कोपरगाव शहर वृत्त
कोपरगावात राखी मार्केटचा बदल लक्षवेधी !

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील अहिंसा स्तंभाजवळ यंदा सजलेले राखी मार्केटला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून कोणतीही मोठी जाहिरातबाजी,विशेष स्कीम,कुपन किंवा आकर्षक लाइटिंग नसतानाही या मार्केटला मिळालेला ग्राहकांचा प्रतिसाद कोपरगावच्या बाजारपेठेतील वाढता विश्वास अधोरेखित करणारा ठरला असल्याची माहिती ज्येष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

“राखी मार्केटच्या या यशस्वी व्यवस्थेमुळे आगामी दिवाळी सणाच्या काळातही अशाच प्रकारचे नियोजन,पार्किंग व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रण करण्यात यावे,अशी अपेक्षा नागरिक व व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.सणासुदीच्या काळात बाजारपेठ आकर्षक,सुरक्षित आणि नागरिकांसाठी सुविधाजनक करण्याच्या दृष्टीने ही व्यवस्था आदर्शवत ठरू शकते”- नारायण अग्रवाल,प्रसिद्ध व्यापारी,कोपरगाव.
कोपरगाव शहराची बाजारपेठ ही ऐतिहासिक काळापासून एक मोठी व्यापारी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते.मात्र,अलीकडच्या काळात येथील बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल कमालीची घटली असून,व्यापारी आणि स्थानिक नागरिकांसाठी हा खरोखरच मोठा चिंतेचा विषय बनला आहे.बाजारपेठेतील ही मंदी केवळ एका घटकामुळे नसून,त्यामागे अनेक स्थानिक, भौगोलिक आणि आर्थिक कारणे आहेत.शिर्डी,राहता आणि येवला यांसारख्या शेजारील शहरांचा झालेला जलद व्यावसायिक विकास कोपरगावच्या बाजारपेठेवर परिणाम करत आहे.शहरात नियमित पिण्याच्या पाण्याचा प्रश्न,ड्रेनेज लाईनच्या समस्या,स्वच्छतेचा अभाव आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे ग्रामीण भागातील ग्राहक शहराकडे येणे टाळतात.तरुण आणि मध्यमवर्गीय ग्राहक आता स्थानिक दुकानांऐवजी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी करण्यास प्राधान्य देत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही प्रतिक्रिया महत्वाची मानली जात आहे.

त्याबाबत अग्रवाल यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की,”राखी खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने बाजारपेठेत दाखल होत असून,मार्केट परिसरात एक रांग पद्धतीने दुकाने उभारण्यात आली आहेत.या संपूर्ण व्यवस्थेकडे आ.विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष पराग संधान यांनी स्वतः लक्ष दिल्याने व्यापारी तसेच ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. विशेषतः पार्किंगचे आणि वाहतुकीचे नियोजन यामुळे गर्दी असूनही वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला नाही.दरवर्षी सणासुदीच्या काळात बाजारपेठेत गर्दी वाढत असते.मात्र यंदाच्या राखी मार्केटमध्ये नागरिकांना खरेदी करताना पुरेशी जागा,वाहनतळाची सुविधा आणि सुरळीत वाहतूक यांचा अनुभव मिळाला असल्याचा दावा केला आहे.नगराध्यक्ष पराग संधान यांनी स्वतः लक्ष घालून केलेले नियोजन आणि पार्किंगची व्यवस्था यामुळे यंदा वाहतूकही सुरळीत राहिली.नागरिकांना कोणतीही अडचण जाणवली नाही,असे मत ज्येष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे.
राखी मार्केटच्या या यशस्वी व्यवस्थेमुळे आगामी दिवाळी सणाच्या काळातही अशाच प्रकारचे नियोजन,पार्किंग व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रण करण्यात यावे,अशी अपेक्षा नागरिक व व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.सणासुदीच्या काळात बाजारपेठ आकर्षक,सुरक्षित आणि नागरिकांसाठी सुविधाजनक करण्याच्या दृष्टीने ही व्यवस्था आदर्शवत ठरू शकते असेही शेवटी अग्रवाल यांनी म्हटले आहे.


