जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावच्या पाण्याचे सार्वकालीक यशस्वी वगनाट्य….

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगावची नगरपालिका स्थापन होऊन कित्येक दशके लोटली आहेत. परंतू कोपरगावची वाढती लोकसंख्या आणि भविष्याचा वेध घेऊन पिण्याचे पाणी उचलण्याची अपेक्षित वाढीव क्षमता, हे समिकरण ना कोणी समजून घेतले, ना कधी ते सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न चालू ठेवले. उलट ती बाब संधी समजून निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर राजकीय हेत्वारोपासाठी सातत्याने वापरली आहे.वर्तमानात सत्ताधारी व विरोधक दुर्दैवाने याच पुंगीचा आधार घेऊन आपली दुकानदारी चालू पहात आहे.

तुमच्या दारात बारमाही प्रकल्पाचे पाणी असतांना तुम्ही जर दररोज पाणी देऊ शकत नसाल तर मग, निळवंडेवरुन वा आणखी कुठून आणून काय मोठा तीर मारणार आहात ? नुसती पाईपलाईनच काय अख्खे निळवंडे दारणा धरण जरी उचलून कोपरगावला आणून ठेवले तरी, कोपरगावकरांना दररोज पाणी मिळण्याची सुतराम शक्यता नाही.

अगदी अलिकडे सन २०२० मध्ये पावसाळ्यात गोदावरी डावा कालवा सलग ९० दिवस वहात होता. पिण्याचे चारही तलाव शंभर टक्के भरलेले होते. सन-२०२१ मध्येही एप्रिल मे जून या कालावधीत जवळपास दोन महिने गोदावरी डावा कालवा सलग वहात होता. तरीही नागरीकांना दररोज पाणी का देऊ शकले नाही, याचे उत्तर आजी माजी लोकप्रतिनिधींनी जनतेला दिले पाहिजे. सध्या नगरपालिका कुणाकडे आहे हा मुद्दा येथे मुळीच महत्वाचा नाही. यापूर्वी ती अन्य कुणाकडे तरी होती वा भविष्यात कुणाकडे तरी असेल. त्यामुळे लोकप्रतिनिधींची ही सार्वकालिक,सार्वजनिक,सामुहिक जबाबदारी आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे कोपरगावकरांना सात दिवसाच्या आत कधीच पाणी दिले गेले नाही.निळवंडेची वाट पहात होतात की काय इतकी वर्ष ? आणि तेही तुमच्या दारात बारमाही प्रकल्पाचे पाणी असतांना तुम्ही जर दररोज पाणी देऊ शकत नसाल तर मग,निळवंडेवरुन वा आणखी कुठून पाईपलाईन आणून काय मोठा तीर मारणार आहात ? नुसती पाईपलाईनच काय अख्खे निळवंडे दारणा धरण जरी उचलून कोपरगावला आणून ठेवले तरी, कोपरगावकरांना दररोज पाणी मिळण्याची सुतराम शक्यता नाही. कालवे पुढेही सलग वहातील आणि चार-पाच तळेही शंभर टक्के भरलेले असतील.अशा स्थितीत, आहे त्या वितरण प्रणालीतून, काही दिवस तरी दररोज पाणी देण्याचे अग्नीदिव्य करुन दाखवावे.एकूण २१० दलफुट (६०००एम.एल.डी.) मंजूरी असलेले पिण्याचे पाणी, वर्षभरात सुध्दा उचलू शकत नाही, इतिहासात १५२ द.ल.घ.फू.पेक्षा जास्त पाणी कधीच उचलू शकली नाही, कोपरगावची अशी ही कुचकामी पाणी पुरवठा योजना आहे. विशेष म्हणजे याच दरात, मंजूर पाण्याच्या दहा टक्के पाणी आणखी वापरता येऊ शकते. पण पाणी उचलण्याची आणि ते वितरीत करण्याचीच जर वितरण प्रणालीची क्षमता नसेल तर हा विषय येथेच थांबतो .जर तशी क्षमता असेल तर कोपरगाव नगरपालिकेने किमान दिवसाआड पाणी देऊन ते सिध्द करुन दाखवावे. खरे खोटे काय ते तेंव्हाच सिध्द होईल. निवडणूका जिंकण्यासाठी उगीचच “निळवंडेचे गाजर दाखवून आकाशातील चंद्र तारे आणून देतो”या सारख्या बाजारगप्पा करु नये. जनतेला काही काळ फसवता येईल, पण सदासर्वकाळ नाही, याचे भान ठेवणे आवश्यक आहे.

कोणत्याही निवडणूका आल्या म्हणजे,” कोपरगावच्या नागरिकांसमोर निळवंडेचे,दारणाचे पाणी पाईपलाईन करुन आणू”दिवसाआड पाणी देऊ” अशी फुकटची गाजरं दाखवून कोपरगावकरांना उल्लू बनवायचे आणि मतांची झोळी भरायची, यापेक्षा दुसरा कोणताही जनहितार्थ असा उदात्त हेतू यात नाही. एकदा निकाल जाहीर झाला की साऱ्यांना दिलेल्या घोषणांचा विसर पडतो, हे कोपरगावकरांच्या सवयीचे झाले आहे.प्रवाही पद्धतीने पाणी असून सुध्दा १० कोटीची थकबाकी होत असेल तर धरणातून विद्युत मोटारींच्या सहाय्याने उपसा करुन पाणीपुरवठा करण्यासाठी लागणारा आर्थिक भार नगरपालिकेला झेपेल काय ? याच्या अभ्यासात जायची कुणाला गरज वाटत नाही.यावर मागील निवडणुकीत मोठा उहापोह झाला आहे.आता तरी किमान आश्वासन देतांना तरी बौध्दीक दिवाळखोरी दिसू नये याचेही कुणाला भान राहिलेले नाही.तोळामासा प्रकृती असलेल्या नगरपालिकेची झलक,कोपरगावात एक फेरफटका मारली तरी कुणालाही कळेल.कुणामुळे आली आहे ही वेळ, याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे. सध्या तरी उडदामाजी काळे गोरे, सारे सारखेच, कुणाला झाकावे अन् कुणाला उघडावे, हा वर्तमान काळातील गंभीर प्रश्न आहे.आतून सगळे एकमेकाला मिळालेले आहे हे सांगायला कोना ज्योतिषाची गरज नाही.

कोपरगाव पाणीपुरवठा वितरण प्रणालीची तांत्रिकता आणि तिची मर्यादा समजून घेणे महत्त्वाचे आहे. वितरण प्रणालीची आज जी वहनक्षमता आहे, ती जर निम्म्यावर आणली तर पाणीपुरवठा पंधरा दिवसावर जाईल किंवा त्याच्याही आणखी निम्मी केली तर पाणीपुरवठा एक महिन्यावर जाईल.त्याच न्यायाने आहे त्या स्थितीची क्षमता दुप्पट केली तर पाणीपुरवठा साडेतीन दिवसावर येईल. आणि पुढे जाऊन त्याच्याही दुप्पट केली तर दिवसाआड पाणी देता येईल. हे खरे वास्तव बाजूला ठेवायचे आणि जनतेला नेहमीप्रमाणे संभ्रमित करायचे हा पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण्यांचा नेहमीचा धंदा बनला आहे यात जनतेला काही वेगळे वाटत नाही.

कोपरगावकरांना दररोज पाणी न मिळण्याचे खरे कारण गुलदस्त्यात ठेवायचे आणि भलतीकडचाच रस्ता दाखवून त्यांच्यात संभ्रम तयार करुन आपली राजकीय पोळी भाजून घेण्यापेक्षा,प्रामाणिकपणे मुख्य आजार दुर करा किंवा त्यासाठी कुणी काम करत असेल तर, त्यांना किमान सहकार्य तरी करा.कोपरगावची पाणी वितरण व्यवस्था पुर्णतः सदोष,अपुऱ्या क्षमतेची आणि कमी कार्यक्षमतेची आहे. यावर माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी नेमके बोट ठेवले आहे.वास्तविक कोणत्याही पाणी योजनेची पाणी साठवण क्षमता दोन महिने पाणी पुरेल अशी असावी असा शासन निर्णय आहे.यासाठी साठवण तळ्यांची क्षमता वाढवणे आवश्यक आहे.सध्या चार तळ्यांची क्षमता ६१०एम.एल.डी.आहे. (अर्थात गाळासहीत !! )
बारा महिन्यासाठी मंजूर असलेले पाणी हिशोबात घेतले तर १००० एमएलडी पाण्याची साठवण क्षमता गरजेची आहे. प्रत्यक्षात ती सध्या गाळासहीत ६० टक्केच आहे. त्यामुळे चारही तळ्यांची क्षमता वाढविणे,पाचवे तळे पुर्ण करणे, सर्व तळ्यांना आतून अस्तरीकरण करणे, तळ्याच्या आसपास ५०० मीटरच्या आत असलेल्या विहीरी ताब्यात घेणे,तळ्यातून पाणी चोरणाऱ्यांवर फौजदारी करणे, बाष्पीभवन प्रतिबंधक उपाययोजना करणे यासारख्या उपाययोजना झाल्या तरच यातून मार्ग निघेल. दिर्घ काळापासून,”आंधळं दळतयं अन् कुत्रं पिठ खातंय”, अशी कोपरगाव शहराची दुरावस्था झाली आहे. साठवण तळ्यापासून शेवटच्या टोकापर्यंत मोठ्या क्षमतेची अशुद्ध पाण्याची जलवाहिनी सलगपणे टाकणे गरजेचे आहे . उगीचच पैसे नाहीत म्हणून कुठेतरी तुकड्या तुकड्यात काम केले तर त्याचा काही परिणाम दिसणार नाही. योग्य त्या क्षमतेचे विद्यूत मोटार पंप तळ्यावरून पाणी खेचण्यासाठी बसविणेही गरजेचे आहे,परिणामस्वरूप कमी वेळेत पुरेसे पाणी उचलता येईल.उगीचच वीजबिलांचा खर्च वाढेल म्हणून यात टाळाटाळ करणेही योग्य होणार नाही. त्यामुळे संपुर्ण पाईपलाईनचे वाढीव क्षमतेसह अद्ययावतीकरण करणे आणि पाणी खेचण्यासाठी पंप बसविणे ह्या दोन बाबी जरी पुर्ण झाल्या तर आजही कोपरगावकरांना पिण्याचे पाणी दिवसाआड मिळू शकते. या दिशेने कुणी प्रयत्नशील असतील तर जनता जनार्दनाच्या या जिव्हाळ्याच्या विषयात किमान झारीतील शुक्राचार्य तरी होऊ नये.गळक्या भांड्याकडे कानाडोळा करायचा आणि वरुन आणखीन पाणी ओततो म्हणून नौटंकी करायची हा फारच बेरकीपणा झाला बुवा!

गेली कित्येक वर्षे “आजार पाठीला आणि इंजेक्शन पखालीला” असा हा हास्यास्पद प्रकार चालू आहे. इतके दिवस उल्लू बनाविंणे चालूच होते आता निळवंडे, दारणाच्या वरुन आणावयाच्या पाईपलाईनच्या ताज्या ताज्या गाजराचा नाट्यमंचावर प्रवेश झाला आहे. पुर्वापारच्या अनुभवावरुन या गाजरावर,गेला बाजार चार पाच निवडणूकांत तरी कोपरगावकरांना सहज संमोहीत करता येईल,असा साधा सरळ हिशोब यामागे राजकीय धुरीणांचा आहे. मनोमन खरोखरच इच्छा असती तर, कित्येक वर्षापुर्वीच सर्व सेवा सुविधांच्या बाबतीत कोपरगावची नगरी केंव्हाच आदर्श नगरी झाली असती. पण सारेच प्रश्न निकाली निघाले तर मग मतांची बेगमी करायची तरी कोणत्या प्रश्नांच्या आधारे, हा यक्ष प्रश्न या मंडळींना कायम सतावत असतोच.त्यातूनच कृत्रिम बागुलबुवा(शत्रू ) तयार करायचा व त्यातून,” मीच तुम्हाला वाचवतो”असा आव आणायचा व त्यातून तापल्या तव्यावर आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची असा हा दांडगा खेळ कोपरगावच्या राजकीय क्षितिजावर अव्याहतपणे सुरू आहे.व मतदानाला जायच्या आधी दोन चपट्या आणि हजार-पाचशेच्या नोटा जोपर्यंत निर्लज्ज मतदार आपल्या खिशात कोंबून पुढे सरकत राहील तो पर्यंत या प्रवृत्तीला खतपाणी मिळत राहील व हा भस्मासुर वाढतच जाईल यात तिळमात्र शंका नाही.अर्थात प्राधान्य स्वहिताला द्यायचे की जनहिताला द्यायचे हा ज्या त्या राजकीय विचार सरणीचा प्रश्न आहे.पण ज्या जनतेला वेठीस धरुन हा खेळ चालतोय त्या जनतेने मात्र या भुलभुलैय्यापासून नेहमीच सावध राहावे, दुसरे काय त्यातूनच येणाऱ्या आगामी निवडणुकात या मंडळींना त्यांची जागा दाखविण्याचा प्रयत्न केला तर त्या भोंदूगिरीला चांगलाच चाप बसू शकतो इतकेच या निमित्ताने म्हणता येईल.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close