कोपरगाव तालुका
‘त्या’ नगरसेवकाची नगराध्यक्ष पोलखोल करणार-माजी नगरसेवक कांबळे
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील वाहतुकीसाठी महत्वपूर्ण असलेल्या बैल बाजार रस्त्याच्या कामाबाबत एक स्थानिक नगरसेवक गैरसमज पसरविणाऱ्या बातम्या प्रसिद्ध करत असून त्या नगरसेवकांचा भंडाफोड लवकरच कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वाहाडणे हे करणार असून नागरीकांनी या अफवा पसरविणाऱ्या नगरसेवकांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन कोपरंगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक संजय कांबळे यांनी नुकतेच एका प्रसिद्धि पत्रकांवये केले आहे.
“नगरपरिषद निवडणूक जवळ येईल तसतसे कामांच्या मागण्या,आरोप-प्रत्यारोप,निवेदने,बातम्या,संदेश वाढत जाणार आहेत,हे नागरिकांनाही चांगलेच माहित आहे.कोण मनापासून विकास कामे करतंय व कोण नेत्यांना खुश ठेवण्यासाठी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या विरोधात बोलतंय हे सर्वजण जाणत आहे”-संजय कांबळे,माजी नगरसेवक.
कोपरगाव शहरात कोपरगाव शहर भाजपामुळे प्रलंबित अठ्ठावीस रस्त्याचे गुऱ्हाळ आत्ताच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मिटून त्या रस्त्यांचा मार्ग मोकळा झाला असताना आता बैलबाजार रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना अडथळे आणण्याचे काम स्थानिक भाजपचे सुरु असून विकास कामांचा बट्याबोळ करण्याचे काम सध्या जोरात सुरु असून त्याला नगराध्यक्ष विजय वहाडणे व त्यांना सहकार्य करणारा सहकारी मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.आशुतोष काळे यांनी भाजपचा विरोध नुकताच यशस्वीपणे मोडून काढलेला असताना आता हे नवीन कुभांड उभे करण्यात आले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.या पार्श्वभूमीवर हे प्रसिद्धी पत्रक हाती आले आहे.
त्यांनी प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की,”कोपरगाव शहरातील धारणगाव रोड ते कोपरगाव बाजार समितीच्या बैलबाजार रस्त्याचे काम मागील वर्षी जवळजवळ ९० टक्के पूर्ण झाले.मात्र कोरोनाच्या काळात व टाळेबंदीमुळे काही काम अपूर्ण राहिलेले आहे.या रस्त्यावरून नागरिकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणावर नेहमीच वर्दळ असते.या रस्त्यावरून चालणेही अवघड झालेले आहे,अशा प्रकारच्या बातम्या देऊन एक स्थानिक नगरसेवक गैरसमज निर्माण करत आहे.या रस्त्याच्या कामात “घोळ” करणाऱ्या त्या नगरसेवकाच्या करामती नगराध्यक्ष विजय वहाडणे लवकरच उघड करणार आहेत.खरे तर या कामाचे ठेकेदार कुऱ्हाडे यांनी कोपरगावात घेतलेल्या कामांना सुरवातही केलेली आहे.लवकरच बैलबाजार रस्त्याचे उर्वरित कामही ते पूर्ण करून देणार आहेत.नगरपरिषद निवडणूक जवळ येईल तसतसे कामांच्या मागण्या,आरोप-प्रत्यारोप,निवेदने,बातम्या,संदेश वाढत जाणार आहेत,हे नागरिकांनाही चांगलेच माहित आहे.कोण मनापासून विकास कामे करतंय व कोण नेत्यांना खुश ठेवण्यासाठी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या विरोधात बोलतंय हे सर्वजण जाणत असल्याचे प्रतिपादनही माजी नगरसेवक संजय कांबळे यांनी शेवटी केले आहे.त्यामुळे नगराध्यक्ष वहाडणे नेमके या नगरसेवकाबाबत काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.