कृषी विभाग
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई प्राप्त !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नामांकित बहुराष्ट्रीय (मल्टी नॅशनल) बियाणे उत्पादक कंपनीकडून फसवणूक झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे दुर्मिळ मानले जाते.मात्र कोपरगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी सुदैवी ठरले असून आ.आशुतोष काळे यांच्या निर्णायक भूमिकेमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सिजेंटा कंपनीकडून तब्बल ६ लाख २६ हजार ४०० रुपयांची नुकसान भरपाई मिळाली असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली आहे.

कोपरगाव तालुक्यात निकृष्ट दर्जाची रोपे पुरवून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई करून नुकसानग्रस्तांना न्याय मिळावा,अशी भूमिका त्यांनी मांडली त्यासाठी कृषी विभागाने पाठपुरावा केला होता.या एकत्रित प्रयत्नातून अखेर सिजेंटा कंपनीने माघार घेत ७.२० हेक्टर क्षेत्रावरील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकूण ६ लाख २६ हजार ४०० रुपयांची नुकसानभरपाई अदा केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,”चालू हंगामात कोपरगाव मतदार संघातील अनेक शेतकऱ्यांनी विविध नर्सरीमधून सिजेंटा कंपनीच्या ‘सिंबा’ वाणाची टरबूज रोपे खरेदी करून लागवड केली होती.मात्र या वाणाची रोपे निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.तसेच या वाणाला रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्याने मोठ्या प्रमाणावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि अनेक एकरांवरील टरबूज पिकाचे मोठे नुकसान झाले होते.या प्रकरणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने २५ मार्च रोजी प्रत्यक्ष शेतात पाहणी करून अहवाल सादर केला होता.या अहवालात सिजेंटा कंपनीच्या ‘सिंबा’ वाणामुळे संबंधित शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले.तसेच कंपनीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचाही उल्लेख करण्यात आला होता.
शेतकऱ्यांवरील अन्यायाची दखल घेत आ.काळे यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. निकृष्ट दर्जाची रोपे पुरवून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई करून नुकसानग्रस्तांना न्याय मिळावा,अशी भूमिका त्यांनी मांडली.तसेच कृषी विभागाने सातत्याने पाठपुरावा केला होता.या एकत्रित प्रयत्नातून अखेर सिजेंटा कंपनीने माघार घेत ७.२० हेक्टर क्षेत्रावरील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकूण ६ लाख २६ हजार ४०० रुपयांची नुकसानभरपाई अदा केली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी दिली आहे.त्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.



