आरोग्य
कोपरगावातील उपजिल्हा रुग्णालय रामभरोसे…!

न्यूजसेवा
कोपरगाव (नानासाहेब जवरे)
कोपरगाव नगरपरिषद जुनी इमारत पाडून जवळपास दहा-अकरा वर्षे उलटून गेली आहेत मात्र 4.19 कोटी रुपयांची नवीन इमारत पूर्ण होऊन त्याचे उद्घाटन अद्याप दृष्टिपथात दिसत नसताना आता कोपरगाव शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी शंभर खाटांचे 29.68 कोटी रूपयांचे मंजूर करण्यात आलेले उपजिल्हा रुग्णालय इमारत बांधणीची मुदत संपत आली असल्याचे उघड झाले आहे.त्याचे तळमजल्याचे कामही अद्याप पूर्ण न झाल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.त्यामुळे नागरिकांची क्षमता नसताना त्यांना खाजगी रुग्णालयाचा अतिरिक्त आर्थिक भार उचलावा लागत आहे.त्याबाबत नागरिकांत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

“कोपरगाव उपजिल्हा रुग्णालयाचे हे काम जलद रीतीने व्हावे यासाठी आ.आशुतोष काळे यांनी जून 2026 मध्ये साईट व्हिजिट करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांना योग्य सूचना दिल्या आहेत.जिल्हा रुग्णालय अधिक्षक यांनी काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत ज्या मूळ अंदाजपत्रकात समाविष्ट नव्हत्या.मात्र तांत्रिक बाबींबाबत आम्हाला जास्त काही सांगता येणार नाही”-डॉ.गिरीश बुट्टे,अधिक्षक,कोपरगाव ग्रामीण रुग्णालय.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहर आणि तालुका पोलिस ठाण्याच्या इमारतीसाठी आ.आशुतोष काळे यांनी मोठ्या प्रमाणावर निधी आणून त्या पूर्णत्वास नेल्या आहेत.तर न्यायालयीन इमारतीचे काम पूर्णत्वास जात आहे.या आधी माजी आ.अशोक काळे यांनी तहसील आणि पंचायत समितीच्या इमारती पूर्णत्वास नेल्या आहेत.तर माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव बस स्थानकाची इमारत (समोर गाढवलोळी निर्माण झाली का असेना) पण पूर्ण केली आहे.वर्तमान आ.काळे यांनी ग्रामीण रुग्णालयाचे इमारतीसाठी 29.68 कोटींचा निधी आणून त्याचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात केले असल्याचे मोठे ढोल बडवून दि.16 मार्च 2024 रोजी जोरदार स्वागत केले होते.तर कोपरगाव न्यायालयाचे इमारतीसाठी मोठा निधी आणून ती इमारत प्रगतीपथावर आहे.तर उपजिल्हा रुग्णालय इमारतीचे काम समीर वर्पे यांनी घेतले असल्याचे बोलले जात आहे.सदर कामाचे भूमिपूजन होऊन जवळपास पावणेदोन वर्षे उलटत आले आहे.काम पूर्ण करण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी राहिला असताना सदर कामावर आमच्या प्रतिनिधीने भेट दिली असता वस्तुस्थिती अद्याप अवघड असल्याचे दिसून आली आहे.सदर काम अद्याप बाल्यावस्थेत असल्याचे दिसून आले आहे.त्यासाठी पायाचे काम होऊन आता कुठे पहिल्या मजल्याचे कामाचा स्लॅब टाकण्याची तयारी सुरू असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान याबाबत आमचे प्रतिनिधीने सार्वजनिक बांधकाम कोपरगाव उपविभागाचे अपअभियंता तुळशीराम दहिफळे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सदर उपजिल्हा रुग्णालयाला अडचण अशी काही नाही.मुदत वाढीबाबत त्यांना अधिकृत माहिती देता आली नाही.दरम्यान त्यांनी याबाबत बोलताना सांगितले की,”पण मी नुकताच कोपरगाव येयील उपविभागीय कार्यालयात नुकताच रुजू झालो असून याबाबत उद्या माहिती घेऊन आपल्याला सांगतो” अशी बतावणी केली आहे.
आमच्या प्रतिनिधीने सदर ठिकाणी आज सकाळी 11.15 वाजता भेट दिली असता व सदर कामाचे छायाचित्रे काढले असता त्या ठिकाणीं उभे असलेले काही खाजगी कर्मचारी (बहुधा ते पर्यवेक्षक असावे) हे विचारणा करत आमचे प्रतिनिधीकडे आले होते.बहुधा त्यांना छायाचित्रे काढू नका असेच म्हणायचे असावे असे दिसत असताना त्यांनी आमच्या प्रतिनिधींचे नाव विचारले असता एका कर्मचाऱ्याने लागलीच त्या साईटवर असलेल्या कार्यालयात धाव घेऊन सदरची खबर ठेकेदारास (वर्पे) दिली असता त्याचे मागोमाग आमचे प्रतिनिधी गेले असता त्या ठिकाणी समीर वर्पे हे काही व्यक्तीशी संवाद साधताना आढळून आले आहे.त्यांनी लागलीच आमचे प्रतिनिधींचे स्वागत केले आहे.त्यांनी प्रथम सोपस्कार पार पडले असता काय येणे केले ? असा सवाल न विचारला तर नवले होते.त्यावर त्यांना विचारणा केली की,”अकोले,संगमनेर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालये पूर्ण होत आली असताना कोपरगाव येथील इमारत एवढी प्रलंबित का राहिली ? असा सवाल केला आहे.आपण काम कधी सुरू केलं आणि किती मुदत शिल्लक आहे का ? त्यावर त्यांनी पहिल्या कामाची मुदत थोडी शिल्लक असताना आम्ही नवीन एक वर्षाची मुदत वाढ मिळवली असल्याचे सांगून टाकले आहे.त्यावेळी त्यांनी सदर कामाला पाया खोदत असताना तांत्रिक अडचणी आल्या असल्याची माहिती दिली असून गृहितकापेक्षा जास्त म्हणजेच जवळपास चौदा फूट पाया खोदाई करावी लागली असून पहिल्या मजल्याची ऊर्जा त्यातच संपली असल्याचे सांगून टाकले आहे.त्यामुळे तांत्रिक मंजुरीसाठी पुन्हा कागदी घोडे नाचवावे लागले असल्याचे दिसून आले आहे.यांचे आरेखक छत्रपती संभाजीनगर येथील असल्याचे माहिती समोर आली आहे.दरम्यान अन्य स्रोतांकडून अधिकची माहिती मिळवली असता त्यासाठी त्यांनी जलजीवन योजनेच्या कामाची पुनरावृत्ती या ठिकाणी झाली असल्याचे दिसून आले आहे.तर मध्यंतरी जिल्हा रुग्णालय अधिक्षक यांनी काही महत्वाच्या सूचना केल्या असून त्यांचा कामात समावेश नसल्याचे उघड झाले आहे.शिवाय कोपरगाव नगर परिषद इमारतीसारखीच आग प्रतिबंधक उपाययोजनांचा यात समावेश नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.कामाचे अंदाजपत्रक धरले एक आणि झाले भलतेच अशी स्थिती ओढवली असल्याचे उघड झाले आहे.म्हणजेच सरकारी कामे किती वेंधळेपणाने केली जातात याचे उदाहरण समोर आले आहे.त्यातच वर्तमानात सरकारी तिजोरी खाली असल्याने अनेक कामे रेंगाळले असून ठेकेदार आंधळ्या घोडीसारखे हात पाय झाडत असल्याचे दिसून येत आहे.अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत ही बाब लपून राहिली नाही.अनेक जण त्या वाटेवर असल्याचे समजत आहे.त्यामुळे वरवर सरकार विकासाचा कितीही आव आणत असले तरी रिकाम्या तोजोरीमुळे राजकीय नेते आणि प्रशासन कपाळावर हात मारत असल्याची बाब लपून राहिलेली नाही.

दरम्यान या बाबतची अधिक माहिती घेण्यासाठी कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांचेशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता नेहमी प्रमाणे तो होऊ शकला नाही.त्यामुळे अधिकची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.त्याच वेळी कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तोही होऊ शकला नाही.
दरम्यान कोपरगाव येथील उपजिल्हा रुग्णालय इमारतीचे काम वरवर सुरू दिसत असले तरी ते कधी पूर्ण होणार याबाबत कोणीही छातीठोकपणे त्याबाबत सांगू शकत नाही हे नाकारता येणार नाही.त्यामुळे कोपरगाव शहरातील रुग्णांना वर्तमानात फक्त सिझर शस्त्रक्रिया सोडून अन्य कोणत्याही सुविधा मिळत नाही परिणामी अतिदक्षता विभाग,शस्त्रक्रिया विभाग,डायलिसिस आदी सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे.परिणामी महागड्या खाजगी रुग्णालयात मोठा आर्थिक अधिभार सहन करावा लागत असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे या बेजबाबदार कृतीस जबाबदार कोण ? असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.त्यामुळे कोपरगावातील उपजिल्हा रुग्णालय रामभरोसे असल्याचे उघड झालं आहे.त्याबाबत रुग्ण त्यांचे नातेवाईक आणि कोपरगाव शहरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान याबाबत आमचे प्रतिनिधीने कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.गिरीश बुट्टे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”हे काम जलद रीतीने व्हावे यासाठी आ.आशुतोष काळे यांनी जून 2026 मध्ये साईट व्हिजिट करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांना योग्य सूचना दिल्या आहेत.जिल्हा रुग्णालय अधिक्षक यांनी काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत ज्या मूळ अंदाजपत्रकात समाविष्ट नव्हत्या.मात्र तांत्रिक बाबींबाबत आम्हाला जास्त काही सांगता येणार नाही अशी बचावाची भूमिका घेतली आहे.



