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ,कोकमठाण गावच्या शिवारात मोटारसायकलसह थांबलेल्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.त्यांची नावे धनंजय उर्फ धनु प्रकाश काळे (वय-२७), स्वप्नील संतोष भारूड (वय-२०), प्रशांत जालिंदर भारूड (वय २०) आणि शिवरंजन राजेश शिंदे (वय-२२) अशी आढळून आली आहे.याबाबत पोलिसांनी अधिकची चौकशी केली असता धनंजय उर्फ धनु काळे याने अन्य आरोपींसह चंदू नारायण तहकीक (रा.सावळीविहीर,ता.राहाता) आणि त्याच्या एका मित्राच्या मदतीने दरोडा केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.चंदू तहकीक व त्याचा मित्र सध्या फरार आहेत. दरम्यान पोलिसांच्या ताब्यातील धनंजय उर्फ धनु काळे आणि स्वप्नील भारूड हे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती हाती आली आहे.त्यांच्याविरुद्ध यापूर्वी दरोडा,चोरी,घरफोडी,मारहाण आदी स्वरूपाचे विविध गुन्हे दाखल आहेत.
आरोपींकडून गुन्ह्यात चोरी केलेले दोन मोबाईल,२ हजार रुपये रोख आणि ८० हजार रुपये किमतीची हिरो प्लेंडर मोटारसायकल (एमएच-१७-डीपी-३२१३) असा एकूण १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ताब्यातील आरोपींना जप्त मुद्देमालासह कोपरगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.त्या चार आरोपींना काल कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंधिकारी श्री.साठे यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन त्यांना दिनांक 16 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याचे माहिती उपलब्ध झाली आहे.दरम्यान आरोपींच्या वतीने ॲड.गंगावणे यांनी काम पाहिले तर सरकारीपक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता प्रदीप रणधीर यांनी काम पाहिले असल्याची माहिती हाती आली आहे.



