कोपरगाव तालुका
चार वर्षात मतदार संघ विकासाच्या वाटेवर…,गुणवत्तेवर मात्र चुप्पी !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
विकासाच्या बाबतीत मागे पडलेल्या कोपरगाव मतदार संघातील जनतेला विकासाचे स्वप्न दाखविले.हे स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करून मागील चार वर्षात मतदार संघाला विकासाच्या वाटेवर घेवून येण्यात आ.आशुतोष काळे यशस्वी झाले असल्याचा दावा महात्मा गांधी जिल्हा चॅरीटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा यांनीं नुकताच केला असला तरी मात्र तालुक्यातील विकास कामांच्या गुणवत्तेवर मात्र सोयीस्कर चुप्पी साधली असल्याचे आढळून आले आहे.त्यामुळे तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
धरमचंद बागरेचा यांनी कोपरगाव मतदार संघाच्या चार वर्षाच्या विकासाच्या बाबतीत वार्तालाप करतांना ते म्हणाले, २०१९ पूर्वी रस्ते,पाणी, वीज अशा विकासाच्या प्रमुख समस्या असलेला मतदार संघ म्हणून कोपरगाव मतदार संघाकडे पाहिले जात होते.त्यामुळे मतदार संघातील जनता त्रासलेली होती.मतदार संघाच्या चोहोबाजूचे सर्व प्रमुख राज्यमार्ग व जिल्हामार्ग अत्यंत खराब झाले होते.कोपरगाव शहरासह मतदार संघातील अनेक गावागावात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती.कोपरगाव शहराची बाजारपेठ ओस पडली होती.ज्या विश्वासाने २०१४ ला ज्या लोकप्रतिनिधींना मतदार संघातील मतदारांनी निवडून दिले त्या लोकप्रतिनिधींकडून मतदारांचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला होता.अशा परिस्थितीत एक संधी द्या,कोपरगाव मतदार संघाचा विकास करून दाखवितो असा विश्वास मतदार संघातील जनतेला आ.काळे यांनी दिला होता.त्या विश्वासाला मतदार संघातील जनतेने सकारात्मक प्रतिसाद देवून आ. आशुतोष काळे यांच्या हाती मतदार संघाच्या विकासाची सूत्रे सोपविली होती.
काळे परिवाराचा समाजकारणाचा वारसा पुढे सुरु ठेवतांना माजी आ.अशोक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघातील जनतेच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी घेत त्यांनी निवडून आल्यापासून मतदार संघाच्या विकासासाठी प्रयत्न सुरु केला.पहिल्या तीन महिन्यातच ज्या कोपरगावच्या पाणी प्रश्नावर विरोधक आपली पोळी भाजीत होते तो प्रश्न चुटकीसरशी सोडवून ५ नंबर साठवण तलावाच्या खोदाई कामाला प्रारंभ केला.कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कधीच सुटू नये अशी स्वप्न पाहणाऱ्यांनी आपली राजकीय ताकद वापरून २०१४ ते २०१९ मध्ये हा प्रश्न सुटू दिला नाही.सत्ताधारी पक्षाचा विरोध मोडून काढण्यासाठी आ. आशुतोष काळे यांना मोठा संघर्ष करावा लागला होता.५ नंबर साठवण तलावाचे काम सुरु झाल्यानंतर देखील विरोधकांनी आपला छुपा विरोध सुरूच ठेवला होता.मात्र या विरोधाला न जुमानता आ.काळे ५ नंबर साठवण तलावाच्या कामावर जातीने लक्ष ठेवून १३१.२४ कोटी निधीतून हे काम पूर्णत्वाकडे घेवून जात आहे.सध्या ५ नंबर साठवण तलावाचे काम युद्धपातळीवर सुरु असून पुढील वर्षी हे काम पूर्ण होवून नागरिकांना नियमित स्वच्छ पाणी पुरवठा होणार आहे हे आ.काळे यांनी कोपरगावकरांशी साधलेल्या संवादात स्पष्ट केले आहे.त्याच बरोबर कोपरगाव शहराच्या विकासासाठी देखील कोट्यावधी रुपयांचा निधी दिल्यामुळे शहराचे सुशोभीकरण करून कोपरगाव शहरातील रस्त्यांचा विकास झाला आहे.
कोपरगाव मतदार संघातून जाणारे एम.डी.आर.८४,एम.डी.आर.८५,एम.डी.आर.९८,एम.डी.आर.९९,एम.डी.आर. ०८,एम.डी.आर.०४,रा.मा. ६५,रा.मा. ७, रा.मा., ३६, रा.मा. ३५ तसेच नव्याने निर्मिती झालेल एन.एच.७५२ जी,एन. एच.१६० या राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असणाऱ्या राज्य मार्गाची मोठी दुरावस्था झाली होती.गावांतर्गत रस्त्याची परिस्थिती तर विचारलायच नको अशी अवस्था मतदार संघातील रस्त्याची होती.त्यामुळे दळणवळण खुंटले होते व विकास थांबला होता.हि परिस्थिती बदलविण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा आमदार होण्याच्या मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करून यातील बहुतांशी रस्त्यांना निधी देवून या रस्त्यांचा विकास साधला आहे.त्याचबरोबर गावांतर्गत रस्त्यांसाठी निधी देवून वाड्या वस्त्यांवरील रस्त्यांचा देखील विकास झाला आहे. त्यामुळे निश्चितपणे मतदार संघाच्या विकासाला चालना मिळाली आहे.
एका बाजूला मतदार संघाचा विकास त्याबरोबरच समाजातील होतकरू गरजू व बचत गटातील महिलांना प्रियदर्शनी महिला मंडळाच्या माध्यमातून विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देवून महिला भगिनींनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी दरवर्षी गोदाकाठ महोत्सवाचे आयोजन करून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.
तालुक्यातील विरोधकांचा कार्यकाळ संपला तरी त्यांना विकासाच्या योजना समजल्या नाही त्या योजनेतून आ.काळे यांनी मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मिळेल त्या योजनेतून निधी आणला आहे.त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे.त्यांच्या या प्रयत्नवादी भूमिकेमुळे मतदार संघातील प्रत्येक गावात पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु असून अनेक योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत.त्यामुळे महिलांच्या डोक्यावरचा हंडा कायमचा उतरविण्यात त्यांना यश आले असल्याचा दावा केला आहे.
मतदार संघातील काकडी विमानतळाचा विकास,कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या शासकीय इमारती,तीर्क्षक्षेत्र विकास,विजेचे प्रश्न,आरोग्याचे प्रश्न सोडवून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई,पिक विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळवून देवून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील गरजू पात्र लाभार्थ्यांना मिळवून दिला आहे.मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला वारी येथील गोदावरी नदीवरील पूल व वारी-कान्हेगाव पाणी पुरवठा योजना अशा एक ना अनेक कामांना निधी देवून मतदार संघाचा मागील चार वर्षात सर्वांगीण विकास साधला असला तरी विकास थांबला नाही.त्यामुळे अजूनही हजारो कोटींच्या विकास कामांचे प्रस्ताव शासन दरबारी मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत.त्या प्रस्तावांना मंजुरी मिळून मतदार संघाचा उर्वरित विकास साधण्याचा त्यांचा मानस असून चार वर्षात २,३०० कोटी निधी आणणारे आ.काळे कोपरगावच्या इतिहासात एकमेव आमदार ठरले असून त्यांच्या कामाची पद्धत व निधी मिळविण्याचा त्यांचा सपाटा पाहता हा ३३०० कोटीच्या पुढे जाईल असे म्हटले आहे.
मागील चार वर्षात विकासापासून दूर गेलेल्या कोपरगाव मतदार संघाला आपल्या प्रयत्नातून पुन्हा विकासाच्या वाटेवर आणण्यात ते यशस्वी झाले आहे.हा विकास साधतांना विरोधकांचा विरोध तर होताच परंतु ज्या वैश्विक महामारीपुढे संपूर्ण विश्व हतबल झाले होते.त्या महामारीचा मुकाबला करून मतदार संघातील जनतेच्या आरोग्य अबाधित राहावे यासाठी मोफत कोविड केअर सेंटर सुरु करून हा विकास साधला आहे हे विशेष.
विरोधकांकडे विकासाची दृष्टी नसल्यामुळे त्यांच्या डोळ्यात हा विकास नक्कीच खुपणारा आहे मात्र या विकासाने मतदार संघातील जनता सुखावली असल्याचा दावा करून चार वर्षाच्या कामाची पावती असल्याचे महात्मा गांधी जिल्हा चॅरीटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा यांनी म्हटले आहे.मात्र रस्त्याचे काम सुरु होऊन अवघ्या आठवड्यात वाट लागणाऱ्या झगडे फाटा-वडगाव फाटा या नादुरुस्त रस्त्यावर मात्र बागरेचा यांनी सोयीस्कर चुप्पी साधली असल्याचे आढळून आले आहे.त्यामुळे कामाच्या हीन दर्जाबाबत तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.