कोपरगाव तालुका
…या रस्ताकामाचे होणार काँक्रीटीकरण !

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते १९.२७ कोटी निधीतून झगडे फाटा ते पुणतांबा फाटा रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन,१.८६ कोटी निधीतून ५ एमव्हीए क्षमतेच्या चांदेकसारे सबस्टेशनचे भूमिपूजन,५० लाख निधीतून बांधण्यात आलेल्या श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण,२० लाख रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या मुस्लिम दफनभूमी संरक्षक भिंतीचे लोकार्पण नुकतेच मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.

कोपरगाव-सावळीविहीर या महामार्गावर कोपरगाव शहरातील वाढती वाहतूक,समृद्धी महामार्गाची रहदारी आणि अहिल्यानगर-मनमाड रस्त्यावरची अवजड वाहतूक यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली असून भविष्याचा विचार करता कोपरगाव शहराला बायपास मार्ग तयार करणे गरजेचे आहे.हा बाह्यवळण रस्ता झगडेफाटा मार्गे शिर्डी बाह्य वळण रस्त्यास जोडल्यास शहरातील रहदारी कमी होऊन अपघात टळतील.त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधीची मागणी करणार आहे.-आ.आशुतोष काळे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था हा खरोखरच अत्यंत गंभीर आणि चिंतेचा विषय बनला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले अहिल्यानगर-कोपरगाव महामार्गाचे काम,अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांचे साम्राज्य आणि खराब दर्जाच्या कामांमुळे स्थानिक नागरिकांसह शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.हा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग गेल्या १५ ते २० वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत आहे.पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहने अडकून तासनतास वाहतूक कोंडी होते.सावळीविहीर,पुणतांबा फाटा,कोपरगाव बेट,झगडेफाटा ते वडगाव पान आदी ठिकाणावरील उड्डाणपूल हे असून अडचणं आणि नसून खोळंबा ठरत आला आहे.चार दिवस काम सुरू राहिले की सहा महिने बंद राहते अशी या रस्त्यांची गेली सव्वीस वर्षे स्थिती आहे.मात्र याबाबत समाधानकारक बातमी हाती आली असून पुणतांबा फाटा ते झगडे फाटा या मार्गातील सात किलोमीटर रस्त्याची दुरवस्था दूर करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून १९.२७ कोटी निधी मंजूर केला असल्याचा दावा करण्यात आला आहे.त्यातून हा रस्ता सिमेंट कॉंक्रीटचा होत आहे.
या शिवाय त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ११ गावांतील आदिवासी वस्त्यांसाठी १ कोटी १० लाखांतून वीज पोल व ट्रान्सफार्मरची कामे पूर्ण केली असून आणखी १२ ट्रान्सफार्मर मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे त्यांनी सांगत रांजणगाव देशमुख सबस्टेशनला उभारण्यात येणाऱ्या सोलर प्लांटचे काम अंतिम टप्यात आले असून लवकरच त्याचे लोकार्पण होवून विजेच्या अडचणी निश्चितपणे कमी होणार असल्याचे सांगितले.याप्रसंगी चांदेकसारे येथील मुस्लिम दफनभूमी परिसरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे सहा.अभियंता वैभव वाजे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता तुळशीराम दहिफळे,शाखा अभियंता रविंद्र चौधरी,महावितरणचे कार्यकारी अभियंता नारायण सोनवणे,उपकार्यकारी अभियंता डी.डी.पाटील,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी,आदींसह चांदेकसारे व पंचक्रोशीतील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.



