उद्योग विभाग
‘गाव तेथे उद्योजक’ अभियानातून उद्योगक्रांती घडवू- आश्वासन

न्यूजसेवा
कोपरगांव -(प्रतिनिधी)
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘गाव तेथे उद्योजक’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमातून ग्रामीण भागात नवउद्योजक घडविण्याचे मोठे अभियान सुरू करण्यात येणार असून या अभियानातून ग्रामीण भागातील वंचित,दुर्बल आणि होतकरू युवकांना उद्योगाची दिशा व उद्योजकतेची नवी संधी मिळेल,असा विश्वास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र मानगावे यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला आहे.

“राज्यात असा कोणताही जिल्हा नाही,जिथे ओमप्रकाश कोयटे यांना ओळखणारे लोक नाहीत.सहकार क्षेत्रातील त्यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे.गेल्या ५० वर्षांपासून त्यांनी व्यापाऱ्यांसाठी केलेले कार्य उल्लेखनीय असून,महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी कोयटे यांच्या एकमेव नावाची मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करण्यात येणार आहे”-रवींद्र माणगावे,अध्यक्ष,महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स.
कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि कोपरगाव किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेक इन कोपरगाव’ आणि ‘गाव तेथे उद्योजक’ या उपक्रमाची मुहूर्तमेढ आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन.’ओमकारा बिल्स’ हॉटेल येथे करण्यात आले होते.त्या वेळी ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे होते.

सदर प्रसंगी कार्यक्रमात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सुनील अग्रवाल,पराग अग्रवाल,दिपाली चांडक,पुरुषोत्तम झंवर (श्रीरामपूर),प्रशांत लद्दा (बेलापूर),श्रीनिवास भंडारी (संगमनेर),प्रकाशशेठ पारख (राहुरी),अजित कुंकूलोळ व संजय शिंगवी (कोल्हार) यांच्यासह श्रीरामपूर,कोल्हार,बेलापूर,राहुरी,संगमनेर,मनमाड,येवला आणि अहिल्यानगर व्यापारी महासंघाचे पदाधिकारी यांच्यासह व्यापारी महासंघाचे अजित लोहाडे,तुलसीदास खुबानी,राजश्री गुजराती,किरण डागा,किरण दगडे यांच्यासह व्यापारी महासंघ,किराणा मर्चंट असोसिएशन आणि महिला आघाडीचे पदाधिकारी,सदस्य व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोयटे यांनी समता नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना करून व्यापाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून दिले.समता पतसंस्था ही व्यापाऱ्यांची संस्था असल्याचे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे.कोपरगावातील व्यापारी हा केवळ किरकोळ विक्रेता नसून सहकाराच्या बळावर उभा राहिलेला व्यापारी आहे.बदलत्या काळानुसार व्यापाऱ्यांनी स्वतःला अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.स्पर्धेच्या युगात कल्पकता,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नवीन उद्योग उभारण्याची तयारी हीच यशाची गुरुकिल्ली आहे.’मेक इन कोपरगाव’ आणि ‘गाव तेथे उद्योजक’ हे उपक्रम केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता संपूर्ण देशभर राबविले गेले पाहिजेत.ज्या प्रकारे देशात हरित क्रांती,धवल क्रांती आणि शिक्षण क्रांती झाली,त्याचप्रमाणे आता व्यापारी क्रांती घडविण्याची वेळ आली आहे.यासाठी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि किराणा मर्चंट असोसिएशनच्या सहकार्याने शिर्डी येथे लवकरच आंतरराष्ट्रीय व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून,व्यापारी क्रांतीची सुरुवात महाराष्ट्रातून होईल,अशी घोषणाही त्यांनी शेवटी केली आहे.
दरम्यान यावेळी ओमप्रकाश कोयटे म्हणाले की,”व्यापारी महासंघाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत.व्यापाऱ्यांवर येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी महासंघ नेहमीच पुढाकार घेत असून सामाजिक कार्यातही संघटना अग्रेसर आहे.’मेक इन कोपरगाव’ या उपक्रमातून अनेक नवउद्योजक घडले असून आता ‘गाव तेथे उद्योजक’ हा उपक्रम ग्रामीण भागातील प्रत्येक युवकापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार करण्यात आला आहे.छोट्या उद्योगांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासाला गती देता येईल.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान १ हजार उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.
यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे बोर्ड चेअरमन आशिष पेडणेकर यांनी सुधीर डागा यांनी मांडलेली ‘वन नेशन,वन वेट,वन रेट’ ही संकल्पना स्तुत्य असल्याचे सांगत,ती प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी संबंधित केंद्रीय मंत्र्यांसोबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली.याचवेळी त्यांनी सुधीर डागा यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या रिटेलर विंगच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे.शिर्डी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आशिष पेडणेकर यांनी दिली आहे यावेळी त्यांनी,”मेळाव्यात ५०० ते ७०० लघु व मोठ्या मशिनरींचे प्रात्यक्षिक सादर केले जाणार असून उत्पादन,पॅकेजिंग आणि मार्केटिंग या विषयांवर व्यापारी व उद्योजकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे.या मेळाव्यास जगभरातील १० ते १२ देशांतील व्यापारी आणि उद्योजक सहभागी होणार असून,त्यांच्या माध्यमातून भारतीय उत्पादने जागतिक बाजारपेठेत कशी पोहोचविता येतील,निर्यातीच्या नवीन संधी कशा निर्माण होतील आणि परदेशी गुंतवणुकीच्या माध्यमातून भारतातील उद्योगवृद्धीला कशी चालना देता येईल,यावर सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी केले आहे तर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स उपाध्यक्ष कैलास अग्रवाल,आणि माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रदीप साखरे यांनी केले,तर सुमित भट्टड यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.
“राज्यात असा कोणताही जिल्हा नाही,जिथे ओमप्रकाश कोयटे यांना ओळखणारे लोक नाहीत.सहकार क्षेत्रातील त्यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे.गेल्या ५० वर्षांपासून त्यांनी व्यापाऱ्यांसाठी केलेले कार्य उल्लेखनीय असून,महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी कोयटे यांच्या एकमेव नावाची मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करण्यात येणार आहे”- रवींद्र माणगावे,अध्यक्ष,महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स.