धार्मिक
संत जगातील दुर्जनाला सज्जन करतात- जगदाळे महाराज

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
संत जगातील दुर्जनाला सज्जन करतात एवढे त्यांचे सामर्थ्य असून त्यांच्या परमार्थात क्रांती करण्याचे सामर्थ्य आहे.संत गणवेशात नाही तर गुणवेषात ओळखले जात असल्याचे प्रतिपादन श्री क्षेत्र पंढरपूर येथील भागवताचार्य ह.भ.प.वैजिनाथ महाराज जगदाळे यांनी नुकतेच जवळके येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“भगवंताला आपल्या गावात वाजतगाजत आणतात तर संताला वाजतगाजत (निर्वाण)निरोप देतात.चरित्र्य भगवंताचे तर चारित्र्य किर्तीवान माणसाचे असते.जयंती संत महात्म्यांची तर पुण्यतिथी किर्तीवान माणसांची असते”-भागवताचार्य वैजिनाथ महाराज,श्री क्षेत्र पंढरपूर.
कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र जवळके येथे नुकतीच सुमारे १३-१४ लाख रुपये खर्चून श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची प्राण प्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा गोदावरी धाम येथील महंत रामगिरीजी महाराज यांचे शुभ हस्ते संपन्न
झाला त्यावेळी आदल्या दिवशी श्री क्षेत्र पंढरपूर येथील भागवताचार्य ह.भ.प.वैजिनाथ महाराज जगदाळे,पंढरपूर यांचे जाहीर हरी कीर्तन यांचे हरी कीर्तन आयोजित केले होते त्यावेळी ते आपल्या कीर्तन सेवेतून बोलत होते.
त्यावेळी त्यांनी आपल्या कीर्तन सेवेसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा
“दया तिचें नांव भूतांचें पाळण ।
अणीक निर्दळण कंटकांचें ॥१॥
धर्म नीतीचा हा ऐकावा वेव्हार ।
निवडिले सार असार तें ॥ध्रु.॥
पाप त्याचें नांव न विचारितां नीत ।
भलतें चि उन्मत्त करी सदा ॥२॥
तुका म्हणे धर्म रक्षावया साठीं ।
देवासही आटी जन्म घेणें ॥३॥
हा अभंग आपल्या कीर्तन सेवेसाठी निवडला होता त्यावेळी ते बोलत होते.त्यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त,भजनी मंडळ,महिला ग्रामस्थ,कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”भगवंताला आपल्या गावात वाजतगाजत आणतात तर संताला वाजतगाजत (निर्वाण)निरोप देतात.(दुर्दैवाने या गावी नेमकी उलट स्थिती असल्याचे विदारक सत्य असल्याची चर्चा ग्रामस्थांमधून ऐकायला मिळाली आहे) चरित्र्य भगवंताचे तर चारित्र्य किर्तीवान माणसाचे असते.जयंती संत महात्म्यांची तर पुण्यतिथी किर्तीवान माणसांची असल्याचे सांगून ते पुढे बोलताना म्हणाले की,”धर्माचे रक्षण करण्यासाठी देवाचा अवतार तर धर्माचे पालन करण्यासाठी संतांचा अवतार आहे.
त्यावेळी त्यांनी आपल्या कीर्तनात मुलगी आणि कन्यादान याचे महत्व सांगताना मुलगी नाही ते मातापिता अभागी,मुलगा मुलगी भेद करू नका दोन्ही समान असल्याचे सांगून मुलीची असलेली बापावरील माया आपल्या रसाळ वाणीतून वर्णन केली आहे त्यावेळी अनेकांना आपले अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले आहे.त्यावेळी त्यांनी माता पित्यांचा महिमा सांगताना ते म्हणाले की,”गोठ्यातील गाय आणि घरातील माय सांभाळा तुमच्या पासून सुख दूर जाणार नाही.ज्यांनी हे कार्य मनोभावे केले त्यांना पंढरपुरात जाण्याची गरज नाही.जो भक्त जीवनात नामस्मरण करतो तो जीवनात यशस्वी ठरतो.ज्याच्या अंगात पाप आहे त्याला पुण्य प्राप्ती होत नाही.परपमार्थाचा आठव आला त्याचा प्रपंच सुटतो असे सांगून त्यांनी राजाचे पाच गुण विषद केले असून त्यात,’तो’ तरुण असावा,तो श्रीमंत असावा व तो ज्ञानी असावा,तो बलवान असावा तो उदार असावा.राजाच्या अंतःकरणात दया असावी.सज्जनांचे रक्षण तर दुर्जनाचे निर्दालन ही एक प्रकारे भगवंत सेवा असल्याचे सांगून त्यांनी संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे उदाहरण दिले आहे.
त्यावेळी सामाजिक व्यंगावर बोट ठेवताना ते म्हणाले की,”माणूस एक तर पूर्ण ज्ञानी असावा त्याकडून कधीही त्रास होत नाही तर दुसरा अज्ञानी माणसाकडून समाजाला कधीं त्रास होत नाही.मात्र आडमधील माणूस असला की त्याचा समाजाला त्रास झाल्याशिवाय रहात नाही”असे सांगून त्यांनी समाजातील अनेक घडामोडी विषद करून उपस्थित जनतेत प्रबोधन केले आहे.त्यावेळी त्यांनी देशाला तीन गुण घातक तर तीन उपकारक आहे असे सांगताना त्यांनी संत या जगातील दुर्जनाला सज्जन करतात एवढे त्यांचे कार्य महान आहे.त्यासाठी त्यांनी रामायण कार वाल्मिकी ऋषी यांचे उदाहरण दिले आहे.त्याच्या इतका पापी झाला नाही असे सांगून त्यास परमेश्वराने संतत्व बहाल केले असल्याचे सांगितले आहे.
समाजातील दुर्गुणावर बोट ठेवताना ते म्हणाले की,”दुसऱ्याची वस्तू आपली म्हणणे हे पाप आहे,साधू संत,गुरू,आई वडील,आणि देश,यांची माणसाने स्वप्नात सुद्धा निंदा करायची नाही.गळ्यात तुळशीची माळ घाला,मुलगी वाचली पाहिजे,आई वडिलांची सेवा करा.शेवटी त्यांनी मातृ महिमा वर्णन करून उपस्थितांना भावनाविवश केले असल्याचे दिसून आले आहे.आषाढी कार्तिकी एकादशी करा,गळ्यात माळ घाला,सात्विक आहार करा असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.
दरम्यान उपस्थित भाविकांना ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते.त्यासाठी जवळके,धोंडेवाडी,वेस-सोयगाव,बहादराबाद,बहादरपूर आदी ठिकाणाहून भाविक भक्त यांनी हजेरी लावली होती.