आंदोलन
तलावातील पाणीचोरी रोखा,ग्रामस्थांची मागणी !

न्यूजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
राज्यात दुष्काळ जाहीर झाला असताना कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत हद्दीत पिण्याच्या साठवण तलावातून बेकायदा पाणी उपसा होत असून महावितरण कंपनीचे अधिकारी त्याकडे सपशेल कानाडोळा करत असल्याने ग्रामस्थानी संताप व्यक्त केला असून याबाबत तातडीने प्रतिबंधक उपाय करून ही पाणी चोरी थांबवावी अशी मागणी येसगाव येथील कार्यकर्ते नानासाहेब गायकवाड यांचेसह पस्तीस ग्रामस्थानी नुकतीच केली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान यापूर्वी विजय वहाडणे नोव्हेंबर 2016 मध्ये कोपरगाव नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी मोठ्या बहुमताने निवडून आल्यावर त्यांनी येसगाव हद्दीत मोठी पाणी चोरी उघडकीस आणली होती.त्यानंतर ईशान्यगडाच्या कारखान्यास गोदावरी डाव्या कालव्यावरून पाणी घेत असताना त्यास जलसंपदा विभागाच्या आशिर्वादाने चक्क फाटक नसल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी उघडकीस आणली होती.त्यानंतर मोठा गदारोळ उडाला होता.आता या पाणी चोरीबाबत प्रशासन काय भूमिका घेणार याकडे तालुक्यात लक्ष लागून राहिले आहे.
राज्यात १० टक्के पाणी कपातीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी तसेच दुष्काळी भागात रोजगार हमी योजनेतील कामे वाढवावीत असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत नुकतेच दिले आहे.दुसरीकडे राज्यात दुष्काळाची व्याप्ती वाढू लागली असून आणखी १८ तालुक्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्याचा निर्णय मंगळवारी दुष्काळ निवारण उपाययोजना मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला.त्यामुळे राज्यातील दुष्काळी तालुक्यांची संख्या आता ३०२ झाली आहे.दुष्काळी परिस्थिती जाहीर झालेल्या तालुक्यातील पंचनामे २० ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले असून बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करण्याचे नियोजन करण्याचेही समितीने प्रशासनास दिले.राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून त्यात त्यांनी त्यावेळी पाण्याचे नियोजन आतापासूनच करा,१० टक्के पाणी कपातीची राज्यभरात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असताना कोपरगाव तालुक्यातील भाजपचे विधानपरिषदेतील नवोदित आ.विवेक कोल्हे यांचे गावात मात्र पाणी उपलब्ध असताना त्याची चोरीची परिस्थिती अनुभवास मिळत असल्याचे दिसून येत असल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.याबाबत ग्रामस्थानी एकत्र येत एक निवेदन ग्रामपंचायत अधिकारी आणि राज्य महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांना एक निवेदन देऊन याबाबत आवाज उठवला आहे.

“येसगावमध्ये सध्या तीव्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून,गावकऱ्यांसमोर पाण्याचे मोठे धर्मसंकट उभे राहिले आहे.अशा प्रतिकूल परिस्थितीत,गावातील नाटेगाव रोडलगत असलेला बंधाऱ्यामधून व तलावामधून काही असामाजिक तत्वांकडून विनापरवाना व बेकायदेशीररीत्या विद्युत पंप लावून पाण्याचा बेसुमार उपसा केला जात आहे.तलावातील पाणी विनाकारण शेतीसाठी किंवा इतर व्यावसायिक कामांसाठी पळवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे”-नानासाहेब गायकवाड,कार्यकर्ते,येसगाव,तालुका कोपरगाव..
त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”आपल्या येसगावमध्ये सध्या तीव्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून,गावकऱ्यांसमोर पाण्याचे मोठे धर्मसंकट उभे राहिले आहे.अशा प्रतिकूल परिस्थितीत,गावातील नाटेगाव रोडलगत असलेला बंधाऱ्यामधून व तलावामधून काही असामाजिक तत्वांकडून विनापरवाना व बेकायदेशीररीत्या विद्युत पंप लावून पाण्याचा बेसुमार उपसा केला जात आहे.तलावातील पाणी विनाकारण शेतीसाठी किंवा इतर व्यावसायिक कामांसाठी पळवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.जर हा पाण्याचा अपव्यय आणि चोरी तातडीने थांबवली नाही,तर येत्या काही दिवसांत गावाला पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण होईल.तरी या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन,गाव तलावामधून होणारी पाण्याची चोरी तसेच महावितरणाकडून तलावाच्या व बंधाऱ्याच्या भोवताली महावितरणाची सिंगल फेज लाईट चोरी तातडीने थांबवावी.तसेच जे कोणी विनापरवाना पाण्याचा उपसा करत आहेत.त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी कळकळीची मागणी केली आहे.त्यामुळे कोपारगाव तालुक्यात नेतृत्व करणाऱ्यांचे गावात दिव्याखाली अंधार असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे.आता संबंधित राजकीय मंडळी कोणती भूमिका घेणार याकडे कोपरगावसह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

सदर निवेदनावर येसगाव येथील कार्यकर्ते नानासाहेब गायकवाड यांचेसह धनेश्वर कोल्हे,बापूसाहेब कोल्हे,वैभव कोल्हे,संजय मुदगल,लक्ष्मण पाटोळे,भाऊसाहेब कोल्हे,प्रवीण कोल्हे,दत्तात्रय सुराळकर,विष्णू सुराळकर,नवनाथ सुराळकर,रविंद्र कळसकर,समाधान पाटोळे,दत्तात्रय गंगाधर कळसकर,विलास कळसकर,सलीम शेख,कलीम शेख,प्रभाकर कळसकर,वैभव कळसकर,रत्नाकर कळसकर,प्रल्हाद शिंदे,नरेंद्र गवांदे,उमेश कोल्हे सचिन गायकवाड आदीसह बहुसंख्येने ग्रामस्थानी सह्या केल्या आहेत.



