जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

जिवाभावाची नाती जपता आली पाहिजे-आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

संवत्सर-(प्रतिनिधी)

   डोळ्यात प्रेम आणि हृदयात वात्सल्य असल्याशिवाय माणूस म्हणून आपल्याला जगता येणार नाही, जगण्यासाठी आज पैसा महत्वाचा असला तरी,जिवाभावाची नाती जपता आली नाही तर तुमच्या जगण्याला अर्थच उरत नाही म्हणून आधी नाती जपायला शिका असे उद्‌गार प्रसिध्द व्याख्याते प्रा.गणेश शिंदे यांनी संवत्सर येथील कार्यक्रमात काढले आहे.

 

“जगणे सुंदर होण्यासाठी भगवान महावीरांच्या तत्वज्ञानाचा अंगिकार करणे गरजेचे आहे.मानवी जीवनात सुख ही संकल्पना भौतिक गोष्टींशी संबंधित नसून आत्मिक समाधानाशी संबंधित आहे”-प्रा.गणेश शिंदे.

  गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील यांच्या २० व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त संवत्सर येथे आयोजित प्रवचनातून ‘ जीवन सुंदर आहे..’ या विषयावरील व्याख्यानातून प्रा.गणेश शिंदे बोलत होते.


   सदर प्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यासाठी अ.नगर येथील स्थानिक निधी विभागाचे सहाय्यक संचालक बाबासाहेब घोरपडे,माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील,पद्माकांत कुदळे,कैलासचंद ठोळे, उमाताई वहाडणे,अर्जुन काळे,चांगदेव कातकडे यांची उपस्थिती होती.प्रारंभी स्व.नामदेवराव परजणे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर गोदावरी खोरे सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

आपले जीवन सुंदर व्हावे यासाठीचा दुसरा असा कोणताही फॉर्म्युला नसतो.आपल्या सभोवतालच्या लहान सहान गोष्टींमध्ये आनंद शोधला तर जीवन आपोआपच सुंदर बनते असे सांगून प्रा.शिंदे पुढे म्हणाले,जगणे सुंदर होण्यासाठी भगवान महावीरांच्या तत्वज्ञानाचा अंगिकार करणे गरजेचे आहे.मानवी जीवनात सुख ही संकल्पना भौतिक गोष्टींशी संबंधित नसून आत्मिक समाधानाशी संबंधित आहे. काल आपल्याकडे पैसा,संपत्ती नव्हती,पण जगण्यात खूप आनंद भरलेला होता. आज आपल्याकडे विविध भौतिक सुखे आहेत,पैसा,संपत्ती आहे परंतु आपल्यातला आनंद मात्र आपण पार गमावून बसलो आहोत. दुसऱ्याला झालेल्या दुःखात आनंद व्यक्त करणे किंवा दुसऱ्याच्या आनंदामुळे आपण दुःखी होणे या प्रवृत्तीमुळे माणूस नेहमीच स्वतःजवळचा आनंद गमावून बसला आहे. खरे तर माणसाचे जीवनच मुळी सुंदर आहे.पण आपल्याच चुकीच्या वागण्यामुळे आपण त्याला कुरुप का बनवितो ? हा खरा प्रश्न आहे.शंभर वर्षे स्वतःसाठी जगण्यात काहीच अर्थ नाही.दुसऱ्यांसाठी जगता आले तर ते क्षणभंगूर आयुष्यही सार्थकी लागते.

   माणूस कसा जगला आणि समाजासाठी त्याने काय योगदान दिले यावर त्याच्या जीवनाची सुंदरता ठरते.सुख-दुःख,जय-पराजय, संघर्ष,समस्या,अडचणी या सगळ्या गोष्टी मानवी जीवनाशी निगडीत आहेत.म्हणूनच जीवनाला अर्थ आहे.आपल्याला आपल्या जीवनाची दिशा एकदा निश्चित स्पष्ट करावी लागेल.एकदा ती स्पष्ट झाली की,मग जगण्याचा अर्थ आपल्याला कळेल असे सांगून प्रा. शिंदे यांनी आनंद ही आपल्या अंतर्मनातील प्रसन्न अवस्था आहे. आनंद, सुख आपल्या अंतर्मनातच आहे. एकदा आपण आपल्याच अंतर्मनात डोकावून पाहिले की,त्यात आनंद दिसेल.त्यासाठी आपल्यातला मीपणा आणि अहंकार सोडावा लागेल.कारण दुःखाचे मूळ कारण अहंकारातच असते. अहंकाराला जिथून सुरुवात होते तिथूनच मग दुःखाला सुरुवात होते.अहंकाराला दूर करण्यासाठी आपल्याला आधी आपले मन स्थिर करावे लागेल.वृध्दांना अन्नाइतकीच संवादाची भूक असते. जोपर्यंत व्यक्ती जीवंत आहे. तोपर्यंच तुमचा स्पर्श, तुमचे प्रेम त्याला कळेल. मृत्युपश्चात औपचारिक गोष्टींना काहीच महत्व नसते. ज्यावेळी तुम्हाला नात्यातील गोडवा कळेल, तेव्हा जीवन किती सुंदर आहे हे तुमच्या लक्षात येईल असेही ते म्हणाले.

   यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनीही आपल्या भाषणातून संवत्सर व कोपरगांव परिसरात स्व. आण्णांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या शैक्षणिक कार्याची माहिती दिली.


   यावेळी संवत्सर व महिला औमहाविद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना नामदेवराव परजणे शिष्यवृत्तीचे धनादेश वितरीत करण्यात आले. बाळासाहेब सहाणे टेलर यांच्यातर्फे जनता हायस्कूलच्या गरजू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले.


सदर कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर,गोदावरी दूध संघाचे संचालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संवत्सर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेक परजणे यांनी आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close