जलसंपदा विभाग
निळवंडे वितरण व्यवस्था,..या चाऱ्यांचे कामे तातडीने सुरू करा-मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
उत्तर नगर व नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या मुख्य कालव्यांवरील उर्वरील संपूर्ण ६३ हजार १८१ हे. लाभक्षेत्र वितरण प्रणालीचे क्षेत्र पाईप लाइन वितरण (पी.डी.एन.)द्वारे सिंचनाखाली आणणे करिता ऑक्टोबर २०२४ मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आलेले असून काम कार्यक्षेत्रावर प्रगतीत असले तरी आणि पावसाला केवळ एक महिन्यावर आला असताना जलसंपदा विभागाने डी.वाय.04 उजवी आणि डाव्या वितरण व्यवस्थेचे काम अद्याप सुरू केलेले नाही त्यामुळे बहादरपूर आणि सायाळे परिसरातील शेतकऱ्यांत अंसतोष निर्माण झाला असून ही कामे या विभागाने तातडीने हाती घ्यावी अशी मागणी निळवंडे कालवा कृती समितीचे कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.

दरम्यान सिन्नर तालुक्यातील सायाळे परिसरात जलसंपदा विभागाने दिलेले दुसरे आवर्तन पोहचू शकले नव्हते.आता जलसंपदा विभागाने अंतिम उन्हाळी आवर्तन सुरू केले आहे.ते पाणी मलढोण पुढील भागात पोहचणे गरजेचे आहे.त्याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी अशी मागणी समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते तानाजी शिंदे,भाऊसाहेब शिंदे,सुधाकर शिंदे व डी.पी.शिंदे गुरुजी आदींनी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,”निळवंडे कालवा कृती समितीने उत्तर नगरसह नाशिक जिल्ह्यातील ०७ तालुक्यातील दुष्काळी १८२ गावांना निळवंडे धरणाचे प्रस्तावित पाणी मिळण्यासाठी रस्त्यावरील लढा केलाच पण केंद्रीय जल आयोगाकडून १४ मान्यता मिळवल्या होत्या तर उर्वरित मान्यतेसाठी औरंगाबाद उच्च न्यायालयात पत्रकार नानासाहेब जवरे,रूपेंद्र काले आदींनी दुष्काळी शेतकऱ्यांना एकत्र करून कालवा कृती समितीच्या वतीने व शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांच्या विधी सहाय्याने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.त्यातून औरंगाबाद उच्च न्यायालयाने सन-२०१९ साली सदर कालव्याचे काम ऑक्टोबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.ते मुदत वाढवून व जलसंपदाचे आर्थिक अधिकार गोठवून अखेर दि.३१ मे २०२३ रोजी निळवंडे लाभक्षेत्रातील बहुतांशी गावांना निळवंडे धरणाचे पाणी सोडण्यात आले.तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडून सर्वाधिक निधी आणला होता.

“संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव गावातील पश्चिमेच्या वंचित भागातील ३०३.०९९ हेक्टर क्षेत्र वगळले होते.त्याबाबत निळवंडे कालवा कृती समितीने पुढाकार घेऊन वगळलेल्या क्षेत्राला पाणी देण्याबाबत जलसंपदा विभागाकडून कालवा कृती समितीने तसे लेखी घेतले आहे.याबाबत समितीची उच्च न्यायालयात जाण्याची तयारी आहे.सदर कामाची प्रशासकीय मान्यता प्रगती पथावर आहे.त्यामुळे सदर कामे तातडीने सुरू करावी अन्यथा शेतकऱ्यांच्या नुकसानीस जलसंपदा विभाग जबाबदार राहील”-गंगाधर रहाणे,कार्याध्यक्ष,निळवंडे कालवा कृती समिती,अ.नगर-नाशिक.
जलसंपदा विभागाने वर्तमानात येथील पाझर तलाव,कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरण्यासाठी आठवड्यापूर्वी आवर्तन सुरू केले आहे.मात्र जवळके,अंजनापूर,बहादरपूर,धोंडेवाडी,बहादराबाद,शहापूर आदी गावांना तीन वर्षे उलटूनही पाणी मिळालेले नाही.तर संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव गावातील पश्चिमेचा भागातील ३०३.०९९ क्षेत्र वगळले होते.त्याबाबत निळवंडे कालवा कृती समितीने पुढाकार घेऊन वगळलेल्या क्षेत्राला पाणी देण्याबाबत जलसंपदा विभागाकडून कालवा कृती समितीने तसे लेखी घेतले आहे.त्याबाबत समितीची न्यायालयात जाण्याची तयारी आहे.मात्र सदर कामाची प्रशासकीय मान्यता प्रगती पथावर आहे.मात्र नाशिक आणि नगर जिल्ह्यातील हद्दीवर असलेल्या बहादरपूर आणि सायाळे या दुष्काळी गावातील शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी महत्वपूर्ण असलेली अद्याप डी.वाय.04 पूंछ उजव्या चारीचे काम अद्याप सुरू झालेले नाही.त्यामुळे शेतकऱ्यांत जलसंपदा विभागाबाबत अच्छाखासा राग दिसून येत आहे.त्यामुळे सदर चारीचे रेखांकन व तांत्रिक मान्यता तातडीने मंजूर करून घ्यावी.पावसाळा केवळ एक महिन्यावर आला आहे.त्यातच दुसरे आवर्तन या भागात मिळालेले नाही.त्यामुळे शेतकरी संतप्त आहे.त्यामुळे ही कामे एक महिन्यांत पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे गरजेचे आहे.
दरम्यान चिंचोली,मलढोण,दुशिंगपूर आदींसाठी महत्वपूर्ण असलेली डी.वाय.04 पूंछ डाव्या चारीचे काम पूंछ भागाकडून सुरू आहे.मात्र त्याची गती संथ आहे.ते काम वरील बाजूने सुरू होणे गरजेचे आहे.याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी निळवंडे कालवा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व शिष्टमंडळाने वारंवार चर्चा करून मागणी केलेली आहे.मात्र त्याबाबत प्रशासनाचा अक्षम्य ढिसाळपणा सुरू आहे.आगामी तीन चार दिवसात ही दोन्ही कामे सुरू न झाल्यास सायाळे,बहादरपूर,दुशिंगपूर,माळढोण आदी परिसरातील शेतकरी आंदोलन करतील असा इशारा कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे यांनी शेवटी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.



