धार्मिक
आषाढी एकादशी निमित्त वारी सोहळ्यात हिंदु मुस्लिम एकतेचे दर्शन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे याहीर्षी आषाढी एकादशी निमित्त संस्थेच्या सचिव चैताली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी काढण्यात आली असून या दिंडीत हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन पहायला मिळाले आहे.
या वारीचा उद्देश आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहचून विठ्ठलाचे दर्शन घेणे हा असतो.त्यातील बहुतेकांच्या खांद्यावर पताका,ध्वज असतो.कपाळास टिळा,गळ्यात तुळशीची माळ व मुखाने हरिनाम म्हणत वारीतील वारकरी दिंडीतील वारकरी त्यात सामील होतो.पंढरीची वारी ही ईश्वरी प्रेमाची एक विलक्षण अनुभूती आहे.
सालाबाद प्रमाणे याहीवर्षी गौतम पब्लिक स्कूलमध्ये आषाढी वारीचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व प्राचार्य नूर शेख यांच्या हस्ते पाना फुलांनी सजविलेल्या पालखीचे विधिवत पूजन करण्यात येवून विठ्ठल रखुमाई आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांची वारी मार्गस्थ झाली.
यावेळी प्राचार्य नुर शेख यांच्यासह मुस्लिम शिक्षकांनी पालखी खांद्यावर घेवून वारीचा आनंद घेत हिंदू-मुस्लिम एकतेचे अनोखे दर्शन घडविले.यावेळी विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या तालात हरिनामाच्या गजरात सर्व परिसर भक्तीमय होवून गेला होता.यावेळी आषाढी वारीत होणारा रिंगण सोहळ्याचा विद्यार्थ्यांनी याची देही,याची डोळा आनंद घेतला.
यावेळी प्राचार्य शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.ते म्हणाले,”आपल्या ऐतिहासिक,पौराणिक वारसा असलेल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा देशभर आदर केला जातो.दिंडी ही महाराष्ट्राच्या या संस्कृतीचाच एक अविभाज्य भाग आहे.गौतम पब्लिक स्कूल शैक्षणिक गुणवत्तेमध्ये अव्वल असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच आपल्या संस्कृतीचे अलोकिक महत्व समजावून सांगणे गरजेचे असून त्यामुळे समाजामध्ये सामाजिक एकोपा जपण्यास मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना अभ्यास व खेळा बरोबरच सुसंस्कार करण्यासाठी गौतम पब्लिक स्कूलमध्ये आयोजित केलेल्या या दिंडी सोहळ्याचे संस्थेचे अध्यक्ष अशोक काळे,विश्वस्त आ.आशुतोष काळे,उपाध्यक्ष छबुराव आव्हाड,सचिव चैताली काळे,सहसचिव स्नेहलता शिंदे,सर्व संस्था सदस्य,गांवकरी व पालकांनी कौतुक केले आहे.सदर दिंडी सोहळा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुधाकर निलक,रमेश पटारे,गोरक्षनाथ चव्हाण,राजू आढाव,नसीर पठाण,रेखा जाधव,पर्यवेक्षिका ज्योती शेलार,सुनीता कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले आहे.