जयंती,पुण्यतिथी अभिवादन
“खऱ्या ज्ञानासाठी संताचे मार्गदर्शन आवश्यक-…या महाराजांचे प्रतिपादन

न्यूजसेवा
संवत्सर-(शिवाजी गायकवाड)
“ज्याला श्रेष्ठ ज्ञान प्राप्त करायचे आहे त्याने संतांचे मार्गदर्शन,त्यांची सेवा आणि त्यांच्या विचारांचे आचरण यांमधूनच जानाची खरी अनुभूती त्याला मिळू शकते.ज्ञान हे केवळ ऐकण्याची किंवा वाचण्याची गोष्ट नसून ते जीवनात उतरवण्याची प्रक्रिया असल्याचे प्रतिपादन श्रीक्षेत्र आळंदी येथील ह.भ.प.उमेश महाराज दशरथे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“जिथे अज्ञानाचा व अविचारांचा अंधार नाहीसा होऊन आत्मस्वरुप प्रकट होते,तेथे ज्ञान जन्म घेते.ज्ञानेश्वरीतील ज्ञान ही केवळ तत्वज्ञानाची चर्चा नाही,ती जीवन जगण्याची दिशा आहे.संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेले ज्ञान म्हणजे मनुष्याने स्वतःला,समाजाला आणि परमात्म्याला समजून घेण्याचा मार्ग आहे” -उद्धव महाराज मंडलिक, नेवासा.
गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघाचे संस्थापक नेते स्व.नामदेवराव परजणे यांच्या २२ व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त संवत्सर येथे आयोजित केल्या गेलेल्या प्रवचनातून ” तें ज्ञान पैं गा बरवें.. ” या ज्ञानेश्वरीतील ओवीचे निरुपण करताना ते बोलत होते.यावेळी ज्येष्ठ किर्तनकार ह.भ.प.उध्दव महाराज मंडलिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी संवत्सर आणि परिसरातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना नामदेवराव परजणे पाटील शिष्यवृत्ती धनादेशाचे वितरण,संवत्सर येथील सहाने टेलर्स यांच्याकडून जनता हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले.जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना हस्ताक्षर किटचे वाटप करण्यात आले आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदर प्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,जंगली महाराज आश्रमाचे महंत परमानंद महाराज,महानुभाव आश्रमाचे महंत नितीनबाबा महानुभाव,महंत दामोदरबाबा महानुभाव,पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे माजी अध्यक्ष कैलासराव तांबे,बबनराव इलग,माजी उपसभापती अर्जुन काळे,अरुण येवले,सुनील देवकर,कारभारी आगवन,गटविकास अधिकारी संदीप दळवी,यांचेसह विविध स्तरातील मान्यवर,शासकीय अधिकारी,शिक्षक,पालक,विद्यार्थी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमधून अनेक ठिकाणी ज्ञान,भक्ती आणि कर्म यांचा सुंदर समन्वय मांडला आहे.त्यातील ” तें ज्ञान पैं गा बरवें ” या ओवीतून खऱ्या ज्ञानाचे स्वरूप आणि ते प्राप्त करण्याचा मार्ग त्यांनी सर्वसामांन्यांना स्पष्ट करुन सांगितला आहे.संत ज्ञानेश्वरांच्या मते केवळ पुस्तकी माहिती म्हणजे ज्ञान नव्हे.जीवनाचे सत्य जाणणे,आत्मस्वरूपाचा अनुभव घेणे आणि सदाचाराने जीवन जगणे हेच खरे ज्ञान होय.हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी सत्संग,गुरुभक्ती आणि विनम्रता आवश्यक असल्याचे सांगून दशरथे महाराज पुढे म्हणाले,” ज्ञान,विज्ञान,तंत्रज्ञान आणि जागतिकीकरणामुळे जग जवळ आले आहे,पण मना-मनांमध्ये अंतर वाढू नये यासाठी “हे विश्वची माझे घर ” हा दृष्टिकोन प्रत्येकाजवळ असणे आवश्यक असल्याचे सांगून त्यांनी आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचा प्रचंड साठा उपलब्ध आहे.मात्र माहिती आणि ज्ञान यांत फरक आहे.माहिती माणसाला बुद्धिमान बनवते,तर ज्ञान त्याला विवेकी,संवेदनशील आणि मूल्यनिष्ठ बनवते.त्यामुळे ज्ञानेश्वरांनी सांगितलेले ज्ञान आजही तितकेच महत्त्वाचे आहे.ज्ञानेश्वरी हा मराठी साहित्यातील आणि आध्यात्मातील विश्वव्यापी असा अमूल्य आणि सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे.ज्ञानेश्वरीतील ज्ञान ही संकल्पना केवळ पुस्तकी माहिती किंवा विद्वत्ता नसून स्वतःच्या आत्मस्वरुपाची अनुभूती आहे.अहंकाराला चिकटून राहणारी माणसे खऱ्या ज्ञानापासून दूर राहतात.अहंकारापासून दूर राहण्यासाठी माणसाने ज्ञानी असणे आवश्यक आहे.ज्ञान प्राप्तीसाठी संतांची सेवा,श्रध्दा आणि समर्पण माणसाजवळ असावे.ज्ञानेश्वरीतील ज्ञान म्हणजे बाह्य जगाचे ज्ञान नव्हे,तर मी कोण आहे ? या प्रश्नाचे अनुभूतीतून मिळणारे उत्तर आहे.माणूस जेव्हा देह,अहंकार,इच्छा,मोह यांच्या पलिकडे जाऊन आत्मस्वरुप ओळखतो तेव्हाच त्याला खरे ज्ञान प्राप्त होते असेही मार्गदर्शन ह.भ. प.दशरथे महाराज यांनी केले आहे.
यावेळी ज्येष्ठ किर्तनकार उध्दव महाराज मंडलिक यांनीही आपले विचार व्यक्त करताना सांगितले की,”जिथे अज्ञानाचा व अविचारांचा अंधार नाहीसा होऊन आत्मस्वरुप प्रकट होते,तेथे ज्ञान जन्म घेते.ज्ञानेश्वरीतील ज्ञान ही केवळ तत्वज्ञानाची चर्चा नाही,ती जीवन जगण्याची दिशा आहे.संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेले ज्ञान म्हणजे मनुष्याने स्वतःला, समाजाला आणि परमात्म्याला समजून घेण्याचा मार्ग आहे.पण त्याची पूर्तता मनुष्याने आपल्या आचरणातून करायला हवी.स्व.नामदेवराव परजणे यांना चांगल्या व पवित्र कर्मातून देवत्व प्राप्त झालेले आहे.त्यांचा आदर्श विचारांचा वारसा आजच्या पिढीने पुढे सुरु ठेवणे हीच त्यांना स्मृतीदिनानिमित्त खरी आदरांजली ठरेल असेही शेवटी उध्दव महाराज यांनी म्हटले आहे.
यावेळी शालिनी विखे यांनीही आपल्या भाषणामधून स्व.परजणे यांच्या कार्याच्या व त्यांच्या आचार-विचारांच्या स्मृतींना उजाळा दिला.अत्यंत साधे सरळ जीवन जगले परंतु आयुष्यातल्या प्रवासातील वाटेवर ते स्नेह आणि विश्वास पेरीत गेले.त्यातून आपुलकीची व जिव्हाळ्याची हिरवळ तयार होत गेली.कोणत्याही गोष्टीची आसक्ती न धरता सर्वसामान्य लोकांच्या उध्दारासाठी त्यांनी आपले सगळे आयुष्य वेचले. त्यांनी दिलेले विचार आमच्या सुसंस्कृत आयुष्याला दिशा देऊन गेलेत असेही त्या शेवटी म्हणाल्या आहे.
यावेळी महंत परमानंद महाराज यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले.गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना नामदेवराव परजणे पाटील शिष्यवृत्ती धनादेशाचे वितरण,संवत्सर येथील सहाने टेलर्स यांच्याकडून जनता हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले.जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना हस्ताक्षर किटचे वाटप करण्यात आले आहे.संवत्सर महाविद्यालयाच्या “गोदानाम संवत्सरे ” या वार्षिक नियतकालिकेचे प्रकाशनही पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
यावेळी प्रारंभी मान्यवरांनी स्व.परजणे यांच्या प्रतिमेचे पूजन केले.त्यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी प्रास्ताविक केले आहे.तर बाहेर माजी उपसरपंच विवेक परजणे यांनी मानले आहे.



