कोपरगाव तालुका
समता बचत गटाच्या उद्योग मंदिरात उद्योग देवतेची प्राणप्रतिष्ठा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
‘देव-देवतांची मंदिरे उभारण्या बरोबर उद्योग मंदिरे उभारावी त्यामुळे उद्योग व्यवसायातून महिला आर्थिक संपन्नतेकडे वाटचाल करतील असे प्रतिपादन बारामती येथील प्रसिद्ध भीमथडी जत्रा संयोजिका सुनंदा पवार यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश कोयटे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या विझ किड्स स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली.शिर्डी येथील साई आश्रया अनाथ आश्रमातील मुलींचा रॅम्प वॉक शो चा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात मुलींनी परिधान केलेले ड्रेस हे समता महिला बचत गटाद्वारा शिवणकला उद्योगमार्फत तयार केलेले होते हे विशेष !
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन संचलित सहकारी उद्यमी व समता महिला बचत गट कोपरगाव आयोजित महिला बचत गट व गृह उद्योग उत्पादित उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे उद्देशाने समता नागरी सहकारी पतसंस्थेत महिला बचत गट व गृह उद्योगांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी उभारलेल्या उद्योग मंदिर प्रदर्शनाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले त्या वेळी त्या बोलत होत्या.
सदर प्रसंगी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,सहकार उद्यमी च्या अध्यक्षा अंजली पाटील,नाशिक येथील ‘विस्डम एक्स्ट्रा’च्या दिपाली चांडक,समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुहासिनी कोयटे,कोपरगावातील अहिंसा हातमाग केंद्राच्या शोभना ठोळे,संगीता परशुराम साळवे,सरिता सचिन बिरुटे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुहासिनीं कोयटे म्हणाल्या की,’कोयटे परिवार पहिल्यापासूनच व्यवसायात असून छोटे-मोठे व्यापारी,महिला बचत गट यांना व्यवसायात येणाऱ्या विविध समस्यांची जाणीव समता परिवाराचे मार्गदर्शक आणि राज्य फेडरेशनचे अध्यक्ष कोयटे यांना पहिल्यापासूनच आहे.त्याच अनुषंगाने महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री आणि त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांचा होता तो आज उद्योग मंदिर उद्घाटनाने पूर्ण झाला असून त्याची जबाबदारी आता आपल्या सर्व महिला बचत गटांची आहे. गेल्या दोन वर्षापासून समता महिला बचत गटाच्या माध्यमातून अगरबत्ती, कापूर, निरंजनी, समईच्या वाती तयार करणे असे छोटे-मोठे उद्योग समता बरोबरच इतर महिला बचत गटांच्या माध्यमातून सुरु केले असून त्यांच्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ राज्य फेडरेशन संचलित सहकार उद्यमी मिळवून देणार आहे.
सहकार उद्यमीच्या अध्यक्षा अंजली पाटील यांनी सहकार उद्यमीचा महिला बचत गटाविषयीचा उद्देश आणि महिला बचत गटांसाठी चालवण्यात आलेल्या चळवळीची वाटचाल मनोगतातून व्यक्त केली.तसेच सुहासिनी ओमप्रकाश कोयटे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व महिला बचत गटांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन करून केक सेलिब्रेशन करण्यात येऊन लायन्स क्लब परिवाराचे सुधीर डागा यांनी मानपत्र वाचन केले.
सुनंदाताई पवार यांच्या हस्ते कॉप शॉप वर्ल्ड पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्वाती कोयटे यांनी केले तर मार्गदर्शन राज्य फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे व समता महिला बचत गटाच्या कु.रेणुका मुन्शी यांनी केले तर उपस्थितांचे आभार ‘सहकार उद्यमी’च्या संचालिका भारती मुथ्था यांनी मानले.