क्रीडा विभाग
मेजर ध्यानचंद यांची जयंती विविध कार्यक्रमांनी संपन्न !

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर येथील गौतम पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन विविध क्रीडा उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येवून यावेळी विद्यार्थ्यांनी इंटर हाऊस हॉकी सामन्यांसह विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे.

यावेळी विविध क्रीडा स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आपल्या क्रीडागुणांचे दर्शन घडविले.विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तसेच विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले आहे.
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ रोजी झाला.त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २९ ऑगस्ट हा दिवस भारतात ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून साजरा केला जातो.मेजर ध्यानचंद यांनी भारताला १९२८ (अमस्टरडॅम), १९३२ (लॉस एंजेलस) आणि १९३६ (बर्लिन) या ऑलिम्पिक स्पर्धेत सलग तीन सुवर्णपदके मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.त्यांच्या अप्रतिम बल कंट्रोल आणि गोल करण्याच्या कौशल्यामुळे त्यांना ‘हॉकीचे जादूगार’ म्हटले जाते.संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी १००० हून अधिक गोल केले.भारताच्या या महान खेळाडूचा सन्मान करण्यासाठी १९५६ मध्ये त्यांना भारताचा तिसरा सर्वोच्च नागरिक पुरस्कार ‘पद्मभूषण’ प्रदान करण्यात आला व त्यांच्या स्मरणार्थ आणि भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी २०१२ पासून त्यांचा जन्मदिवस अधिकृतपणे राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून पाळला जात आहे.कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर येथील गौतम पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन विविध क्रीडा उपक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

याप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस संस्थेचे अध्यक्ष माजी आ.अशोक काळे,संस्थेच्या सचिव चैताली काळे,सर्व विश्वस्त मान्यवरांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी गव्हर्निग कौन्सिल सदस्य भास्करराव आवारे,बाबासाहेब कोते,ज्ञानदेव मांजरे,दिलीप चांदगुडे,किसन पाडेकर,राधुजी कोळपे,सुनील बोरा,मधुकर बडवर.निरीक्षक नारायण बारे आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधत प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभाग प्रमुख रमेश पटारे,राजेंद्र आढाव,इसाक सय्यद व महेश गोंडे यांच्या नियोजनातून इंटर हाऊस हॉकीच्या मैत्रीपूर्ण सामन्यांचे आयोजन करण्यात आले.ऑरेंज,ब्ल्यू,ग्रीन आणि यलो हाऊसच्या खेळाडूंनी या सामन्यांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले.त्यामुळे हॉकीच्या मैदानावर चुरस आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
सदर प्रसंगी हॉकी सामन्यांचे उद्घाटन मीरा-भाईंदर नवघर डिव्हिजनचे एसीपी सोहेल शेख यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी क्रीडा क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सातत्य,शिस्त,संघभावना आणि मेहनत या गुणांचे महत्त्व अधोरेखित केले.खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास,नेतृत्वगुण आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो,असेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शाळेतील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच चारही हाऊसच्या हाऊस मास्टर्स यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य नूर शेख यांनी उपस्थित मान्यवर,शिक्षक,कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले आहे.



