कोपरगाव तालुका
संवत्सरमध्ये मंगळवारी मीराबाई मिरीकर यांचे कीर्तन
संपादक-नानासाहेब जवरे
संवत्सर (प्रतिनिधीं)
सालाबादप्रमाणे यावर्षीही संवत्सर येथे ऋषीपंचमी निमित्ताने ह. भ. प. मिराबाई मिरीकर यांचा किर्तनाचा कार्यक्रम मंगळवार दि. ३ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ९ वाजता शनी मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेला असून या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन संवत्सर ग्रामस्थांनी केले आहे.
संवत्सर हे गांव रामायण काळातील दंडकारण्याचा परिसर म्हणून ओळखला जातो. गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या संवत्सरमध्ये रामायण काळातील थोर महर्षि शृंगऋषींचे वास्तव्य होते. त्यांचे मोठे मंदीर या ठिकाणी आहे. या शृंगऋषींना राजा दशरथाने श्री रामाच्या जन्माच्या अगोदर पुत्र कामेष्ठी यज्ञासाठी या ठिकाणाहून नेलेले होते. म्हणून या ठिकाणाला अनन्य साधारण महत्व आहे. ऋषीपंचमी निमित्ताने या मंदिराजवळील घाटावर महिला मोठ्या संख्येने स्नानाची पर्वणी साधतात. नदीत वाळुच्या महादेवाच्या पींड तयार करुन बेलाची पाने व फुले वाहतात. या दिवशी भावीक महिला उपवास धरतात. या उपवासासाठी फक्त म्हसीच्या दुधाचाच चहा महिला घेतात व हा उपवास मध्यरात्री सोडतात.
ऋषीपंचमीच्या दिवशी संवत्सर येथे प. पू. रामदासी महाराज यांच्या प्रेरणेणे स्व. नामदेवराव परजणे आण्णा यांनी दरवर्षी किर्तनाचा कार्यक्रम व्हावा म्हणून त्यादृष्टीने आयोजन केलेले होते. ती परंपरा आजतागायत चालू आहे. ह. भ. प. मिराबाई मिरीकर यांनी दरवर्षी संवत्सरला येवून किर्तन करण्याचे वचन दिलेले आहे. त्यानुसार श्री शनी मंदिराच्या प्रांगणात दरवर्षी किर्तनाचा कार्यक्रम होत असतो. यावेळी महिला वर्ग व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यंदा गोदावरी नदीला पाणी असल्याने स्नानासाठी महिलांची मोठी गर्दी होणार आहे. स्नानानंतर महिला व भावीक ह. भ. प. मिराबाई मिरीकर यांच्या किर्तनाचा लाभ घेतात. या दिवशी संवत्सरला पंढरपूरचे स्वरुप प्राप्त होते.