नगर जिल्हा
गंगागिरी महाराज महाविद्यालय ,सल्लागार समितीचे अधिकार गोठवले! सह्यांचे अधिकार व्हा.चेअरमन यांना ?
संपादक -नानासाहेब जवरे कोपरगाव(प्रतिनिधी)
उत्तर नगर जिल्ह्यात रयत शिक्षण संस्थेच्या अत्यंत नावाजलेल्या श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे अधिकार महाविद्यालयातील बेबंदशाहीमुळे गोठवले गेले असून त्या जागेवर व्यवहार पाहण्यासाठी रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे यांची राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी नेमणूक केली असल्याचे विश्वसनीय वृत्त हाती आल्याने उत्तर नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचे कार्य हाती घेतले पाहिजे.असा विचार मनात आणून अविद्या आणि अज्ञान हे सर्व दुःखाचे मूळ आहे.खेड्यापाड्यातील बहुजन समाजाची आणि दिनदलितांची मुले सुविद्य झाल्याशिवाय समाजपरिवर्तन होणार नाही.हा विचार शिरोधार्य मानून विजयादशमीच्या दिवशी ४ ऑक्टोबर १९१९ या दिवशी रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. आज आशिया खंडात या संस्थेच्या सर्वाधिक शाखा आहेत.व त्यात हजारो मुले उच्च शिक्षण घेत आहेत.मात्र त्याला आता कोपरगाव तालुका अपवाद मानण्याची वेळ आली असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून कारण या संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयातील शिक्षणाचा दर्जा सुमार झाला असून त्या मागील के.जे.एस.महाविद्यालयाने या बाबतीत बाजी मारल्याचे दिसून येत आहे.गंगागिरी महाविद्यालयात जर प्रवेश मिळाला नाही तर त्या नंतर के.जे.एस.चा विचार विद्यार्थी व पालक करत पण आता बाब नेमकी उलटी झाली असून शिक्षणाचा स्तर जोमाने घसरला आहे.त्याला कारण या संस्थेला कधी काळी आधार देणाऱ्या नेत्यांनीच आता स्वतःच्या उच्च शिक्षणाच्या संस्था व त्यांच्या अनेक शाखा काढल्या असून या महाविद्यालयातील विद्यार्थी पळविण्याची स्पर्धा सुरू केली आहे.शिवाय तेथे आपले बगलबच्चे प्राध्यापक,व प्राध्यापकेतर कर्मचारी नेमणूक करून या संस्थेचे अहित पाहण्याची स्पर्धा सध्या लागली आहे.या महाविद्यालयाचे प्राचार्य श्री सांगळे हे गेल्यानंतर या महाविद्यालयाची पार रया गेली असून प्राध्यापक पगार घेणारे केवळ मजूर बनले आहेत.या महाविद्यालयात गेले अनेक वर्षे नवीन प्रकल्प राबविण्यात आलेला नाही.नवीन कोर्स सुरु करण्यात आलेले नाही.वसतिगृहात मेससाठी कोणत्या कार्यकर्त्यांची निविदा मंजूर करावयाची इथपर्यंत नेत्यांचा हस्तक्षेप वाढला आहे.सहकारी कारखान्याचे अनेक संचालक तर थेट प्राध्यापक व प्राचार्यांना दम देण्यापर्यंत मजल गेल्याचे वारंवार दिसून आले आहे.या मागे अर्थातच येथील प्रस्थापितांची दंडेलगिरी हे कारण असून पहिल्या फळीतील त्यागी नेत्यांची फळी आता अस्तंगत झाली असून दुसरी व तिसरी फळी आता या संस्थाचे कुठलेही पावित्र्य जपत नसल्याचे दिसून आले आहे.येथे स्थानिक सल्लागार समितीत काम पाहण्यासाठी सहा लोकांची नेमणूक करण्यात आलेली असून त्यात दोन-दोन येथील प्रस्थापित नेत्यांच्या घरातीलच सदस्य असून एकेक त्यांचा समर्थक त्यांनी घेतलेला आहे.वास्तविक रयत शिक्षण संस्थेच्या शिर्षस्थ पदे भूषविणारांनी स्थानिक सल्लागार पदावर डोळा ठेवावा या इतकी वाईट गोष्ट नाही पण येथेही हि मंडळी राजरोस हात मारायला विसरत नाही.येथे दूसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी मिळणे पार दुरापास्त झाले आहे.
वरच्या पातळीवरील निर्णय आपल्याला माहिती नाही-प्राचार्य थोपटे
दरम्यान या बाबत आमच्या प्रतिनिधीने या बाबत संबंधित महाविद्यालयाच्या प्रचार्यांशी भ्रमणध्वनिवरून संपर्क साधला असता त्यांनी या बाबतीत आपल्याला कल्पना नाही व वरिष्ठ पातळीवर काही निर्णय असेल तर तो अद्याप आपल्यापर्यंत आलेला नाही म्हणून स्वतःची बोटे सोडवून घेतली आहे.
त्यावेळी माजी.खा.शंकरराव काळे यांचे सारखे त्यागी नेते होते तो पर्यंत हा हस्तक्षेप करण्याची कोणाची हिम्मत नव्हती .त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांना स्वतःच्या हयातीत स्वतःची शिक्षण संस्था न काढण्याचा दिलेला शब्द जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत पाळला.मात्र आता या संस्था म्हणजे सोन्याचे अंडी देणारी कोंबडी या दृष्टीने त्याकडे पहिले जात असल्याने या नावाजलेल्या संस्थेची वर्तमानात वाट लागली आहे.येथील विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयात पळविण्याचे कारस्थान राबवले जात आहे.प्राचार्य पद रिक्त कसे राहील यासाठी जास्तीचे लक्ष पुरविले जात आहे.
गंगागिरी महाविद्यालयात आता नवीन पदाधिकारी नेमणार !
दरम्यान ताज्या माहिती नुसार वरिष्ठ नेते या महाविद्यालयात नवीन सल्लागार मंडळ नेमणार असून त्यासाठी अर्ज मागवले असल्याची माहिती आहे.प्रस्थापित नेते आता आपली बोटे पोळल्याने आता दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची वर्णी लावतात की घरातील दोन-दोन सदस्य नेमून आपलीच पोळी पुन्हा भाजून घेतात हे लवकरच कळणार आहे.
एखाद्या प्राचार्यांची नेमणूक झालीच व ते आपल्या ताटाखालचे मांजर बनत नसेल तर त्यांची लागलीच उचलबांगडी केली जात आहे.या सर्व भानगडी थोरल्या पाती असलेल्या शरद पवारांच्या लक्षात आल्याने व कोपरगावातील एकही राजकीय समर्थक नेता विश्वासपात्र न राहिल्याने दोन्ही पवारांचे पित्त खवळले आहे व त्यांनी गत महिन्यात नगर दौऱ्यात नगर येथील उत्तर विभागाचे कार्यालयाचे सभागृहात या महाविद्यालयाच्या तक्रारींचा पाढाच वाचला व तातडीने कोपरगावातील महाविद्यालय व तालुक्यातील अन्य शिक्षण संस्था यांचे जवळपास पासष्ठ प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांची तातडीने बदली करून टाकली त्या बातम्या आमच्या प्रतिनिधीने या पूर्वीच छापल्या आहेत.व स्थानिक सल्लागार समितीचे पदाधिकारी व सदस्य यांचे अधिकारच गोठवले आहेत.व या महाविद्यालयाची जबाबदारी सिन्नर तालुक्यातील व्हाईस चेअरमन या पदावर कार्यरत असलेल्या भगीरथ शिंदे यांचेकडे सोपवलेली आहे.या समितीचा पाच वर्षांचा कालखंड असताना त्यांचा केवळ दीड वर्षाचाच कालखंड संपलेला असताना हि आफत आली असून दोन निमंत्रित सदस्यांचाही हिरमोड झाला असल्याचे विश्वसनीय वृत्त हाती आले आहे.
भगीरथ शिंदे यांनी घेतला नाही अद्याप कार्यभार.
दरम्यान या बाबतची अधिकची माहिती घेतली असता भगीरथ शिंदे यांची या कामकाजासाठी नेमणूक झाली असली तरी त्यांनी कोपरगावच्या बड्या नेत्यांच्या कळपात येऊन डरकाळी फोडण्याचे धाडस अद्याप दाखवलेले नाही हे विशेष!