कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात शालेय पोषण आहारास फुटले पाय!
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांना सरकार मार्फ़त पुरविण्यात येणारा शालेय पोषण आहार शिजविण्याऐवजी थेट घरी देण्यात येत असताना तो विद्यार्थ्यांच्या मुखातून काढून तो शालेय व्यवस्थापनाने थेट काळ्या बाजारात विकल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील भोजडे ग्रामपंचायत हद्दीतील माध्यमिक विद्यालयात रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली असून हे प्रकरण विरोधकांनी उचलून धरूनही उपयोग झालेला दिसत नाही.याबाबत त्यांनी पोलिसांशी संपर्क साधूनही उपयोग न झाल्याने ते हताश झाल्याचे दिसून येत असल्याने हे प्रकरण दाबण्यात कोण महत्वाची भूमिका निभावत आहे ? असा सवाल निर्माण झाला आहे.
“आपल्याकडे काही ग्रामस्थांनी तक्रारी केल्या होत्या व त्या नुसार आपण चौकशीसाठी शिक्षण विस्तार अधिकारी शबाना शेख व केंद्रप्रमुख किशोर निळे यांना घटनास्थळी पाठवले होते त्यांनी पालकांचे व संस्थाचालकांचे जाबजबाब घेतले असून त्यात वाटलेला शिधा व शिल्लक साठा यांचा ताळमेळ जुळत असल्याचे आहे.व आरोप केलेला असा काहीही प्रकार झाला नाही”-सचिन सूर्यवंशी,गटविकास अधिकारी,कोपरगाव पंचायत समिती.
कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील हीच ‘ती’ शालेय पोषण आहाराची वादग्रस्त जीप व त्यातीलचोरून नेत असलेला शालेय पोषण आहार.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या दृष्टीने तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटनोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्याकरीता राज्यामध्ये २२ नोव्हेंबर १९९५ पासून इयत्ता १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासन पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते.राज्यामध्ये ही योजना राज्य व केंद्र शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या,खाजगी अनुदानीत व अंशत: अनुदानीत शाळा,वस्तीशाळा,महात्मा फुले शिक्षण हमी योजना केंद्रे यांमधील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येते.
केंद्र शासनाने २००७-०८ या वर्षी या योजनेचा विस्तार करण्याचे दृष्टीकोनातून शैक्षणिकदृष्टया मागासलेल्या गटातील इयत्ता ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांस तर २००८-०९ पासून राज्यातील इयत्ता ६ वी ते ८ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना ही योजना लागू केली गेली.शालेय पोषण आहार योजना ही केंद्र शासनाने सन १९९५-९६ मध्ये सुरु केली त्यावेळी या योजनेचे स्वरुप हे विद्यार्थ्यांना प्रतिमाह ३ किलो मोफत तांदूळ देणे अशा स्वरुपाचे होते.त्यानंतर सन २००१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शालेय पोषण आहार योजनेमध्ये विद्यार्थ्यांना तांदूळ घरी न देता शिजवलेले अन्न द्यावे असे आदेश दिले.त्यानुसार सन २००२ पासून या योजनेचे स्वरुप बदलून घरी तांदूळ देण्याऐवजी विद्यार्थ्यांना शाळेतच शिजविलेले अन्न देण्यात येत होते मात्र गत वर्षी कोरोना साथीचे धर्मसंकट जगभर निर्मांण झाल्याने शासनाने हा शिधा शिजविण्याऐवजी तो प्रति विद्यार्थी या प्रमाणे घरी देण्यास प्रारंभ केला आहे.याच संधीचा फायदा घेऊन रयत शिक्षण संस्थेशी संबंधित एका स्व.बड्या नेत्याच्या स्व.पत्नीच्या नावाने कोपरगाव तालुक्यातील भोजडे ग्रामपंचायत हद्दीत सुरु असललेल्या माध्यमिक शाळेत मात्र याचा इपरित अनुभव नुकताच ग्रामस्थांना आला आहे. दि.शुक्रवार दि.२३ जुलैच्या रात्री एक पांढऱ्या रंगाची जीप क्रमांक (एम.एच.१५ बी.एन.१५४८) हि गाडी या माध्यमिक विद्यालयाच्या आवारात संशयास्पद रित्या आली व त्यांनी शाळेच्या एका खोलीतून निर्णायक शिधा भरला व ती गाडी बाहेर जात असताना याची भनक स्थानिक नागरिकांना लागली असताना काही तरुणांनी त्या गाडीची आपल्या भ्रमणध्वनीवर चित्रफीत तयार केली असून ती सामाजिक संकेत स्थळावर प्रसारित केल्याने खळबळ उडाली आहे.याबाबत काही ग्रामपंचायतच्या माजी पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करून पहिली असता पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत तक्रारच नसल्याने कारवाई कशी करणार ? असा सवाल उपस्थित केला आहे.घटनास्थळी त्यांनी पोलीस कर्मचारी पाठवून खातरजमा केली असून संस्थाचालक यांनी याबाबत असे काही घडले असले बाबत कानावर हात ठेवले आहे.व या संस्थेतून काहीही चोरीस गेलेले नाही असा साळसुदपणाचा आव आणला आहे.मात्र या घटनेपासून संस्थेचे सल्लागार मंडळ मात्र अज्ञातवासात गेले आहे.त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.त्यामुळे या परिसरात या संस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह लागले आहे.त्यामुळे ‘त्या’ रात्री आलेली ‘ती’ गाडी नेमकी कोणाची ? व तिच्यात नेमके काय वाहून नेण्यात आले आहे ? याचा खुलासा या संस्थेने करणे गरजेचे बनले आहे.मात्र या रात्री या ठिकाणी गडबड झाली असून याबाबत नागरिक त्यावर ठाम आहे.या प्रकरणी तेथील कार्यकर्ते तानाजी बोऱ्हाडे हे कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात आमच्या प्रतिनिधीस भेटले असून त्यांनी हे चोरी प्रकरण आपल्या समक्ष घडले असल्याचे ठाम विधान केले आहे.व या गाडी पाठोपाठ एक बजाज डिस्कव्हर दुचाकी होती त्याने आमच्या हातात भ्रमणध्वनी पाहिल्यावर ‘यू’ टर्न घेऊन पलायन केले आहे.या शिवाय त्यांच्या समर्थनार्थ मोठा जनसमुदाय पोलीस ठाण्यात हजर ठेवला होता.त्यांनी या सर्वांनी घटनेला दुजोरा दिला आहे.त्यात ग्रामपंचायतीचे उपसरपंच वाल्मिक सिनगर,माजी सरपंच संजय सिनगर,वाल्मिक बोऱ्हाडे आदींचा समावेश आहे.
त्यामुळे या प्रकरणी नेमके कोण-कोण गुंतले आहे ? व राजकीय नेते कोणाला वाचवत आहे ? असा सवाल निर्माण झाला आहे.चोरांनाच अभय मिळाले तर उद्या या संस्थेत राजरोस चोऱ्या होण्याचा धोका वाढला असून या संस्थेत शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांवर हि संस्था व त्यांचे सल्लागार मंडळ,मुख्याध्यापक,शिक्षक कोणते संस्कार करणार आहे ? सवाल निर्माण झाला आहे.त्यामुळे यातून सत्य बाहेर येणे गरजेचे आहे.या घटनेत स्थानिक सत्ताधारी गटाचे दोन कनिष्ठ कर्मचारी गुंतले असून त्यांना वाचविण्याचा स्थानिक सल्लागार मंडळ प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान या घटनेनंतर तालुक्याचे राष्ट्रवादीचे आ.आशुतोष काळे यांनी पुरवठा विभागाची नुकतीच एक बैठक घेऊन त्यात पुरवठा विभागाच्या आधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली असल्याचे वृत्त असून या घटनेचा व भोजडे येथील सकस आहार चोरीचा काही संबंध तर नाही ना ? असाही सवाल निर्माण झाला आहे.