संपादकीय
कोपरगावात गुन्हेगारांचे उदात्तीकरण,चिंतेचा विषय !

न्यूजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
राजकारणातील गुन्हेगारीचे उदात्तीकरण हा लोकशाहीसाठी एक गंभीर आणि चिंतेचा विषय बनला आहे,ज्यामुळे कायद्याचे राज्य धोक्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे.त्यामुळे नैतिक मूल्यांची हानी होत आहे,आणि सामान्याचा लोकशाहीवरील विश्वास उडतो.कायदे तयार करणाऱ्या पदांवर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक पोहोचल्याने कायद्याच्या राज्य या प्रतिमेला तडा जात असून परिणामी पारदर्शकतेला तडा जात आहे.राजकारणात बाहुबल आणि पैशांचा प्रभाव वाढल्याने समाजात भीतीचे वातावरण तयार होते.गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नेत्यांमुळे तपास यंत्रणा आणि प्रशासनावर दबाव वाढतो.मात्र याचा दाहक अनुभव पूर्वी नगर शहरात येत होता मात्र आता कोपरगाव तालुक्यात आणि विशेषतः उत्तर नगर जिल्ह्यात आता येऊ लागला आहे.कोपरगाव शहरातील वाढदिवसाचे लागलेले फलक (बॅनर) पाहिले तर याचा कोणाही सुज्ञ व्यक्तीस अनुभव आल्याशिवाय राहणार नाही.ज्या व्यक्तीवर आर्म ॲक्टसह,हाणामारी,गोळीबार,रेशन माफिया,अवैध व्यवसायातील विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याचे फलक पश्चिम गडावरील विद्यमान लोकप्रतिनिधींच्या वाढदिवसाला दिसून येत असून एकीकडे सव्वा लाखांचे मताधिक्य मिळाले म्हणायचे आणि दुसरीकडे नेत्याला शुभेच्छा द्यायला कार्यकर्तेच शिल्लक राहिले नाही अशी विरोधाभासी प्रतिमा तयार करून आपल्या स्वतःला संशयाच्या भोवऱ्यात आ.आशुतोष काळे हे उभे करताना दिसून येत असल्याने याबाबत कोपरगाव शहर आणि मतदार संघात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

लोकप्रतिनिधी आ.आशुतोष काळे यांना शुभेच्छा देणाऱ्या आरोपीवर कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात आरोपीवर दाखल असलेले व डोळ्यात तेल घालणारे सहा गंभीर गुन्हे आणि कलमे पुढे दर्शवली आहेत.गुन्हा क्र.1) कलम १६५/२०१९ भा.द.वि.कलम ३०७,१४३,१४७,१४८,१४९,३२४,५०४,४२७ प्रमाणे,गुन्हा क्र.2) २४१/२०१९ भा.द.वि.कलम ३०७,१४३,१४७,१४८,१४९,३२४,५०४ आर्म अँक्ट ४,२५ प्रमाणे,गुन्हा क्र.3) ३१/२०२० भा.द.वि.कलम ३९९,४०२ प्रमाणे,गुन्हा क्र.4)३२/२०२० भा.द.वि.कलम १४३,१४७,१४८,३२४,३२३,५०४,५०६ प्रमाणे,गुन्हा क्र.5) १७०/२०२३ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे,गुन्हा क्र.6) ४२३/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १०९(१),१२६(२),१८९(२),१८९ (४), १९०,१९१(२), १९१(३) सह आर्म अॅक्ट ३/२५,३/२७ प्रमाणे दर्शवले आहेत.
वास्तविक विद्यमान आ.आशुतोष काळे हे आपल्या आजोबाप्रमाणे संयमी नेतृत्व मानले जाते.यात कुठलीही शंका नाही.त्यांनी इतरांपेक्षा जास्त निधी आणला आहे यात शंका नाही.त्यामुळे ते विशेषतः त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी अभिनंदनास पात्र आहेत आणि ते केलेच पाहिजे.मात्र त्या निधीतून झालेली कामे कशी झाली हे मात्र मतदारांवर सोडून वर्तमान राजकारणातील गुन्हेगारीचे स्थित्यंतर लक्षात घेणे गरजेचे वाटते.अलीकरील काळात म्हणजेच तीन चार दशकात राजकारणाचे गुन्हेगारीकरण किंवा गुन्हेगारांचे राजकियीकरण हे मोठ्या वेगाने होताना दिसत आहे.वेगवेगळ्या पातळीवरून त्यावर नेहमी चिंतन होते.पण चिंतन आणि चिंता या पलीकडे हा विषय देशात पुढे सरकताना दिसत नाही.राजकीय पक्षांना या प्रश्नाशी काही देणे-घेणे दिसत नाही.त्यामुळे जोपर्यंत मतदार राजकारणाचे शुद्धीकरण मनावर घेणार नाहीत,तोपर्यंत हे साटेलोटे कायम राहील.कोणत्याही शासनाकडून किंवा कायदा करून हा विषय सुटण्यासारखा नाही.त्यासाठी मतदारांनीच आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे.राजकारणात जसजशी बाहुबलींची गर्दी वाढत गेली आणि राजकारणी आणि गुन्हेगारांचे ऋणानुबंध वाढत गेले,तेव्हापासून म्हणजे 1980 च्या दशकापासून देशात राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाची चर्चा सुरू झाली.ही चर्चा प्रामुख्याने राजकारणी आणि गुन्हेगारांच्या परस्पर हितसंबंधापर्यंत होती.पण,काळाच्या ओघात प्रत्यक्ष गुन्हेगारच राजकीय आखाड्यात उतरून बाजी मारू लागल्यावर त्याबाबतच्या चिंता अधिक वाढीस लागल्या.आजकाल तर बहुतांश राज्यांच्या शासनामध्ये बाहुबली ठाण मांडून बसलेले दिसतात.सन-2009 सालापासून राष्ट्रीय राजकारणातील गुन्हेगारांचा टक्का वाढीस लागलेला दिसतो.मावळत्या लोकसभेत 543 पैकी 233 म्हणजे तब्बल 43 टक्के खासदार हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याची बाब एका माहितीतून अधिकृतपणे पुढे आलेली आहे.सर्वच राजकीय पक्षांमध्ये अशा गुन्हेगार आमदार,खासदारांच्या पलटणी आढळून येतात.या बाबतीत कोणताच राजकीय पक्ष धुतल्या तांदळासारखा राहिलेला नाही.आता अशा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकप्रतिनिधींकडून देशातील सर्वसामान्य नागरिकांनी सामाजिक न्यायाची अपेक्षा करायची तरी कशी ? अर्थात राजकारणाच्या या गुन्हेगारीकरणाची अंतिम जबाबदारी ही मतदारांवरच येऊन पडते.

राजकीय नेत्यांनीच जर गुन्हेगारांना आश्रय दिला तर पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांनी काम कसे करायचे असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.यापूर्वी काही अधिकाऱ्यांनी धाडसाने काही गुन्हेगारांवर वचक बसवण्याचा प्रयत्न केलाच तर ही मंडळी दुसऱ्या निमित्ताने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करून त्यां अधिकाऱ्याची नाचक्की करताना दिसून आले आहे.त्यामुळे कोपरगावसारख्या ठिकाणी प्रामाणिक अधिकारी येण्यास धजावत नाही.परिणामी गुन्हेगारी अधिक बोकाळली असल्याचे दिसून येत आहे.याला मतदार संघातील मतदारही तेवढाच जबाबदार असल्याचे दिसून येत आहे.मतपेटीत मतदान करताना चपटी आणि गांधी छाप नोट पाहून मतदान केल्यावर आणि मतदान करताना मतदार भानात नसल्यावर परिणाम भोगावे मागणार हे ओघाने आलेच.
कोपरगाव तालुक्यात यापूर्वी सन-2014 पूर्वी अशी स्थिती नव्हती.माजी खा.सूर्यभान पाटील वहाडणे,शंकरराव काळे,माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या कार्यकाळापासून आम्ही तीन पिढ्यांचे राजकारण पाहिले मात्र पाहिलेल्या दोन पिढ्यांनी हे असले नस्ते उद्योग केलेले दिसले नाही.मात्र अलीकडील काळात राजकारण हे गचाळकारण बनत असताना दुर्दैवाने दिसून येत आहे.वाळूचोरी,अवैध व्यवसाय,रेशन घोटाळा,गुटखा यात राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते आढळून येत आहेच पण नेत्यांचे थेट संबंध दिसून येत असताना पाहणे मोठे दुर्दैवी म्हटले पाहिजे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील रस्ते,शेती सिंचन,पिण्याच्या पाण्याची,कोपरगाव शहरातील बाजारपेठेची लागलेली वाट याचेच परिणाम मानले जात आहे.आता तर कहरच दिसून येत असून कार्यकर्ते संपल्यात जमा झाले आहे.राहिले ते केवळ ठेकेदारांच्या टोळ्या,आणि लाभार्थी.त्यांनाच आता कार्यकर्ते म्हणण्याची नामुष्की नेत्यांवर ओढवली आहे.आता त्यांच्या काळात उच्चांकी पातळी गाठली गेली आहे.आणि ज्यांनी कोपरगाव तालुक्यातील वाढती गुन्हेगारीबाबत गत उन्हाळी अधिवेशनात आवाज उठवला त्या आ.आशुतोष काळे यांचे वाढदिवसाला थेट सहा गंभीर गुन्हे कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या आरोपीने त्यांचे वाढदिवसाचे फलक लावून कहर उडवून दिला आहे.विशेष म्हणजे त्याच्या जोडीला लोकप्रतिनिधींच्या जनसंपर्क कार्यालयातील एक कर्मचाऱ्याचे मुंडके दिसून येत असल्याने वाळू,अवैध व्यवसाय आणि रेशन घोटाळा किती खोल पाझरला आहे याचा प्रत्यय कार्यकर्त्यांना व नागरिकांना येत आहे.त्यामुळे आता सामान्य माणसांनी न्याय कोणाकडे मागायचा ? असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.मागील नवरात्रीत लोकप्रतिनिधींच्या स्वीयसहाय्यकाने किरकोळ कारणावरून उडवून दिलेला बार अवघ्या कोपरगाव शहर वासियांनी पाहिला आहे.त्याचा प्रसाद थेट पोलिसांना मिळाला होता.मात्र त्यानंतर हे महाशय पुन्हा लोकप्रतिनिधींच्या सेवेत आणि चरणी रुजू होऊन लोकप्रतिनिधींचे चरणरज आपल्या माथी घेते झाले आहे.त्यातच लोकप्रतिनिधीने या गुन्ह्याचे आणि स्वीय सहाय्यकांचे कर्तृत्व किती गांभीर्याने घेतले आहे हे यातून उघड होत आहे.ईशान्यगडाची वेगळी स्थिती नाही.एकाला झाकावे आणि दुसऱ्याला काढावे अशी स्थिती तालुक्यात झाली आहे.तालुक्यातील बस स्थानक आणि कोपरगाव शहरातील बस स्थानकाचे निष्कृष्ट काम आणि स्टेशन रोडचे साईबाबा कॉर्नर पासून कारखाना मार्गे रेल्वे स्टेशन रस्त्याचे काम हा त्याचा जिता जागता पुरावा मानला जात आहे.वाळूचोरीतील अग्रक्रम यांचेच नावे पहिल्यांदा नोंदवला गेला आहे.ज्या मंत्री कोल्हे यांनी आपल्या युती शासनाचे काळात वाळू माफियांविरोधात मार्च महिन्याच्या उन्हाच्या कडाक्यात काढलेला मोर्चा याची आठवण अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांना अजूनही करून देत असेल.ज्यांना गुंड,मुलींची छेडछाड करणारे म्हणून हिणवले आज तीच मंडळी त्यांचे मांडीला मांडी लावून सत्तेचे गुलाबजामुन चाखताना दिसून येत आहे.ज्या पक्षाला जातीवादी,मनुवादी म्हणून हिणवले त्याच पक्षाचा उदोउदो होताना दिसून येत असून.सत्तेत येऊन दहा वर्षे उलटली असूनही तालुक्याचा कवडीचा विकास झालेला दिसून येत नाही.मात्र विकासाची पातळी नीचांकी पातळीवर पोहचली असल्याचे सहज लक्षात आल्याशिवाय राहणार नाही.नगर-मनमाड रस्त्याचे तर विचारायला नको.या राष्ट्रीय मार्गावरून भाजपसह सर्वच नेत्यांनी प्रवासी आणि वाहनचालक आदींच्या सर्वाधिक शिव्या खाल्ल्या असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे.तर झगडेफाटा ते वडगाव पान या 33 किमी रस्त्यांची दुरावस्था विचारला नको.तीच बोंब सावळीविहिर-लासलगाव,टाकळी फाटा ते धामोरी,संजीवनी ते संवत्सर या रस्त्याची आहे.या रस्त्याचे काम अनेक वर्षापासून सुरू असले तरी त्याचा शेवट कधी होणार हे कोणालाही सांगता येणार नाही.त्यामुळे आता मतदारांनी आगामी निवडणुकात विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.हे एकवेळ क्षम्य मानावे लागेल मात्र गुन्हेगारांचे उदात्तीकरण कदापि क्षम्य म्हणता येणार नाही.याचा दाहक अनुभव लोणीकरांनी सन-2011 ला घेतला आहे.ज्या गुन्हेगाराने त्याचे जून महिन्यात मंत्रीगण नेत्याचे वाढदिवसाचे असेच बॅनर लावले होते.त्याला त्याच वाढदिवसाचे पहाटे ए.टी.एस.च्या पथकाने पहाटे उचलले होते.शिर्डी पासून थेट लोणी पर्यंत लावलेले बॅनर या नेत्याला स्वतःच्या खर्चाने काढण्याची नामुष्की ओढवली होती.त्रेधा तिरपट झाली ती वेगळी. पाप्या शेखचे असेच उदात्तीकरण शिर्डीत नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केले होते.अखेर तत्कालीन पोलिस अधीक्षक कृष्ण प्रकाश यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या.शिर्डीत त्याची धिंड काढून त्याची दहशत मोडीत काढली होती.आणि त्याचे विरुद्ध संघटित गुन्हेगारीचे (मोक्का) कलमे लावून मध्ये टाकून दिला होता.आता गुन्हेगारांचे उदात्तीकरण कोपरगाव तालुक्यातील नेत्यांनी अंगिकारले का ?असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.त्यांना परमेश्वराने सद्बुद्धी देवो इतकेच या निमित्ताने.



