दळणवळण
कोपरगावात राष्ट्रीय महामार्गावर अभियांत्रिकीची कमाल !

न्यूजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव विधानसभा मतदार संघातुन जात असलेल्या जुन्या अ.नगर-मनमाड राज्यमार्ग सावळीविहिर पासून तोडण्यात आलेला सावळीविहीर फाटा,कोपरगाव ते मनमाड एन.एच.७५२ जी या मार्गाला एन.एच.७५२ जी क्रमांक देण्यात येऊन १९१ कोटीची तरतूद करून सदर साडेनऊ कि.मी.चा रस्ता केवळ दिड वर्षात पूर्ण करणे आवश्यक असताना त्याची मुदत संपून आता दिड वर्षे उलटले आहे.तरीही याची साडेसाती संपण्याचे नाव घेत नाही.उलट या मार्गावरील बेट कोपरगाव येथील पुलाचे काम सदोष होत असताना त्याकडे केंद्रीय रस्ते विकास मंत्रालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी बघ्याची भूमिका घेत असून भविष्यात जर अपघात झाले तर याला जबाबदार कोण ? असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.

“राहाता तालुक्यातील सावळीविहीर ते कोपरगाव हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 जी असून त्यासाठी सरकारने १९१ कोटींची आर्थिक तरतूद केली असून 9.5 कि.मी.हा राष्ट्रीय महामार्ग सदोष असून त्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करून दोष निश्चिती करण्याची गरज आहे.यात अतिरिक्त खर्च झाला आहे. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई करावी”- संजय काळे,सामाजिक कार्यकर्ते,कोपरगाव.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव विधानसभा मतदार संघातुन जात असलेल्या जुन्या अहिल्यानगर-मनमाड राज्यमार्ग सावळीविहिर पासून तोडण्यात येवून सावळीविहीर फाटा,कोपरगाव ते मनमाड या मार्गाला डिसेंबर 2022 मध्ये एन.एच.७५२ जी क्रमांक देण्यात आला होता.आ.आशुतोष काळे यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेत ढोल बडवून सदर रस्ता दिड वर्षात पूर्ण होणार असल्याची राणाभिमदेवी घोषणा करण्यात आली होती.१९१ कोटींच्या आणि 9.5 कि.मी.च्या राष्ट्रीय महामार्गाच्या सावळीविहीर ते कोपरगाव पर्यंतच्या रस्त्याच्या कामास तातडीने सुरुवात करावी असे निर्देश त्यांनी दिले होते.दरम्यान यात लुंबिनी विहार ते साईबाबा चौफुलीवर काम करण्यास निधी उपलब्ध नसल्याने संजय काळे आणि नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती.त्यानंतर या उर्वरित रस्त्यासाठी एस.एस.जी.एम.पर्यंत १ किलोमीटर रस्ता डांबरीकरण करण्यात येणार असल्याची स्वतंत्र घोषणा केली होती व त्यासाठी २.८६ कोटी खर्चाची वेगळी तरतूद केली होती.तर उर्वरित सावळीविहिर ते कोपरगाव या महामार्गाच्या एकूण ९.५ कि.मी.रस्त्यासाठी एकूण १९१ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता.वास्तविक आज तीन वर्षांनी काय चित्र आहे.तर हा रस्ता केवळ काँक्रीटीकरण पुणतांबा फाट्यापर्यंत 18 मिटर रुंदीचा कसाबसा पूर्ण झाला आहे.यात दोन्ही बाजूंनी साडेतीन मीटर साईट पट्टीचा (त्या तशा केल्या आहे का हा संशोधनाचा विषय आहे) समावेश आहे.अद्याप साईड गटारी अपूर्ण दिसत आहे.पुढे देवी मंदिर ते गोदावरी पूल (कोपरगाव बेट पूल वगळता) उर्वरित काम पूर्ण झाले असले तरी मुख्य म्हणजे सावळीविहिर,(हे काम यात समाविष्ट नाही),पुणतांबा फाटा,कोपरगाव बेट येथील भुयारी मार्ग अद्याप पूर्ण होण्याचे नाव घेताना दिसून येत नाही.त्यातले त्यात सावळीविहीर येथील पुलाचा संलग्न भराव चक्क काळ्या मातीने भरला होता.परिणामी वरील भागाच्या डांबरी करणाला मोठमोठे तडे गेले होते.त्याबाबत ‘न्युजसेवा ‘ वेब पोर्टलने स्वतंत्र वृत्त प्रसिद्ध करून त्याला वाचा फोडली होती.त्यानंतर संपूर्ण भराव संबंधित ठेकेदाराला उचलून फेकून द्यावा लागला होता.अद्यापही ते काम सुरू आहे.

दरम्यान खरा कहर पुढेच आहे.या एस.ए.यादव या कन्स्ट्रक्शन कंपनीने खरी अभियांत्रिकीची लीला कोपरगाव बेट येथील उड्डाण पुलाबाबत केली आहे.या पुलाचे पश्चिम बाजूकडील काम गतवर्षी केले होते.मात्र पूर्व बाजूकडील काम मात्र अपूर्ण होते.ते दोन तीन महिन्यापूर्वी करण्यास सुरुवात केली होती.मात्र ही काम सुरू असताना त्यांना एक चूक ध्यानात आली असून त्यात पश्चिमेच्या अर्ध्या हिस्यांच्या पुलाचा भाग थेट वळणावर असल्याने त्या ठिकाणी त्यांना वळण गृहीत धरून त्याठिकाणी पश्चिमेकडून पूर्वेस साधारण सहा ते नऊ इंचाचा उतार देणे अपेक्षित होते.मात्र ही बाब साईट अभियंत्यांच्या लक्षात आली असल्याचे दिसले नाही.परिणामी त्यांनी सरळ मार्गावर असावा असा दोन्ही बाजूंना उतार असावा असा पूल तयार केला होता.मात्र सदर पूल हा वळणावर असल्यावर दोन्ही बाजूंना उतार दिला तर वाहने पश्चिम बाजूस पलटी होण्याची शक्यता वाढत आहे.ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी आपली चूक दुरुस्त करण्यासाठी पश्चिम बाजूच्या पुलाच्या अर्ध्या हिस्यावर पुन्हा एक डबल मजला चढवला असल्याचे दिसून येत आहे.मात्र त्यात लोखंडी स्ट्रक्चरल मात्र सामविष्ट केले असल्याचे दिसून येत नाही.परिणामी या पुलावर अपघात होण्याची शक्यता वाढली असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे या डबल मजली पुलाच्या अभियांत्रिकीची कमाल वर्तमानात चर्चेच्या अग्रस्थानी आली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुका आणि शहरात या चमत्कारिक पुलाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.आता तालुक्यात टाचणी पडली तरी ती आपल्यामुळे पडली अशी श्रयेवादाची लढाई करणारे दोन आमदार नेते आता या चुकीचे काम करणाऱ्या पुलाची जबाबदारी घेणार का ? असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात याबाबत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.



